ईडीची टीम पहाटेच नवाब मलिकांच्या घरी धडकली, असं कोणतं प्रकरण ज्यासाठी ईडीने केली एवढी लगबग?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या घरी आज (23 फेब्रुवारी) पहाटेच अंमलबजावणी संचलनालय (ED)ची टीम धडकली. काही तास घरीच चौकशी केल्यानंतर मलिकांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं आहे. मात्र, असं कोणतं प्रकरण आहे की, ज्यासाठी ईडीने एवढी लगबग केली आहे ते जाणून घेऊयात सविस्तर.

नवाब मलिक यांनी 1993 स्फोटातील आरोपीकडून कुर्ला भागात एक मालमत्ता खरेदी केली होती. कोट्यवधींची किंमत असलेली ही मालमत्ता नवाब मलिकांनी अवघ्या 30 लाखांत खरेदी केली होती. असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 9 नोव्हेंबर 2021 रोजी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केला होता. या जमीन खरेदीत मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता.

फडणवीसांच्या याच आरोपाला नवाब मलिक यांनी तात्काळ प्रत्युतर दिलं होतं. पाहा त्यावेळी नवाब मलिक काय म्हणाले होते. मलिकांनी काय स्पष्टीकरण दिलं होतं ते जाणून घेऊयात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पाहा नवाब मलिकांचं काय होतं स्पष्टीकरण:

‘माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती की, दिवाळीनंतर फटाके फोडणार. आम्हाला वाटतं फटाके भिजले आणि आवाज झालाच नाही. एक माहोल तयार करण्यात आला की, नवाब मलिक यांचे बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबंध आहेत.’

ADVERTISEMENT

‘माझ्या 62 वर्षात.. किंवा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर 26 वर्षाच्या कालावधीत अशाप्रकारचे आरोप कधीही कुणीही आमच्यावर लावू शकलं नाही. आज एका जागेबाबत काही कागदपत्र तुम्ही लोकांसमोर ठेवले. की, आम्ही एक जमीन माफियाच्या माध्यमातून कवडीमोल भावाने खरेदी केली. आम्हाला वाटतं तुम्हाला माहिती पुरवणारी लोकं ही फारच कच्चे खेळाडू आहेत.’

ADVERTISEMENT

‘तुम्ही मला सांगितलं असतं तर मीच तुम्हाला सगळे कागद दिले असते. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, यामध्ये बनावट भाडेकरु बनविण्यात आले. आपण सगळे पाहून या की, त्या जागेवर एक ‘मदिनातुल आमान’ नावाची इमारत आहे. जी 1984 साली इमारत बनली. गोवावाला कंम्पाउडच्या नावाने ओळखली जाते. ज्यामध्ये मुनीरा पटेलने रस्सीवाला याला डेव्हलपमेंट राइट्स देऊन 140 ते 150 घरं बनवून इतरांना विकले.’

‘त्यामागे जी जमीन आहे. तिथे मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. तिथे आमचं एक गोडाउन आहे जे सॉलिडस कंपनीने लीजवर घेतलं होतं मुनीरा यांच्याकडून. त्याच प्रॉपर्टीमध्ये आमचे चार दुकानं देखील होते.’

‘आम्ही कोणत्याही प्रकारे अंडरवर्ल्डच्या दबावाखाली किंवा कोणत्याही बॉम्बस्फोटातील आरोपीकडून ही प्रॉपर्टी आम्ही खरेदी केलेली नाही. इथे आम्ही पूर्वीपासून भाडेकरु होतो. त्या जागेची जी मूळ मालकीण होती तिला वाटत होतं की, आम्ही हा मालकी हक्क घ्यावा. त्यामुळे व्यवहारनुसार आम्ही तो मालकी हक्क घेतला. जे खान कुटुंबीय होते जे तिथले वॉचमन होते ज्यांनी आपलं सात-बारावर नाव चढवलं होतं ते सरेंडर करण्यासाठी आम्ही त्यांना पैसे दिले होते. हे सत्य असताना त्याला राईचा पर्वत बनविण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला.’

‘खोटं बोलून कोणाची प्रतिमा मलिन करण्याचा जर तुमचा प्रयत्न असेल तर देवेंद्रजी हा तुमचा गैरसमज आहे. जे काही कागदपत्र आहेत रजिस्टर कार्यलयात उपलब्ध आहेत. कंपनीचं जे काही डिपार्टमेंट आहेत त्यात कागदपत्र आहेत. जो पैशाचा व्यवहार झाला त्याची स्टॅम्पड्युटी आम्ही भरली आहे.’

‘आम्हाला वाटतं की, खोटं बोलून नवाब मलिक जो मागील सात वर्षापासून आपल्याशी लढत होता पहिल्यांदा आपल्याकडून असा आरोप लावण्यात आला आहे. जो पूर्णपणे चुकीचा आहे.’

‘नवाब मलिकाचे कधीही अंडरवर्ल्डशी संबंध होता किंवा ना नवाब मलिकने बॉम्बस्फोटातील आरोपीकडून संपत्ती खरेदी केली. होय.. वॉचमनने आपलं नाव त्या प्रॉपर्टीवर चढवलं होतं. त्या वॉचमनकडून नाव काढून टाकण्यासाठी त्यांना पैसे देण्यात आले हे सत्य आहे.’ असं स्पष्टीकरण मलिकांनी त्यावेळी दिलं होतं.

देवेंद्र फडणवीस यांनी नेमके आरोप केले होते?

‘मुंबईतल्या कुर्ला भागात LBS रोडवर जवळपास तीन एकर जागा आहे. एका गोडाऊनवाल्या कुटुंबाची ही जागा होती. अत्यंत महागडी ही जागा होती. त्याची एक पॉवर ऑफ अॅटर्नी सलीम पटेल आणि शाहवली खान यांच्याकडे होती. या दोघांनी एलबीएस रोडवरची ही जागा सॉलिडस नावाच्या एका कंपनीला विकली आहे.’

‘सॉलिडस कंपनीच्या वतीने या कागदावर सही केली आहे ती फराज मलिक यांनी. ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची आहे.’ असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

‘स्वतः नवाब मलिकही काही काळासाठी या कंपनीत संचालक होते. शाहवली खान आणि सलीम पटेल या दोघांनी सॉलिडसला ही जागा फक्त 30 लाखांत विकली आहे. त्यातले 20 लाखच दिले आहेत. मला जी माहिती आहे त्यानुसार भाडे तत्त्वावर ही जागा दिली असेल त्यातून सॉलिडसला एक कोटी रूपये भाडं मिळतं आहे.’

‘2005 मध्ये जो व्यवहार झाला त्यावेळी तिथला दर काय होता? तर त्याच्या मागे पाईपलाईनच्या कच्च्या रोडवर 415 रूपये स्क्वेअर फूटने जागा घेतली ती मलिक कुटुंबाने घेतली होती. याच रोडवर एक जागा 2005 मध्ये एक जागा 2 हजार रूपये स्क्वेअर फूटने विकत घेतली आहे. सॉलिडसने याच वर्षी दोन अंडरवर्ल्डच्या लोकांकडून ही जमीन 25 रूपये स्क्वेअर फूटने घेतली आहे. मुंबईत उकिरड्याची जागाही 25 रूपये चौ. फुटाने घेतली असून 15 रूपये चौ. फुटाने पैसे दिले आहेत. आता प्रश्न हा आहे की मुंबईच्या गुन्हेगारांकडून ही जमीन का विकत घेतली गेली?’

‘बॉम्बस्फोटात आपण माणसांची लक्तरं पाहिली त्याचं प्लानिंग करणारा हा तोच शाहवली खान. भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद आहे. त्याची बहीण हसीना पारकर आणि तिचा फ्रंट मॅन खान यांच्याशी मलिक यांनी व्यवहार का केला? या दोघांनी तुम्हाला ही जमीन इतक्या स्वस्तात कवडी मोलाने का विकली?’

‘आपली संपत्ती सरकारजमा होऊ नये म्हणून विकली गेली. खरंच हा व्यवहार एवढाच झाला की काळा पैसा यात वापरला गेला? सरदार शाहवली खान हा 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरून त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. शाहवली खान टायगर मेमनच्या ट्रेनिंगमध्ये होता. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि मुंबई महापालिका याची रेकी त्याने केली होती. बॉम्बस्फोट होणार आहेत ही सगळी माहिती खान याच्याकडे होती. ज्या अल हुसैनी इमारतीत कारमध्ये आरडीएक्स भरण्यात आलं त्यामध्येही याचा सहभाग होता.’

नवाब मलिक ईडी कार्यालयात दाखल, ‘या’ प्रकरणात नोंदवला जात आहे जबाब

‘सलीम पटेल याने 2013 किंवा 2014 हे वर्ष असेल. सलीम पटेल हा तोच व्यक्ती आहे ज्याचा फोटो आर. आर पाटील यांच्यासोबत आला होता आणि दाऊदसोबत फोटो आला म्हणून आर आर पाटील यांना टीका सहन करावी लागली. हसीनाआपाचा म्हणजेच दाऊदच्या बहिणीचा हा ड्रायव्हर आहे.’

‘दाऊद पळून गेल्यानंतर जमिनीचे जे व्यवहार व्हायचे त्यात ज्याच्या नावाने पॉवर ऑफ अॅटर्नी तयार होत असत तो हा सलीम पटेल आहे. माझ्याकडे पाच प्रॉपर्टीजचे डिटेल्स आहेत. त्यातल्या एका प्रॉपर्टीचे डिटेल्स मी तुम्हाला देतो आहे. उरलेल्या चारमध्येही अंडरवर्ल्डचा संबंध आहे.’ असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर केले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT