नितीन वैद्य यांना ना. य. डोळे स्मृती पुरस्कार
डॉ. ना. य. डोळे फाउंडेशनकडून दिला जाणारा यंदाचा डॉ. ना. य. डोळे स्मृती पुरस्कार राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष व सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते नितीन वैद्य यांना जाहीर झाला आहे. उदगीर येथे 5 जानेवारी रोजी होणार्या समारंभात जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय सचिव व मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांच्याहस्ते हा प्रदान करण्यात येणार आहे. कोण […]
ADVERTISEMENT
डॉ. ना. य. डोळे फाउंडेशनकडून दिला जाणारा यंदाचा डॉ. ना. य. डोळे स्मृती पुरस्कार राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष व सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते नितीन वैद्य यांना जाहीर झाला आहे. उदगीर येथे 5 जानेवारी रोजी होणार्या समारंभात जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय सचिव व मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांच्याहस्ते हा प्रदान करण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT
कोण आहेत नितीन वैद्य?
नितीन वैद्य हे आज मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील मोठे प्रस्थ म्हणून ओळखले जातात. आपल्या ठायी उद्यमशीलता, दूरदृष्टी, कृतिशीलता आणि व्यावसायिकता ह्या मूल्यांना रुजवत आपला लौकिक प्रवास करत असताना त्यांनी सामाजिक भान आणि संवेदनशीलता सुद्धा कसोशीने जपली आहे हे विशेष. त्यांची पत्रकारितेतील कारकीर्द ही दैदीप्यमान राहिली आहे.
हे वाचलं का?
नितीन वैद्य : पत्रकार म्हणून विविध दैनिकांमध्ये काम
वैद्य यांनी 1985 या वर्षी दैनिक सकाळमधून वार्ताहर म्हणून सुरुवात केली. 1988 साली ते महाराष्ट्र टाइम्समध्ये दाखल झाले. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक बातमीदारी यात त्यांचा हातखंडा होता. गोविंद तळवळकर व कुमार केतकर यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या कारकिर्दीला बहर आला. 1991 या वर्षी ‘मटा’ने त्यांची दिल्ली येथे विशेष प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली. काश्मिर समस्या, नवीन आर्थिक धोरण, देशभरातील विविध निवडणुका, मंडल आयोगाचा लढा, लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेनंतर बदलत असलेले देशाचे राजकारण, राजकीय आघाड्यांचे प्रयोग आदी विषयांवरील वैद्य यांची राष्ट्रीय पत्रकारिता गाजली.
वैद्य यांनी 1998 या वर्षी मुद्रित माध्यमातून टीव्ही पत्रकारितेत प्रवेश केला. टीव्ही पत्रकारिता सुरू केलेल्या पहिल्या पिढीचे ते प्रतिनिधी आहेत. झी न्युजचे मुंबई ब्युरो चीफ म्हणून त्यांचा टीव्हीवरील प्रवास सुरू झाला. पहिले मराठी खासगी चॅनल तारा टीव्हीत ते दाखल झाले. पण पुन्हा झी माध्यम समूहात ते परतले. त्यांच्या नेतृत्वात झी चा मराठीसह इतर भाषांतील वाहिन्यांचा वटवृक्ष निर्माण झाला. सुरुवातीच्या काळात अल्फा या ब्रॅण्डनेमने सुरू झालेल्या वाहिन्यांचे नामकरण नंतर झी असेच करण्यात आले. अल्फा व झी मराठी वरील दर्जेदार, निखळ मनोरंजन व प्रबोधन करणाऱ्या मालिकांनी रसिकांच्या मनावर राज्य केले. मराठी, गुजराथी, पंजाबी व बंगाली चॅनलचे ते प्रमुख होते. झी समूहाची चित्रपट निर्मिती कंपनी झी टॉकीज वैद्य यांच्याच नेतृत्वात सुरू करण्यात आली. झी चे उपाध्यक्ष ते चीफ बिझनेस हेड ही पदे भुषविल्यानंतर त्यांनी हा प्रवास थांबवला.
ADVERTISEMENT
लोकमान्य मालिकेची निर्मिती
दरम्यानच्या काळात स्टार प्लस या वाहिनीचे बिझनेस हेड म्हणूनही ठसा उमटवला. त्यांनी दशमी क्रिएशन ही संस्था स्थापन केली. या संस्थेने निर्माण केलेल्या मराठी व टीव्ही मालिकांनी इतिहास घडवला आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा ‘, ‘सावित्रीज्योती, ‘अहिल्याबाई होळकर ‘ या त्यांच्या मालिका घरोघरी पाहिल्या गेल्या. मुळात नितीन वैद्य यांची जडणघडण राष्ट्र सेवा दलात झालेली असल्याने या मालिका निर्माण करण्याचे धाडस केलेच शिवाय त्या यशस्वी करूनही दाखवल्या. अलिकडच्या काळात पुस्तके वाचण्याची सवय कमी होत आहे. टीव्ही व मोबाईल हे नवीन पिढीचे माध्यम आहे. हे हेरून महाराष्ट्राच्या या महामानवांचे कार्य वैद्य यांनी टीव्हीवरून घराघरात पोहोचवले. विशेषतः वाचनाची सवय नसलेल्या, वाचनासाठी वेळ नसलेल्या व अशिक्षित समुहापर्यंत या महामानवांचे चरित्र पोहोचवण्याचे क्रांतिकारक कार्य त्यांनी केले आहे. याच कार्याबद्दल डॉ. ना. य. डोळे स्मृती पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. वैद्य यांनी अनेक चित्रपटांचीही निर्मिती केली आहे. सध्या सुरू असलेली ‘लोकमान्य’ या टिळकांवरील मालिकेची निर्मितीही त्यांचीच.
ADVERTISEMENT
नितीन वैद्य यांची प्रदीर्घ कारकीर्द टीव्ही व पत्रकारिता क्षेत्रात असली तरी त्यांचे बालपण व तारुण्य चळवळीत गेले आहे. ते लहानपणापासून राष्ट्र सेवा दलाचे सैनिक आहेत. छात्रभारती या विद्यार्थी संघटनेच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. संघटनेच्या पहिल्या फळीचे ते धडाडीचे कार्यकर्ते. त्यांनी 1980 च्या दशकात अनेक आंदोलनात सहभाग घेतला. मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. मराठवाडा विद्यापीठ नामांतरवादी कृती समितीचे ते मुंबई विभागाचे सचिव होते.
कोण होते प्राचार्य डॉ. ना. य. डोळे?
डॉ. ना. य. डोळे हे उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे स्थापनेपासून निवृत्तीपर्यंत 28 वर्षे प्राचार्य होते. महाराष्ट्र व कर्नाटकाच्या सिमेवरील अत्यंत दुर्गम व डोंगराळ भागातील शेकडो विद्यार्थ्यांना घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. थोर समाजवादी नेते, संयुक्त महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष साथी एस. एम. जोशी यांच्या सूचनेनुसार ते मराठवाड्यात आले. त्यांच्या वैचारिक मार्गदर्शनामुळे या परिसरातील चळवळींना मोठे बळ मिळाले. ते राष्ट्र सेवा दलाचे सैनिक व छात्रभारती या विद्यार्थी संघटनेचे संस्थापक सल्लागार होते. महाराष्ट्रातील समाजवादी चळवळींना त्यांचा मोठा आधार वाटत असे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT