आता वरिष्ठ पोलीस अधिकारीही करणार रात्रपाळी, आयुक्त संजय पांडेंचा महत्वपूर्ण निर्णय
– मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार हाती आल्यानंतर संजय पांडे यांनी लोकपयोगी निर्णयांमधून स्वतःची वेगळी छाप पाडायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावरुन नागरिकांच्या संपर्कात राहणं, रस्त्यावरील बेवारस वाहनांची सोय, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यापासून ते मुंबईकरांना रविवारच्या दिवशी मोकळे फुटपाथ मिळावेत यासाठी संजय पांडे कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहेत. […]
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार हाती आल्यानंतर संजय पांडे यांनी लोकपयोगी निर्णयांमधून स्वतःची वेगळी छाप पाडायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावरुन नागरिकांच्या संपर्कात राहणं, रस्त्यावरील बेवारस वाहनांची सोय, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यापासून ते मुंबईकरांना रविवारच्या दिवशी मोकळे फुटपाथ मिळावेत यासाठी संजय पांडे कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहेत. यात आणखी एक भर म्हणून आयुक्त संजय पांडे यांनी आता, मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही रात्रपाळी करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई पोलीस दलातील कनिष्ठ अधिकाऱ्यांप्रमाणेच आता सह आयुक्त, अपर पोलीस आयुक्त यांनाही नाईट ड्युटी करावी लागणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी आता यापुढे वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही जागता पहारा असणार आहे.
मुंबई हे शहर कधीही झोपत नाही असं म्हटलं जातं. २४ तास या शहरात काही ना काही घडामोडी घडत असतात. सध्याच्या घडीला मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यातील अधिकारी, अतिरीक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त हे रात्र पाळीवर शहरात गस्त घालण्यासोबतच विविध ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाचं पर्यवेक्षण करतात. याचसोबत आता सहआयुक्त आणि अपर पोलीस आयुक्त देखील रात्र पाळीवर आपलं कर्तव्य बजावणार आहेत.
सह आयुक्त १५ दिवसांतून एकदा, अपर पोलीस आयुक्त १० दिवसांतून एकदा तर डीसीपी आणि एसीपी सात दिवसांतून किमान एकदा नाईट ड्युटी करतील असे आदेश पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी काढले आहेत. रात्री १२ ते पहाटे चार या वेळेत हे वरिष्ठ अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात गस्त घालणार आहेत. इतकच नव्हे तर खुद्द आयुक्त संजय पांडेही महिन्यातून एकदा रात्रपाळी करणार असल्याचं समजतंय. मुंबई पोलिसांच्या इतिहासात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्रपाळी करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं बोललं जातंय.