प्रबोधन शताब्दीनिमित्त प्रबोधनकारांच्या त्यागाचं स्मरण करायलाच हवं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सचिन परब

ADVERTISEMENT

`प्रबोधन` हे फक्त एक नियतकालिक नव्हतं, तर तो केशव सीताराम ठाकरे या फाटक्या संपादकाच्या सत्याप्रती निष्ठेचा आणि सर्वसामान्यांविषयी कळकळीचा दस्तावेज होता. आज `प्रबोधन`ची शताब्दी साजरी करताना प्रबोधनमधल्या प्रबोधनकारांच्या विचारांचं मोल नव्याने समोर येत आहे. या निमित्ताने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडून प्रबोधनमधील प्रबोधनकारांच्या लेखांचा संग्रह तीन खंडांत प्रकाशित होत आहे. या ग्रंथातील संपादकीयाचा हा संपादित भाग.

हे वाचलं का?

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे. महाराष्ट्राच्या इतिहास आणि भूगोलालाही वळण लावणारी थोर व्यक्तिमत्वं विसाव्या शतकात होऊन गेली, त्यातलं एक महत्त्वाचं नाव. महात्मा फुले यांच्या सत्यशोधनाचा विचार पुढे नेणारे आक्रमक विचारवंत, भिक्षुकशाहीचा कर्दनकाळ ठरलेले समाजसुधारक, हुंड्यासारख्या चालीरितींविरुद्ध उभे ठाकलेले सामाजिक कार्यकर्ते, मराठी पत्रकारितेला नवी दिशा देणारे संपादक, जातनिष्ठ इतिहासलेखनाचा फोलपणा दाखवून इतिहासाची नवी मांडणी करणारे इतिहासकार, महाराष्ट्रभर सातत्याने फिरून विद्रोहाची पेरणी करणारे ज्वलंत वक्ते, समाज सुधारणांना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारे नाटककार, दिग्दर्शक आणि निर्मातेही, मोजक्याच पण ठसकेबाज भूमिका करणारे लक्षवेधी अभिनेते, सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे संस्थापक, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे गुरुतुल्य मार्गदर्शक, संयुक्त महाराष्ट्र प्रत्यक्षात आणण्यासाठी वयाच्या सत्तरीत तुरुंगवास भोगणारे आंदोलनाचे नेते, गेल्या अर्धशतकापेक्षाही जास्त काळ महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या ठाकरे कुटुंबाचे प्रेरणास्थान, याशिवाय लेखक, कवी, संगीतकार, सतारवादक, चित्रकार, फोटोग्राफर, शिक्षक, उद्योजक, विक्रेते, जनसंपर्क अधिकारी अशा विविध भूमिकांत वावरलेल्या अफाट बहुआयामी व्यक्तिमत्वाचं कर्तृत्व शब्दांत पकडणं कठीण आहे.

प्रबोधनकारांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ आणि मृत्यू २० नोव्हेंबर १९७३चा. त्यांना ८८ वर्षांचं दीर्घायुष्य लाभलं. हा बहुरंगी माणूस एका आयुष्यात अनेक आयुष्य जगला. पण त्यात त्यांची ओळख बनलं ते त्यांनी संपादित केलेलं `प्रबोधन` हे नियतकालिक. १६ ऑक्टोबर १९२१ ला `प्रबोधन` नियतकालिकाचा पहिला अंक मुंबईहून प्रकाशित झाला. त्याला २०२१च्या १६ ऑक्टोबरला शंभर वर्षं होतील. `प्रबोधन`चा शेवटचा अंक मार्च १९३० ला प्रसिद्ध झाला. या दरम्यान साधारण सहा प्रकाशन वर्षांत एकूण ९५ अंक प्रसिद्ध झाले. त्यापैकी ९१ अंक आज अभ्यासकांनी शोधून काढलेत.

ADVERTISEMENT

`

ADVERTISEMENT

`प्रबोधन` नियतकालिकाने घडवलेली जागृती हा महाराष्ट्राच्या समाज प्रबोधनाच्या, समाज सुधारणेच्या आणि पत्रकारितेच्या इतिहासाचा फार महत्त्वाचा भाग आहे. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर गांधीयुगाला सामोरं कसं जावं याविषयी महाराष्ट्र गोंधळलेला होता. त्याचबरोबर वेदोक्त प्रकरण आणि त्यातून निर्माण झालेला ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद टोकाला गेल्याने महाराष्ट्र हादरलेला होता. या पार्श्वभूमीवर `प्रबोधन`चा जन्म झाला. त्यानंतरच्या म्हणजे १९२०च्या दशकातल्या जवळपास नऊ वर्षांच्या महत्वाच्या नोंदी `प्रबोधन`मध्ये आहेत. किंबहुना `प्रबोधन` हा या सगळ्या सामाजिक आणि राजकीय घुसळणीचा एक भाग आहे. पहिल्या महायुद्धानंतर अमेरिका आणि जपान यांचा महासत्ता म्हणून होणारा उदय, असहकार आंदोलन, मोपल्यांचा मलबार येथील हिंसाचार, खिलाफत चळवळ या राष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी, तसंच १९२३ची प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका, त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीतल्या हालचाली, ब्राह्मणी वर्चस्ववाद्यांच्या कारवाया, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यांमुळे झालेले वाद, मुळशी सत्याग्रह, या महाराष्ट्रातल्या घडामोडींवर प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्या महाराष्ट्रभर उत्तम जनसंपर्क असलेल्या अभ्यासू संपादकाने केलेली भाष्यं हा आज एक ऐतिहासिक दस्तावेज आहे.

त्यापेक्षाही महाराष्ट्रातल्या सामाजिक संघर्षाचा तपशीलवार पट `प्रबोधन`मधून उभा राहतो, तो महत्त्वाचा आहे. `मराठी वृत्तपत्रांचा इतिहास` या ग्रंथात रा. के. लेले म्हणतात, `ठाकरे यांच्या `प्रबोधन` पत्राची कारकीर्द अवघी पाचसहा वर्षांचीच होती. पण तेवढ्या अल्पावधीत त्याने केलेली वृत्तपत्राच्या व सामाजिक चळवळीच्या क्षेत्रांतील कामगिरी न विसरता येण्यासारखी आहे. ठाकरे ह्यांच्या पत्राचे स्वरूप राजकीय प्रश्नांवर भर देणारे नव्हते. आगरकरांप्रमाणे सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करणारे हे पत्र होते. आगरकरांच्या सामाजिक सुधारणांचा पाया अत्यंत शास्त्रशुद्ध होता. पण त्यांनी ज्या सुधारणांचा पुरस्कार केला, त्या पांढरपेशा वर्गापुरत्याच मर्यादित होत्या. त्यांच्या सुधारणावादाचे आवाहन बहुजन समाजापर्यंत पोचले नाही. त्यांनी म. जोतीराव फुले यांनी प्रसृत केलेले विचार व केलेले कार्य ह्यांची दखल घेतल्याचेही आढळत नाही. या दृष्टीने पाहीले तर ठाकरे ह्यांनी प्रबोधनाद्वारा ज्या सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला त्या अधिक व्यापक होत्या… या दृष्टीने ह्यांचे `प्रबोधन` आगरकरांच्या पुढे काही पावले गेलेले होते.`

`प्रबोधन`ने त्याच्या प्रकाशनकाळात महाराष्ट्रावर कसा प्रभाव टाकला, हे आचार्य अत्रेंच्या या उताऱ्यावरून लक्षात येऊ शकतं, `अच्युतराव कोल्हटकर यांच्या `संदेश` या पत्राने महाराष्ट्रात जी जागृती आणि खळबळ केली, तशाच प्रकारची खळबळ ठाकरे यांच्या `प्रबोधन`ने करून सोडली, असे म्हणावयास प्रत्यवाय नाही. सदर मासिकामध्ये पाच सहा वर्षेपर्यंत निरनिराळ्या सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक विषयांवर खळबळीत लेखमाला आणि निबंध लिहून ठाकरे यांनी बहुजन समाजाचे अक्षरशः `प्रबोधन` केले, यात संशय नाही. भिक्षुकी वृत्तीच्या आणि सनातनी दृष्टीच्या ब्राह्मण समाजावर अनेक निकराचे हल्ले त्यांनी आपल्या या पाक्षिकात चढविले, त्यामुळे `कोदण्डाच्या टणत्कारा`पासून ब्राह्मण विद्वानांत अप्रिय झालेले त्यांचे नाव अधिकच तीव्रतेने त्या समाजाच्या डोळ्यांत सलू लागले. तथापि, सनातनी भिक्षुक समाजात हे जितके अप्रिय ठरले, तितकेच ब्राह्मणेतर समाजामध्ये ते लोकप्रिय होऊन बसले.`

प्रबोधनकारांनी मराठी समाजातले अनेक दोष १०० वर्षांपूर्वी दाखवलेले आहेत, जे आजही जसेच्या तसे आहेत. हुंड्याच्या विरोधात त्यांनी आंदोलनही केलं. पण आजही हुंडा थांबलेला नाही. भिक्षुकशाहीच्या विरुद्ध त्यांनी रणशिंग फुंकलं होतं. पण आज जुनीच भिक्षुकशाही नवे मुखवटे घालून तसंच शोषण करते आहे. महाराष्ट्रातील इतिहास अजूनही स्वजातिभिमानाच्या चिखलात रुतून बसलाय. महिला सक्षमीकरणाची प्रबोधनकार सांगत असलेली निकड अजूनही कायम आहे. पूर्वीइतकी तीव्र अस्पृश्यता उरली नसली तरी जातिभेदाचे दुष्परिणाम महाराष्ट्र अजूनही भोगतोच आहे. महाराष्ट्रातल्या तरुणाला `मानसिक गुलामगिरीविरुद्ध बंड` करण्याची ताकद आजही `प्रबोधन`कारांचे हे लेख देऊ शकतात. बहुजनवाद, हिंदुत्ववाद, गांधीवादच नाही तर कम्युनिझमविषयी आजच्या संदर्भात विचार करताना त्यांचा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो.

इंग्रजी शाळेत असतानाच प्रबोधनकारांनी इंग्रजीतून मराठीत अनुवाद केलेले दोन लेख करमणूक या आघाढीच्या साप्ताहिकात छापून आले होते. त्यांनी घरात दाबयंत्र तयार करून विद्यार्थी नावाचं हौशी साप्ताहिक चालवलं होतं. `प्रबोधन`कारांचं जन्मगाव पनवेलमध्ये पहिलं साप्ताहिक हे १९५०च्या सुमारास निघालं. तेही अल्पायुषी निघालं. १९६७ला किल्ले रायगड हे दीर्घकाळ चाललेलं पहिलं साप्ताहिक पनवेलमधून सुरू झालं. हे लक्षात घेता एकोणिसाव्या शतकातच प्रबोधनकारांनी केलेला साप्ताहिक विद्यार्थीच्या प्रयोगाचं मोल लक्षात येतं. १७-१८व्या वर्षी ते मुंबईच्या प्रसिद्ध तत्त्वविवेचक छापखान्यात असिस्टंट प्रूफरिडर म्हणून काम केलं. नंतर ते अनेक नियतकालिकांत सातत्याने लिहित होते. वयाच्या विशीत सांगलीकर नाटक मंडळीत असतानाच्या पंढरपूर आणि विजापूर अशा दोन शहरांतल्या मुक्कामांचं वर्णन त्यांनी केलंय. त्या दोन्ही ठिकाणी अनोळखी असणारे त्यांचे चाहते वाचक त्यांना शोधत आल्याचे उल्लेख आहेत. म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या नियतकालिकांत लिखाणाचा एक चाहतावर्ग तयार झाला होता. जळगावात असताना प्रबोधचंद्रिका साप्ताहिकाचे संपादक नारायण नरसिंह उर्फ नानासाहेब फडणीसांनी `प्रबोधन`कारांमधला संपादक नेमका हेरला आणि त्यांना एक सारथी नावाचं मासिक सुरू करायला लावलं. ते वर्षभर चाललं. प्रबोधनकारांच्या नोंदीनुसार हे सगळं १९०६-०७ मध्ये घडत होतं. याचा अर्थ प्रबोधनकार अवघ्या २१-२२व्या वर्षी संपादक बनले.

इतिहासाचार्य वि. का. राजवाडेंनी भारत इतिहास संशोधन मंडळाच्या चौथ्या वर्षाच्या अहवालात कायस्थदीप या पुस्तकावर एक २२ पानी लेख छापला. त्यात चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजे सीकेपी समाजाची कुळी हीन असल्याचा आरोप केला. प्रबोधनकारांनी राजवाडेंचं संशोधन खोडून काढणारं पुस्तक लिहायचं ठरवलं. त्याचं कारण ते सांगतात, `एका काळच्या सत्तामदाने शिरजोर झालेले ब्राह्मण पंडित, इतिहास संशोधनाच्या किंवा आखणी कसल्या तरी फिसाटाच्या पांघरुणाखाली कायस्थादी ब्राह्मणेतरांवर आणि अनेक चित्पावनेतर ब्राह्मणांवरही हल्ले चढवायला सवकलेले आहेत. त्यांचा एकदा कायमचा पुरा बंदोबस्त केलाच पाहिजे या हिरीरीने मी कोदण्डाचा टणत्कार हे पुस्तक लिहून प्रसिद्ध केले.` कोदण्डाचा टणत्कार अर्थात भारत इतिहास संशोधन मंडळास उलट सलामी हे तडाखेबंद पुस्तक १७ नोव्हेंबर १९१८ला प्रकाशित झालं. या ग्रंथाच्या सहा हजार प्रती अवघ्या पंधरा दिवसात संपल्याचा दावा प्रबोधनकारांनी केला आहे. कारण प्रबोधनकारांचा हा प्रतिवाद फक्त सीकेपींचा उरलेला नव्हता, तर तो ब्राह्मणी संशोधकांच्या बदनामी मोहिमांमुळे अस्वस्थ असलेल्या सगळ्याच ब्राह्मणेतरांचा झाला होता. याच दरम्यान वेदोक्त प्रकरण गाजत होतं. जातवर्चस्ववादाचं हिडीस रूप महाराष्ट्र बघत होता. त्यातून `प्रबोधन`कारांचंही विचारचक्र सुरू होती. त्यातून ते एका निष्कर्षापर्यंत पोचले, ब्राह्मणेतर समाजाची पहिली गरज ही भिक्षुकशाहीच्या सापळ्यातून मुक्तता ही आहे. दुसरीकडे छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेने सत्यशोधकी नियतकालिके सुरू करण्याचा धडाका सुरू होता. प्रबोधनकारांचा तर त्यांच्याशी आत्मीय स्नेह निर्माण झाला होता. त्यातून प्रबोधनकारांनी १९२१च्या सप्टेंबर महिन्यात स्वतःचं वृत्तपत्र काढण्याचा निर्णय घेतला. `प्रबोधन`चा पहिला अंक १६ ऑक्टोबर १९२१ ला प्रसिद्ध झाला.

`प्रबोधन`च्या कामासाठी प्रबोधनकारांनी दादरमधल्याच खांडके बिल्डिंगमध्ये एक ब्लॉक भाड्याने घेतला होता. तिथे अनेक तरुण `प्रबोधन`कारांकडे ओढले गेले. अभ्यास करण्यासाठी ते दिवसभर तिथेच असत. त्यातून स्वाध्यायाश्रम नावाची संस्था सुरू झाली. या तरुणांनी हुंडा विध्वंसन संघ स्थापन करून मुंबईत एक वादळच निर्माण केलं होतं. या संघटनेने प्रामुख्याने सीकेपी समाजातली हुंडा घेऊन होणारी लग्नं उधळून लावली. हुंडा निषेधाची गाणी गात मोठ्या मिरवणुका काढल्या. गाढवाच्या वराती घेऊन लग्नाच्या ठिकाणी हल्लाबोल केला. १९२२ -२३च्या लग्नसराईत २०-२५ लग्नात हुंडा विध्वंसन संघाने धुमाकूळ घातला होता. या आंदोलनाला `प्रबोधन`चा सक्रिय पाठिंबा होता. खरं तर `प्रबोधन`च्याच नेतृत्वात हे सुरू होतं. हुंडा विरोधामागचा विचार `प्रबोधन`नेच समजावून सांगितला होता. हुंडा घेऊन लग्न करणाऱ्यांची नावं `प्रबोधन`मध्येच प्रसिद्ध होत.

याच काळात प्रबोधनकारांनी सरकारी नोकरी सोडली. त्यासाठी प्रबोधनकारांच्या आईचा विशेष आग्रह होता. त्या नेहमी सांगत की वेळ आली तर भीक माग पण इंग्रज सरकारची नोकरी करू नकोस. सरकारने परवानगी दिल्यामुळे `प्रबोधन` सुरू ठेवण्यात तांत्रिकदृष्ट्या अडचण काहीच नव्हती. पण प्रबोधनकारांच्या मनाला ते पटत नव्हतं. ते लिहितात, `एकीकडे नोकरी नि दुसरीकडे बहुजन समाज जागृतीचे कार्य, अशा परस्पर विरुद्ध दोन टोकांवरच्या डगरीवरचा कसरती खेळ माझ्या स्वभावाला पटेनासा झाला. सद्सद्विवेकबुद्धी सारखी टोचण्या देऊ लागली. सभांतून सरकारी धोरणांवर टीका करायची आणि प्रबोधनात मानसिक दास्याविरुदध बंड या विषयावर स्पष्टोक्तीची लेखमाला लिहायची हे मला सहन होईना.` केवळ आपले विचार आणि कृती यात तफावत राहू नये, यासाठी अडीचशे रुपये मासिक पगाराची नोकरी सोडून पुन्हा गरिबीत उडी घेणारा संपादक विरळाच. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाने केलेल्या त्यागाची दखल मात्र इतिहासाने हवी तशी घेतलेली नाही.

`प्रबोधन`ला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे त्यांना `प्रबोधन`ची पानं आणि प्रती वाढवण्याची इच्छा होती. स्वतंत्र छापखाना नसल्यामुळे त्यांच्या या मनसुब्यात अडचणी येत होत्या. साताऱ्यातील उद्योजक धनजीशेठ कूपर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना `प्रबोधन`कारांकडे पाठवले. साताऱ्याजवळच्या पाडळी या गावात छापखाना उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. त्याला भुलून प्रबोधनकारांनी `प्रबोधन`चा कारभार साताऱ्याला हलवण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीच्या दरम्यान प्रबोधनकारांनी कूपर यांच्या गटातले भास्करराव जाधव यांच्याविरोधात भूमिका घेतली. तसंच त्यांनी `अस्पृश्यांनो स्पृश्यांपासून सावधान` असं स्फुट प्रबोधनात लिहून बॉम्ब टाकला होता. परिणामी या दोघांच्या विरोधात कूपरने षडयंत्र रचायला सुरवात केली. त्यामुळे प्रबोधनकारांनी त्यात सगळा हिशेब देऊन कफल्लकपणे सातारा सोडला. `प्रबोधन`प्रेमी रामचंद्र उर्फ बापूसाहेब चित्रे यांनी पुण्यात कर्जात बुडालेला एक छापखाना विकत घेतला होता. त्याचा व्यवहार करण्यासाठी छापखान्याचा मालक, ज्याचा उल्लेख प्रबोधनकार गायतोंड्या भट असा करतात, सातारा रोडला प्रबोधनकारांना भेटायला आला होता. तो आला त्याच दिवशी `प्रबोधन`कारांची एक मुलीचं डायरियाने अचानक निधन झालं. तिचे अंत्यसंस्कार करत असतानाच घाईत असलेल्या छापखाना मालकाशी जड हृदयाने व्यवहाराच्या गोष्टीही करत होते. ते बघून प्रबोधनकारांच्या पत्नीने त्यांना सुनावलं, `प्रबोधनापुढे पोटच्या गोळ्याची सुद्धा यांना तिडीक येत नाही.` तो उद्वेग स्वाभाविक असला तरी तो एका संपादकाच्या निष्ठेचा सन्मानही होता.

साताऱ्यातून प्रकाशित झालेल्या तिसऱ्या वर्षाच्या १७व्या अंकातच पुढचा अंक पुण्यातून प्रकाशित होणार असल्याची घोषणा झाली. त्यानुसार सदाशिव पेठेत घर आणि बुधवार पेठेत छापखाना असा संसार त्यांनी थाटला. पण पुण्यातल्या काही सनातनी ब्राह्मणांनी मूळ मालकाला छापखाना प्रबोधनकारांना न देण्यासाठी उचकवलं. त्याला बळी पडून त्याने छापखान्याला टाळं लावलं. सनातन्यांनी `प्रबोधन`च्या नावाची पाटीही भररस्त्यात जाळली. वर पुण्यात `प्रबोधन`ला जाळून खाक करू अशी शेखी मिरवली. त्यामुळे पुण्यातच `प्रबोधन`चा छापखाना उभारण्याची प्रतिज्ञा प्रबोधनकारांनी केली. तोवर `प्रबोधन`चा तिसऱ्या वर्षाचा शेवटचा एकच अंक प्रकाशित होऊ शकला. प्रबोधनकारांनी नव्या छापखान्यासाठी कर्ज आणि देणग्या मिळवल्या. त्यातून सदाशिव पेठेत छापखाना उभा करण्याची तयारी झाली. पण प्रबोधनकारांनी मुंबईतून विकत घेऊन पाठवलेलं ट्रेडल मशीनचं चाक रेल्वेने पुण्यात पोहचेपर्यंत तुटलं. तरीही धीर न सोडता प्रबोधनकारांनी भांडवल उभं करण्यासाठी धावाधाव सुरूच ठेवली. त्यासाठी मुंबईत असताना धावपळीमुळे ते आजारी पडले. त्यातून बाहेर यायला चार महिने लागले. अर्धी मशिनरी पुण्यात, उरलेली अर्धी मुंबईत दुरुस्त होतेय, कारागिरांचे पगार थकलेत, उपचारासाठीही पैसे नाहीत अशी भयंकर परिस्थिती होती. पण यातून बाहेर येत १९२५च्या जानेवारीत ते कसेबसे पुण्याला पोचले. पुन्हा `प्रबोधन` उभं करण्याच्या प्रयत्नांना लागले. पुढच्या चार महिन्यांत मशीन सातवेळा तुटलं. इतरही अडचणी येतच राहिल्या.

या सगळ्या अडचणींतून मार्ग काढत ९ महिन्यांच्या खंडानंतर `प्रबोधन` १९२५च्या एप्रिल महिन्यात पुन्हा एकदा सुरू झाला. `प्रबोधन`ला देवाज्ञा झाली अशी टीका करणाऱ्यांना `प्रबोधन`ने नव्याने सुरुवात करून उत्तर दिलं. चौथ्या महिन्याचा पहिला अंक हा आता पाक्षिक नसून मासिक होता. पानांची संख्या ४० होती. पुढे नोव्हेंबर १९२७ पर्यंत ३२ महिन्यांत मासिक `प्रबोधन`चे २२ अंक निघाले. त्याचसोबत प्रबोधनकारांनी ३१ ऑगस्ट १९२७ पासून लोकहितवादी हे नवीन साप्ताहिकही सुरू केलं. त्याचा शेवटचा तेरावा अंक पुण्याहूनच डिसेंबर १९२७ला निघाल्याचा उल्लेख शनिमहात्म्य या पुस्तकामध्ये आहे. म्हणजे जून १९२४ ला पुण्यात आल्यापासून नोव्हेंबरमध्ये मुंबईत परतेपर्यंत प्रबोधनकार अनंत अडचणींवर मात करत आणि सनातन्यांच्या नाकावर टिच्चून `प्रबोधन` जगवत राहिले.

प्रबोधनकार पुण्यात होते त्या काळात ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद अगदी टोकाला पोहोचला होता. ब्राह्मणेतर पक्षाचे नेते केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर त्यांना भेटण्यासाठी जवळपास दररोज `प्रबोधन` कचेरीत येत. शिवाय लोकमान्य टिळकांचे सुपुत्र रामभाऊ आणि श्रीधरपंत हेही असत. त्यामुळे या सगळ्याचे सूत्रधार प्रबोधनकारच असल्याचा समज पुण्यात पसरला होता. विशेषतः देशाचे दुष्मन हे पुस्तक प्रबोधनकारांनीच लिहिलं असल्याचं अनेकांना वाटत होतं. प्रबोधनकारांचा छापखाना अगदी ब्राह्मणी वस्तीमध्ये असल्याने त्यांना या सगळ्याचा त्रास भोगावा लागत असे. एका सभेवरून घरी जाणाऱ्या सनातन्यांनी `प्रबोधन`च्या छापखान्यावर जाऊन जवळपास दोन तास शिव्याशाप दिले. कारखान्याच्या नावाचा फलक खाली पाडला. त्यानंतर पुढच्याच आठवड्यात ते पर्वतीजवळ फिरायला गेले असताना तीन चार जणांनी लाठीहल्ला केला. पण प्रबोधनकारांनी वॉकिंग स्टिकमधली गुप्ती बाहेर काढल्याने ते पळून गेले. खोटी निमंत्रणपत्रिका बनवून छापखान्याला पोलिसी प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्नही केला गेला. गोडबोले नावाचा एक गुंड प्रबोधनकारांना भेटायला आला. छापखान्यातल्या कामगारांमुळे तो काही करू शकला नाही. पुढे पोलिसांना सांगून त्याचा बंदोबस्त करावा लागला. त्यांच्या लिखाणाला प्रक्षोभक ठरवून कोर्टात जाण्याचेही प्रयत्न केले. छापखान्यात आगीचा गोळा टाकून कागदाच्या थप्प्यांना आगही लावण्यात आली. शिवाय मेलेली कुजलेली कुत्री दारासमोर फेकण्यात आली. एकदा तर मेलेलं गाढवही टाकण्यात आलं. अनेकदा पैसे देऊनही छपाईसाठी चांगला कागद मिळून दिला जात नसे. तसंच पुण्यातल्या ब्राह्मण एजंटांनी `प्रबोधन`वर बहिष्कारही घालून बघितला. `प्रबोधन`चे अंक विकलात तर केसरी, ज्ञानप्रकाशचे अंक मिळणार नाहीत, असा दबाव त्यांनी विक्रेत्यांवर आणला. पण `प्रबोधन` छापखान्यातल्या कामगारांनी चौकाचौकात विकून त्यावर मात केली. तसंच चांगलं कमिशन दिल्याने विक्रेतेही नरम पडले. अनेकदा तर अंक वाचकांपर्यंत जाऊ नयेत यासाठी एकगठ्ठा विकतही घेतले जात. या सगळ्या अडचणींवर मात करत प्रबोधनकार पुण्यात `प्रबोधन` चालवत होते. एका मोठ्या जातीचा, सत्ताधाऱ्याचा किंवा चळवळीचाही थेट पाठिंबा नसताना पुण्यात भिक्षुकशाहीच्या विरोधात संघर्ष करणं महाकठीण होतं. त्यासाठी प्रबोधनकारांसारखा वीर योद्धाच हवा होता. खुद्द सदाशिवपेठेत राहून ब्राह्मणेतरी विचारांचे `प्रबोधन`चे २२ आणि लोकहितवादीचे १३ अंक प्रकाशित करणं, यासाठीची हिंमत कळण्यासाठी तो काळ समजून घ्यावा लागेल.

चौथ्या वर्षाच्या काळात प्रबोधनकारांनी इंदूरचे राजे तुकोजीराव होळकर यांना खुनी ठरवणाऱ्या बावला मुमताज प्रकरणावर आपली लेखणी जोरात चालवली. त्यातल्याच `टेम्प्ट्रेस` या लेखात `द बॉम्बे क्रॉनिकल` या वर्तमानपत्राचे प्रख्यात ब्रिटिश संपादक बी. जी. हॉर्निमन यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे चिडून त्यांनी प्रबोधनकारांच्या विरोधात मुंबईतल्या कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला. त्यासाठी वकील द्यायला प्रबोधनकारांकडे पैसे नव्हते. त्यामुळे `प्रबोधन`चे अनेक प्रेमी मदत करण्यासाठी पुढे आले. याच खटल्यासाठी ७ नोव्हेंबर १९२७ला मुंबईत आल्यावर प्रबोधनकार पुन्हा एकदा गंभीर आजारी पडले. ते एकटेच नाहीत तर पत्नी, मुली आणि मुलगा असं संपूर्ण कुटुंबच वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त झाले. त्यामुळे मुंबईत अडकलेले प्रबोधनकार पुन्हा `प्रबोधन` चालवण्यासाठी पुण्यात जाऊ शकले नाहीत.

`प्रबोधन` जवळपास दोन वर्ष बंद होतं. त्यानंतर ते १९२९च्या दसऱ्याला पुन्हा सुरू झाला. तो क्रांन्त्यंक असं नाव होतं. किल्ल्यातून बाहेर येणारा वाघ त्यावर दिसत होता. प्रबोधनकार नावाच्या वाघानेही नव्याने डरकाळी फोडली होती. नोव्हेंबर १९२९ पासून मार्च १९३० पर्यंत `प्रबोधन`चे पाच अंक निघालेले दिसतात. त्यानंतर `प्रबोधन`चा अंक सापडत नाही. `प्रबोधन` बंद करण्यात येत असल्याची घोषणा केलेली नाही. माझी जीवनगाथा या आत्मचरित्रात प्रबोधनकारांनी `प्रबोधन`शी संबंधित इतर घडामोडींची तपशीलवार चर्चा आहे. पण त्यात `प्रबोधन` मुंबईतून पुन्हा कसं सुरू केलं आणि ते सहा अंकात कसं बंद पडलं, याच्याविषयी काहीही सांगितलेलं नाही. फक्त उदरनिर्वाहासाठी `प्रबोधन`चा छापखाना आधी भाड्याने दिल्याचा आणि नंतर विकल्याचा उल्लेख आहे. पण या व्यवहारात मित्रांनी फसवल्यामुळे प्रबोधनकारांच्या हातात काहीच लागलं नाही. या काळात प्रबोधनकारांनी `शनिमहात्म्य` आणि `शेतकऱ्यांचे` स्वराज्य ही दोन महत्त्वाची पुस्तकं लिहिली. दोन्ही पुस्तकं त्या काळात अत्यंत लोकप्रिय झाली होती. शिवाय दादरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवातले ब्राह्मणी वर्चस्व मोडीत काढण्यासाठी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत चालवलेली चळवळ आणि त्यातून सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरुवात या त्यांच्या सार्वजनिक जीवनातल्या महत्त्वाच्या घडामोडी `प्रबोधन`च्या याच टप्प्यात झाल्यात.

`प्रबोधन`च्या शेवटच्या पर्वात म्हणजे नोव्हेंबर १९२७ ते मार्च १९३० या दरम्यान `प्रबोधन`चे फक्त सहाच अंक निघालेले आहेत. पण त्यात वेगळे प्रबोधनकार दिसतात. `प्रबोधन`ची सुरवात ईशस्मरणाने करणारे प्रबोधनकार नोव्हेंबर १९२९च्या अंकात नवी सुरुवात करताना लिहितात, `कोणत्याही कार्याच्या प्रारंभी – मग ते बॉम्ब फेकण्याचे असो नाहीतर बोंब मारण्याचे असो – कोणत्या तरी देवदेवतेचे नामस्मरणपूर्वक वन्दन करण्याचा हिन्दुजनांचा शिष्ट संप्रदाय आहे. यापूर्वीच्या माझ्या प्रत्येक ग्रंथारंभी हा शिष्ठाचार मी भक्तीपूर्वक इमानेइतबारे पाळलेला आहे… पण प्रागतिक मनुष्याने मतांच्या ठरावीकपणाला चिकटून बसण्याइतका मनाचा दुबळेपणा दाखविणे म्हणजे जगात जगण्याची आपली नालायकी सिद्ध करण्यासारखे आहे. कालपर्यंत मी देवदेवतांचे अस्तित्व मानणारा होतो. आज मी देवविषयक सर्व भावनांच्या छाताडावर बॉम्ब फेकणारा लालबुंद क्रान्तिकारक बनलो आहे.` मार्च १९३०च्या शेवटच्या अंकात ते लिहितात, `प्रबोधन निरीश्वरवादी आहे. त्याचे सत्यशोधन सत्यशोधक समाजाच्याही पुढे गेलेले आहे. देव मानवात दलाल नको, या काथ्याकुटापेक्षा देवालाच उखडला तर दलाल उरतोच कोठे?` इथे `प्रबोधन`च्या लिखाणाचं एक वर्तुळ पूर्ण होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT