गिरीश महाजनांवर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी सरकारी वकीलांचं कुभांड – फडणवीसांचा गंभीर आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. जळगावमधील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या संबंधित प्रकरणात भाजप आमदार गिरीश महाजन यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी पोलिसांना मदत केल्याचा आरोप फडणवीसांनी विधानसभेत केला आहे.

विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करणारे व्हिडीओ आणि पेनड्राईव्ह देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे.

आपल्याकडे सव्वाशे तासांचे व्हिडीओ रेकॉर्डींग आहे. यातील काही व्हिडीओ सभागृहात दाखवले तर इभ्रत जाईल. या व्हिडीओच्या माध्यमातून २० ते २५ वेब सिरीज होतील असाही टोला फडणवीसांनी सभागृहात लगावला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर २०१८ सालच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतील एका वादाप्रकरणी पुणे पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केला. या प्रकरणात मोक्का लावण्यात यावा अशी कागदपत्र तयार केली. ही सर्व कारवाई विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या सांगण्यावरुन झाल्याचा आरोप फडणवीसांनी केला.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “सरकारी वकिलांचे कार्यालय म्हणजे विरोधकांची कत्तल कशी करायची याचं कारस्थान शिजण्याचं ठिकाण आहे. गिरीश महाजनांच्या विरोधात गुन्हा कसा नोंद करायचा यापासून ते बरंच काही या कार्यालयात ठरलं. एफआयआर नोंद करणे आणि खोटे साक्षीदार तयार करण्याचं काम सरकारी वकिलांनी केलं. साक्षी कशा घ्यायच्या त्यापासून पैसे कसे घ्यायचे याचा सर्व घटनाक्रम या व्हिडीओत आहे”, असं सांगून सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप फडणवीस यांनी केले आहेत.

ADVERTISEMENT

या संभाषणात भाजप नेत्यांना अडकवण्यासाठी प्लानिंग झाल्याचंही फडणवीसांनी सांगितलं. ज्यात देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, जयकुमार रावल यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आल्याचंही या व्हिडीओत स्पष्ट होत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. साक्षीदार तयार करण्यापासून ते FIR पोलिसांना बनवून देण्यापर्यंत प्रवीण चव्हाण यांनी या प्रकरणात भूमिका बजावली. यासाठी मुंबईतील एका हॉटेलमध्ये सरकारमधील एका मंत्र्यासोबत बैठकही झाल्याचा आरोप फडणवीसांनी सभागृहात केला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

राजकारणात आम्ही विरोधक आहोत, शत्रू नाही. त्यामुळे सीबीआय चौकशीची मागणी मान्य झाली नाही तर कोर्टात जाण्याचा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे सत्तापक्षातील नेते आता या आरोपांवर काय प्रतिक्रीया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT