पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा भडका! १६ दिवसांतच लिटरमागे १० रुपयांनी महागलं इंधन
इंधन दरवाढीच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचंच दिसत असून, पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा भडका उडाला आहे. तेल वितरक कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये ८० पैशांची वाढ केली असून, याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. अवघ्या १६ दिवसांतच पेट्रोल-डिझेल १० रुपयांनी महागलं आहे. आज, बुधवारी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात लिटरमागे ८० पैशांची वाढ करण्यात आली. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या […]
ADVERTISEMENT

इंधन दरवाढीच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचंच दिसत असून, पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा भडका उडाला आहे. तेल वितरक कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये ८० पैशांची वाढ केली असून, याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. अवघ्या १६ दिवसांतच पेट्रोल-डिझेल १० रुपयांनी महागलं आहे.
आज, बुधवारी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात लिटरमागे ८० पैशांची वाढ करण्यात आली. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती नव्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. तेल वितरक कंपन्यांनी प्रति लीटर ८० पैशांची वाढ केल्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लीटर १०५.४१ रुपयांवर पोहोचले आहेत. दुसरीकडे दिल्लीत डिझेलही प्रचंड महागलं असून, एका लिटरसाठी ९६.६७ रुपये मोजावे लागत आहे.
देशाच्या आर्थिक राजधानीत तर पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा अक्षरशः भडकाच उडाल्याची स्थिती आहे. नवीन ८० पैसे दरवाढीने मुंबईत पेट्रोलचे दर १२०.५१ रुपये लीटरवर पोहोचले आहेत. तर डिझेलने कधीचीच शंभरी ओलांडली असून, नव्या दरवाढीमुळे मुंबईत डिझेलचे दर प्रति लीटर १०४.७७ रुपयांवर पोहोचले आहेत.
सीएनजीच्या दरातही वाढ
पेट्रोल-डिझेलबरोबरोच आता सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे. मागील ५ दिवसांत सीएनजीचे दर किलोमागे ६.६० रुपयांनी वाढले आहेत. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या (CNG Price) दरामध्ये वाढ केली आहे.
एमजीएलने सीएनजीच्या दरात प्रति किलो ७ रुपये तर पीएनजीमध्ये ५ रुपयांची वाढ केली आहे. ही दरवाढ ६ एप्रिलपासून लागू झाली आहे. नव्या दरवाढीमुळे मुंबई आणि परिसरात सीएनजीची किंमत ६७ रुपये प्रतीकिलो, तर पीएनजीची किंमत ४१ रुपये प्रती एससीएमवर पोहोचली आहे.
आर्थिक राजधानीबरोबरच राजधानी दिल्लीमध्येही सीएनजीच्या किंमती किलोमागे २.५० रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे दिल्लीतील नागरिकांना एका किलो सीएनजीसाठी ६६.६१ रुपये मोजावे लागणार आहेत. मागील पाच दिवसांत दिल्लीत सीएनजीचे दर ६.६० रुपयांनी वाढले आहेत.
वाढत्या दरवाढीवर सरकारची भूमिका काय?
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांबद्दल लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते की, “माझ्या मते भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात मागील दोन आठवड्यात ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. इंधन दरवाढ फक्त भारतातच झालेली नाही. एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या काळात पेट्रोलचे दर अमेरिकेत ५१ टक्के, कॅनडामध्ये ५२ टक्के, जर्मनीमध्ये ५५ टक्के, ब्रिटनमध्ये ५५ टक्के, फ्रान्समध्ये ५० टक्के आणि स्पेनमध्ये ५८ टक्क्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत,” असं त्यांनी सांगितलं.