इन्स्टाग्रामवरील ‘302 शंभर टक्के’ स्टेटसमुळे गेला जीव; आरोपींनी दिली धक्कादायक माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पिंपरी-चिंचवड शहरालगत असलेल्या तळेगाव दाभाडे परिसरात एका युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली. या प्रकरणात पोलिसांनी मयत युवकाच्या दोन चुलत भावांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. इन्स्टाग्रामवर ‘302… 100%’ असं स्टेटस ठेवल्याच्या रागातून चुलत भावाची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

पोलिसांनी काय सांगितलं?

घटनेबद्दल पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त श्रीकृष्ण प्रकाश यांनी माहिती दिली. दशांत अनिल परदेशी असे (वय 17) हत्या करण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे. या खुनाच्या प्रकरणात तळेगाव पोलिसांनी त्याचा चुलत भाऊ कमलेश परदेशी व प्रकाश लोहार यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दोघांनी या हत्या केल्याची कबुली दिली आहे.

हे वाचलं का?

दशांत व कमलेश यांची घरं शेजारीच आहेत. दशांत हा स्वतःला अधिक शक्तिशाली समजत होता आणि याच दरम्यान त्याने काही इतर मुलांना सोबत घेऊन ‘अचानक’ नावाचा एक ग्रुप बनवला होता. सहा महिन्यापूर्वी दशांत व त्याच्या मित्रांनी चुलत भाऊ कमलेश व त्याचा मित्र प्रकाश याला हॉकी स्टिकने आणि दांडक्याने जबर मारहाण केली होती.

तेव्हापासूनच दशांतने ‘302… 100%’ असं स्टेटस इंस्टाग्राम ठेवलं होतं. हे स्टेटस आपल्यासाठीच असल्याचं कमलेश व प्रकाश यांना वाटलं. काही दिवसानंतर कमलेश व प्रकाश याने दशांतशी हात मिळवणी करून आपला जुना वाद मिटवून घेतला. पण त्यानंतरही ‘302… 100%’ या स्टेटसमुळे दोघेही अस्वस्थ होते.

ADVERTISEMENT

त्यानंतर त्यांनी प्रशांतची हत्या करण्याचं ठरवलं. ते वेगवेगळं कारण सांगून दशांतला आपल्याकडे बोलावून घेण्याचा प्रयत्न करू लागले, पण दशांत त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होता. त्यामुळे त्यांनी 23 डिसेंबरच्या मध्यरात्री दोन्ही आरोपींनी दशांतला फोन करून सांगितलं की, ‘तुझ्याकडे अॅपल फोन आहे ना? चल आम्हाला पाहायचं आहे की रात्रीच्या अंधारात तुझ्या मोबाईलमध्ये फोटो कसे निघतात.’ त्यानंतर हे तिघेही याच परिसरातील एका निर्जनस्थळी गेले.

ADVERTISEMENT

तिथे गेल्यानंतर ‘तू माझ्यासमोर थांब, मी तुझा फोटो काढतो’, असं कमलेश दशांतला म्हणाला. त्यानंतर दशांतची नजर चुकवत प्रकाशने त्याच्या पाठीमागे जाऊन सोबत आणलेल्या टोकदार हातोड्याने दशांतवर हल्ला केला. कमलेशने ही अशाच पद्धतीने दुसऱ्या हातोड्याने दशांतवर हल्ला चढवत त्याची निर्घुण हत्या केली.

त्यानंतर हे दोघेही तेथून पसार झाले. नंतर गुन्ह्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मृत अवस्थेत आढळून आलेल्या दशांतच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला व गुन्ह्याचा तपास सुरू केला. घटनास्थळी कोणतेही पुरावे आढळून न आल्यानं पोलिसही चक्रावून गेले होते, पण जेव्हा पोलिसांनी दशांतच्या मोबाईल फोनच्या कॉल हिस्ट्रीची तपासणी केली, तेव्हा त्यांना कमलेशवर संशय आला व त्यांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

पोलिसांनी खाक्या दाखवताच कमलेशने मित्र प्रकाश लोहार याच्यासोबत मिळून दशांतची हत्या केल्याची कबूली दिली. त्यानंतर पोलिसांनी प्रकाशलाही ताब्यात घेऊन त्याच्या मार्फत गुन्ह्यात वापरण्यात आलेली हत्यारे व रक्ताने माखलेले कपडे जप्त केले. चौकशीत कमलेश व प्रकाश यांनी पोलिसांना सांगितलं की, ‘दशांतने आपल्या इंस्टाग्रामवर ‘302… 100%’ असा स्टेटस लिहिला होता. या गोष्टीची खंत आमच्या मनात होती. त्यामुळेच आम्ही त्याची हत्या केली. त्यानंतर दशांतच्या हत्या प्रकरणात कमलेश व प्रकाश व्यतिरिक्त आणखीन कोणी सहभागी आहे का? याचा तपास पुढे तळेगाव दाभाडे पोलिस करीत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT