Exclusive: 'जे बाळासाहेबांनी दिलं ते मीही देऊ शकलो नाही...', शरद पवारांची खणखणीत मुलाखत, जशीच्या तशी
Sharad Pawar Interview: शरद पवार यांनी मुंबई Tak ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत अनेक महत्त्वाची अशी विधानं केली आहे. वाचा शरद पवारांची संपूर्ण मुलाखत
ADVERTISEMENT
Sharad Pawar Exclusive interview: साहिल जोशी / राजदीप सरदेसाई, बारामती: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) मध्ये बारामती या मतदारसंघाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण तिथे पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना आहे. त्यामुळे पवारांसाठी ही निवडणूक अत्यंत कठीण समजली जात आहे. याच सगळ्या गोष्टींबाबत राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (19 एप्रिल) मुंबई Tak ला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. ज्यामध्ये त्यांनी काही अत्यंत महत्त्वाची विधानं देखील केली आहेत. (even i could not give what balasaheb thackeray gave sharad pawar exclusive interview as it is)
ADVERTISEMENT
या मुलाखतीत शरद पवार यांनी एक गोष्ट मान्य केली आहे की, बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेने जी एक गोष्ट लोकांना दिली ती तेही कधी देऊ शकले नाही.. आता ती गोष्ट कोणती आणि याशिवाय पवारांनी नेमकं काय-काय म्हटलं हे जाणून घेण्यासाठी वाचा शरद पवारांची संपूर्ण एक्स्क्लुझिव्ह मुलाखत.
शरद पवारांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत जशीच्या तशी...
प्रश्न: 1967 ते आतपर्यंत.. यंदाची निवडणूक तुमच्यासाठी प्रचंड अवघड आहे असं वाटतं का तुम्हाला?
हे वाचलं का?
शरद पवार: मला ही निवडणूक कठीण वाटत नाही. माझ्या दृष्टीने कठीण निवडणूक ही 1967 सालची होती. कारण तेव्हा मी पहिल्यांदा लढलो.. एक तर मी कॉलेजमधून बाहेर पडलो होतो. दुसरी गोष्ट म्हणजे इथे जो काँग्रेस पक्ष होता ते सगळ्या माझ्या विरोधी होते. ते सगळे सीनियर होते. दुसऱ्या बाजूने माझ्याविरुद्ध जो उमेदवार होता तो एका साखर कारखान्याचा चेअरमन होता. त्यामुळे जबरदस्त शक्ती होती.
सीनियर लीडरशीप आपल्या बरोबर नाही.. कारखानाच्या चेअरमन हा विरोधी उमेदवार आणि आम्ही सगळे तरुण. पण नव्या पिढीला मदत करावी ही भावना लोकांमध्ये होती आणि त्यांनी आम्हा लोकांना चांगलं मतदान केलं.
ADVERTISEMENT
मला आठवतंय मला 35 हजार मतं पडली आणि कारखान्याचे चेअरमन होते त्यांना 17 हजार मतं पडली होती. दुप्पट मतं मला पडली, पण त्यासाठी कष्ट खूप घ्यावे लागले. फिरावं लागलं, घरोघरी जाऊन लोकांना सांगावं लागलं. त्या दृष्टीने निवडणूक अत्यंत कष्टाची होती. दुसरीकडे साखर कारखानदारी ज्यांच्याकडे आहे अशा लोकांशी लढा आणि आम्ही सगळे फाटके यंगस्टर असा तो लढा होता. त्यामुळे ती निवडून आम्हाला अवघड गेली होती.
ADVERTISEMENT
त्यानंतर 1977 सालची निवडणूक आम्हाला अवघड गेली. आणीबाणीनंतरची निवडणूक.. कारण त्यावेळी संपूर्ण देशातच चित्र वेगळं होतं.
प्रश्न: आता तुमच्यासमोर आव्हान वेगळं आहे.. एका कुटुंबात मुलगी आणि सून एकमेकांविरोधात आले आहेत त्यामुळे कुठे ना कुठे पवार कुटुंब यात फूट पडल्याने तुमच्यासमोर आव्हान तर आहेच.
शरद पवार: अजित पवार आणि त्यांचं कुटुंब वगळता सगळं पवार कुटुंब हे एकत्र आहे. सगळे कामही करतात.. अजित पवारांचे सख्खे भाऊ सुद्धा हे आमच्यासोबत असून ते एका भागाची जबाबदारी घेत आहेत. सख्ख्या भावाच्या पत्नी आहेत त्या अतिशय प्रभावीपणे काम करत आहेत. सख्ख्या भावाचे चिरंजीव आहेत, ते चांगले उच्चशिक्षित आहेत तेही सगळे 12 ते 16 तास काम करत आहेत.
प्रश्न असा एकच आहे की, एका घरात आतापर्यंत ही स्थिती नव्हती. नेहमी घरात एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका होती.. त्या भूमिकेत एक सहकारी बाजूला गेला, कोणाच्या तरी सांगण्यावरून. आमच्या दृष्टीने आमची जी नेहमीची पद्धत आहे त्यापेक्षा त्यांनी (अजित पवार) वेगळा रस्ता स्वीकारला. हे याआधी कधी घडलं नव्हतं.
घडलं होतं.. वेगळ्या पद्धतीने.. माझे थोरले भाऊ.. ते हयात नाहीत. वसंतराव पवार.. ते शेकापचे होते. मी काँग्रेस पक्षाचा होतो. ते निवडणुकीला उभे राहिले होते. त्यांनी मला स्वत: सांगितलं होतं. की, तुझी विचारधारा काँग्रेसची आहे आणि माझी विचारधारा शेकापची आहे. तू तुझ्या विचारधारेप्रमाणे काम कर..
प्रश्न: पण यात आणि आत्ताच्या याच्यात फरक काय? अजित पवार म्हणत होते की, आम्हाला वाटत होतं की, भाजपसोबत जावं आणि तुम्हाला वाटत होतं की, जाऊ नये.. म्हणून वेगवेगळे झालो आहोत. त्यामुळे त्या आणि या परिस्थितीत फरक काय?
शरद पवार: फरक हा.. की, त्यावेळी माझे मोठे बंधू आणि मी.. आमचं अंडरस्टँडिंग क्लिअर होतं. त्यामध्ये मी त्यांना सांगितलेलं की, मला तुमची भूमिका पटत नाही. त्यांनी सांगितलं की, त्यांची भूमिका ही होतीच.. ते शेकापचे नेतेच होते..
इथे असं काही चित्र नव्हतं. इथे कालपर्यंत अगदी विधानसभेची निवडणूक कोणत्या पक्षावर लढवली? राष्ट्रवादी.. त्या पक्षाचे अध्यक्ष कोण होते.. तर शरद पवार.. पक्षाचे संस्थापक कोण होते शरद पवार.. त्यांचं नाव, फोटो घेऊन तुम्ही निवडणुकीला गेलात. चालू विधानसभेच्या निवडणुकीला म्हणतोय मी.. जुन्या नाही..
त्यानंतर सत्तेची सगळी केंद्र तुमच्या हवाली केल्यानंतर एक काही कारणाने.. त्याच्या खोलात आता मी जाऊ शकत नाही. इच्छित नाही.. पण तुम्ही दुसरी टोकाची भूमिका घेतली.
ज्या पक्षाच्या, ज्या नेतृत्वाच्या नावाने तुम्ही लढलात आणि यश मिळवलं ती लाइन सोडायची असेल तर पहिले तर राजीनामा तर द्यायला हवा.
प्रश्न: खरी राष्ट्रवादी कोणाची शरद पवार की अजित पवारांची..? ही लढाई महाराष्ट्रात आहे.. तर खरी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची?
शरद पवार: साधी गोष्ट आहे.. निवडणूक कोणाच्या नावाने लढलात? कोणत्या पक्षाच्या नावाने लढला, मतं कोणाच्या नावाने मागितली, फोटो कोणाचा वापरला. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मला काही भाष्य करायचं नाही. हल्ली त्यांचे काय निर्णय होतात आणि होत नाही हे सांगणं योग्य नाही.
आता साधी गोष्ट आहे की, महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक.. 48 जागांसाठी.. तर त्याच तामिळनाडूत एकाच दिवशी सगळ्या निवडणुका.. काय निवडणूक आयोग याचं स्पष्टीकरण करणार आहे? पण ती संस्था आहे.. तिच्याबद्दल लोकांमध्ये जास्त गैरसमज करणं योग्य नाही. म्हणून आम्ही थांबतोय..
त्यामुळे त्यांनी चिन्ह कोणाला द्यायचं याचा निकाल दिला. माझी खात्री आहे की, हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्ट याच्यासंबंधी निकाल देईल.
अगदी साधी गोष्ट आहे.. यांनी प्रचार सुरू केल्यानंतर सुप्रीम कोर्टात प्रकरण गेल्यावर कोर्टाने त्यांना आदेश दिले या लोकांना की, तुम्ही चिन्ह वापरत आहात तर त्या खाली लिहा की, हे प्रकरण कोर्टाच्या अधीन आहे हे लोकांना कळू द्या. याचा अर्थ सुप्रीम कोर्टाची मानसिकता काय आहे हे स्पष्ट दिसतंय.
प्रश्न: बारामतीची व्यवस्था अजित पवारांच्या हातात होती, अशा परिस्थिती जो व्यवस्था बघत होता त्यांच्याकडून तुम्हाला आव्हान देण्यात आलं आहे. तुमच्या घरातील सून उभी राहिली त्याकडे कसं पाहता.
शरद पवार: ज्यांना आपण शक्ती दिली, पुढे आणलं.. संधी दिली त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सहसा आपण एकत्र एका विचाराने काम करत आहोत.. एखादं मिशन ठरवलं.. ते मिशन पूर्ण करत असताना एका सदस्याने मिशनच्या अगदी विरुद्ध भूमिका घेतली तर आपण काय समजायचं?
एक तर काही कारणं असायची शक्यता आहे. काही लोकांनी मला येऊन सांगितलं की, सध्याचं केंद्र सरकारच्या ज्या एजन्सी आहेत त्या एजन्सींचा आम्हाला त्रास आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी तुम्ही मला मदत करा. मदत करा म्हणजे काय.. तर आपण सगळे जण तिथे जाऊन बसूया.. त्यांच्यात सामील होऊया म्हणजे आपले सगळे प्रश्न संपतील.
त्याला मी नाही म्हटल्यानंतर त्यांनी अगदी डोळ्यात पाणी आणून सांगितलं की आमच्या घरात सुद्धा चौकशी होतील. आमच्या संस्था, कारखाने या सगळ्याची चौकशी होईल.
प्रफुल पटेलांच्या घरी ईडीने वरळीतील एक मजला ताब्यात घेऊन एक ऑफिस थाटलं.
प्रश्न: अमित शाह त्यांनी अजित पवारांवर दबाव टाकून तुम्ही सुनेत्रा पवारांना सुप्रिया सुळेंविरोधात निवडणुकीत लढवा अशी दिल्लीतील राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
शरद पवार: असं दिल्लीत मी देखील ऐकलं..
प्रश्न: शरद पवार वि. अमित शाह अशी देखील एक लढाई आहे.
शरद पवार: ही गोष्ट खरी आहे की, त्यांची अपेक्षा जी होती की.. सगळ्यांनी मोदी-मोदी ही भूमिका घ्यावी.. त्याच्याशी सुसंगत भूमिका जे घेत नाही त्या लोकांना त्रास होतो. अरविंद केजरीवालांचं काय झालं, त्यांच्या सहकाऱ्यांचं काय झालं, ममताच्या सहकाऱ्यांचं काय झालं. झारखंडच्या नेत्यांचं काय झालं..?
या सगळ्या गोष्टी यापूर्वी कधी घडल्या नव्हत्या. एखाद्या विषयी चौकशी झाली.. पण निवडणुकीच्या तोंडावर हे सगळे मुद्दे काही राज्यात निर्माण करणं याचा अर्थ ही निवडणूक चांगल्या पद्धतीने होईल की नाही याबाबत शंका लोकांच्या मनात नक्की तयार होऊ शकते.
प्रश्न: तुमच्या मनात ही शंका आहे का.. की, निवडणूक मुक्त आणि न्याय्य नाहीए?
शरद पवार: माहिती नाही.. सांगता येत नाही. अजून तरी महाराष्ट्रातील जी शासकीय यंत्रणा आहे त्यावर माझा विश्वास आहे. ते चुकीच्या गोष्टी सहसा होऊ देणार नाहीत.
प्रश्न: 2019 साली तुम्ही म्हणालेले की, मला बघायचंच आहे की, आम्हाला अमित शाह इथे सरकार कसं काय बनवू देत नाहीत ते.. थेट चॅलेंज देण्यात आलं होतं. त्या बदल्यात जून 2023 मध्ये ही घटना घडली असं वाटतं का?
शरद पवार: माहीत नाही... पण जे आमच्या घरातील लोक बाजूला गेले.. त्यांचं अनेक वेळेला स्टेटमेंट माझ्या वाचनात आलं की, 'मी अमितभाईंशी बोलून आलोय त्यांची मदत आहे. तुम्ही काही काळजी करू नका.'
आमच्या दृष्टीने अमितभाई कोण महाराष्ट्रात? एकेकाळी राजकारणात, समाजकारणात प्रचंड लोकमान्यता असलेले नेते आम्ही पाहिले आहेत. ही पार्श्वभूमी आम्ही अमितभाईंची कधी पाहिलेली नाही. सत्ता हातात आहे आणि मोदींचा आशीर्वाद आहे त्याच्या आधारे काही गोष्टी घडवायच्या त्या मी घडवणार असं ते व्यक्तिमत्व आम्हाला दिसतं.
प्रश्न: शरद पवारांनी भाजप आणि शिवसेनेची जी युती होती ती तोडली.. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं.. तेव्हा विचार केला नाही का? मोदी-फडणवीसांच्या नावाने मतं त्यांना दिली.. पण युती तोडली..
शरद पवार: ते 25 वर्ष एकत्र होते.. त्यावेळी काही ते मोदी आणि अमित शाह यांच्या नावाने निवडणूक लढवत नव्हते. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने निवडणूक लढवत होते. त्यांना ज्या जागा मिळत होत्या त्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने मिळत होत्या.
मला नाही वाटत की.. नरेंद्र मोदींच्या नावाने जागा मिळत असू शकतील.. पण देवेंद्रच्या नावाने मिळतात असं वाटत नाही. पण मोदींमुळे विजय मिळाला ही गोष्ट मान्यच आहे. पण याचा अर्थ शिवसेना अशी काही तरी संघटना नव्हती. की, तिला कोणी काही महत्त्व देऊ नये.
शिवसेना ही प्रचंड कार्यकर्त्यांच संच असलेल्या लोकांचं संघटन होतं. मी तर हेही सांगतो की, महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंनी जी संघटना निर्माण केली त्या संघटनेने समाजातील लहान-लहान घटकांना जो आत्मविश्वास दिला.. किंबहुना मी सुद्धा देऊ शकलो नाही.
आता उद्या माझी औरंगाबदला सभा आहे. त्यांचे कोण उमेदवार आहेत.. चंद्रकांत खैरे.. खैरे कोणत्या समाजाचे आहेत.. तर सुतार.. सुतार समाजाची किती मतं असतील तिथे? जास्तीत जास्त तीन हजार.. चार हजार.. तर ते तीन वेळेला आमदार, चार वेळेला खासदार होऊ शकले.
ज्याच्याकडे 3-4 हजार कौटुंबिक मतं नाहीत ती व्यक्ती इतक्या वेळा येऊ शकते याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पाठिशी उभे होते आणि अशा लहान थरातील लोकांना सुद्धा बाळासाहेबांनी मोठं केलं. हे अमित शाह किंवा मोदींनी असं केलेलं नाही.
प्रश्न: ज्यांना तुम्ही मोठं केलं.. म्हणजे अजित पवार.. तुम्हाला असं वाटतं का तुमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे..
शरद पवार: असं नाही.. अजित पवारच नाही.. जे लोकं माझ्या पक्षाचे, संघटनेचे लोक 30-40 आमदार किंवा इतर आमच्या संघटनेच्या, पक्षाच्या आणि नेतृत्वाच्या नावाने निवडून आले.. ज्यांच्यासाठी मी कष्ट घेतले.. आज ते सगळे या-ना त्या कारणाने निघून जातात याची मला अस्वस्थतता आहे. पण मला त्याची चिंता नाही.
प्रश्न: सुनावणीच्या वेळी असा आरोप लावण्यात आला की, तुम्ही हुकूमशाहप्रमाणे काम करता.. त्यामुळे त्यांना बंड करावं असं वाटलं..
शरद पवार: मी पक्ष या लोकांच्या हातात जास्त दिला त्यामुळे हे घडलं. मी जर थोडं नियंत्रण ठेवलं असतं तर हे घडलं नसतं. या सगळ्यांना प्रोत्साहित करायचं नवीन नेतृत्व तयार करायचं ही जी कल्पना होती त्याचे हे परिणाम आहेत.
प्रश्न: बाहेरचे पवार आणि मूळ पवार ही सगळी कॅम्पेन कशी काय?
शरद पवार: मी काही कॅम्पेन करा असं काही सांगितलं नाही..
प्रश्न: या कॅम्पेनकडे तुम्ही कसं बघता.. ओरिजनल पवारांना मतदान करा..
शरद पवार: असं आहे की, लहान लोकं आहेत विचाराच्या दृष्टीने.. ते लोकं जी भूमिका मांडतात.. काय भूमिका मांडतात? काय महाराष्ट्राच्या हिताचं मांडतात?
प्रश्न: बारामतीत सुप्रिया सुळे वि सुनेत्रा पवार आणि महाराष्ट्रात 48 जागा.. तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीला किती जागा मिळतील?
शरद पवार: मागच्या निवडणुकीत आम्हा सगळ्यांना मिळून 6 जागा मिळाल्या होत्या. आम्हाला 5 आणि काँग्रेसला 1 आणि 1 अपक्ष.. आज त्याच्यामध्ये तिप्पट तरी वाढ होईल. मला आश्चर्य वाटणार नाही की, आम्हाला 50 टक्के जागा मिळाल्या तर.. मिळाल्याचं आश्चर्य वाटणार नाही.. बारामती तर आहेच..
प्रश्न: महाराष्ट्रातील लढाई कशाबद्दलची आहे?
शरद पवार: मोदींच्या बद्दलची एक सरसकट नाराजी ही मला सगळीकडे दिसते. दुसरी गोष्ट अशी की, मोदींनीच आमच्यावर हल्ला चढवला, आरोप केले.. त्या आरोपामध्ये जे घटक होते त्यांनाच सोबत घेऊन आज ते आमच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.
सामान्य मतदाराला निश्चित असं वाटतं की, मोदींनी एखाद्या व्यक्तीवर आरोप केले.. त्यांना आम्हाला मत द्यायची इच्छा नाही. नव्हती.. आज मोदी त्यांना घेऊन पुढे येत असतील तर मोदींच्या समर्थनार्थ उभे राहिलेल्या लोकांना आम्ही कितपत पाठिंबा द्यावा याचा विचार मतदार नक्की करतील.
प्रश्न: या निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे का? मोहिते-पाटील भाजपसोबत गेले होते ते परत आले.. लंके अजित पवारांसोबत गेले होते ते परत आले.. हीच शक्यताच अजित पवार, वळसे-पाटील आणि प्रफुल पटेलांबाबत आहे का?
शरद पवार: साधी गोष्ट आहे की, ज्यांना पक्षाने संधी दिली, प्रतिष्ठा दिली... ते लोकं पक्षाची विचारसरणी, हे सगळं सोडून गेले. भाजपसारख्या शक्तीशी ज्यांनी हातमिळवणी केली.. अशांना आमच्याकडे जागा नाही..
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT