संजय राठोडांविरुद्ध उद्धव ठाकरेंची रणनीती! संजय देशमुखांच्या माध्यमातून देणार ‘शह’?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिंदे गटात गेलेल्या कॅबिनेट मंत्री संजय राठोडांना आगामी निवडणुकीत शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी चहूबाजूंनी फिल्डिंग लावण्यास सुरूवात केलीये. काही दिवसांपूर्वी पोहरादेवी गडावरील महंतांना शिवसेनेत आणून ठाकरेंनी संजय राठोडांविरुद्ध पहिली खेळी केली. त्यानंतर ठाकरेंनी आता संजय राठोडांविरुद्ध ‘संजय’चा पर्याय समोर आणलाय. हे संजय आहेत भाजपचे माजी मंत्री संजय देशमुख.

ADVERTISEMENT

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात राहिलेल्या संजय राठोड ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या गटात गेले. शिंदेंच्या सोबत गेलेल्या शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी तयारी सुरू केल्याचं बोललं जात आहे. संजय राठोडांच्या बदलेल्या भूमिकेबद्दलची नाराजी ठाकरेंनी काही वेळा बोलून दाखवलीये आणि आता त्यांना शह देण्यासाठी ठाकरेंनी तयारी सुरू केल्याचंही दिसतं आहे.

दिग्रसचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री संजय देशमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. संजय देशमुखांनीही याला दुजोरा दिलाय. संजय देशमुखांचा ठाकरे गटातला प्रवेश संजय राठोडांसमोरच्या आव्हानात भर टाकणारा, तर भाजपला धक्का असल्याचं मानलं जात आहे. संजय देशमुखांच्या शिवसेनेतल्या प्रवेशामुळे दिग्रसची समीकरण बदलणार असल्याचं म्हटलं जात आहे.

हे वाचलं का?

दिग्रस मतदारसंघ : संजय राठोड विरुद्ध संजय देशमुख

दिग्रस मतदारसंघातल्या राजकारणात संजय राठोड आणि संजय देशमुख महत्त्वाचे नेते आहेत. संजय राठोड आणि संजय देशमुख दोघेही मूळचे शिवसैनिक आहेत. दोघांचा राजकीय प्रवासाची सुरूवात शिवसेनेतून झालीये.

संजय राठोड शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. त्याचबरोबर संजय देशमुखांनीही शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून काम केलंय. पण, शिवसेनेकडून संजय राठोडांना झुकतं माप दिलं गेल्यानंतर संजय देशमुखांनी वेगळा मार्ग पत्करला होता.

ADVERTISEMENT

विधानसभा निवडणूक २०१९ : संजय देशमुख होते दुसऱ्या क्रमाकांवर

शिवसेनेत शिवसैनिक ते जिल्हाप्रमुख राहिलेले संजय देशमुख यांनी दिग्रस विधानसभा मतदारसंघाचं दोन वेळा प्रतिनिधीत्व केलंय. १९९९ आणि २००४ अशा दोन वेळा संजय देशमुख अपक्ष म्हणून आमदार झाले. म्हणजे दहा वर्ष संजय देशमुखांनी दिग्रस मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलंय.

ADVERTISEMENT

२००९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी संजय देशमुखांना संजय राठोडांकडून पराभव धक्का मिळाला. त्यानंतर देशमुख मागे पडले होते. विधानसभेत पराभव झाला, तरी संजय देशमुखांनी दिग्रस मतदारसंघातील नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ अशा निवडणुकांत संजय देशमुखांनी आपली ताकद दाखवून दिली आहे.

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही संजय राठोडांना संजय देशमुखांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. संजय देशमुख अपक्ष लढून दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यांना ७५ हजार मतं मिळाली होती. त्यामुळेच ठाकरेंनी संजय देशमुखांना संजय राठोडांना शह देण्याचा प्लान तयार केल्याचंही म्हटलं जात आहे.

संजय देशमुख कोण आहेत? (Who is sanjay Deshmukh)

संजय देशमुख यांच्या राजकीय प्रवासाची सुरूवात शिवसेनेतून झाली. पुढे १९९९ मध्ये ते शिवसेनेचे यवतमाळचे जिल्हाप्रमुख झाले. नंतर दिग्रस विधानसभा मतदारसंघातून तिकीटं नाकारल्यांनी त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली आणि १२५ मतांनी राष्ट्रवादीचे उमेदवार ख्वाजा बेग यांचा पराभव केला. त्यावेळी ते राज्यमंत्री बनले होते.

२००४ मध्ये संजय देशमुख दुसऱ्यांदा दिग्रस मतदारसंघातून अपक्ष निवडून आले. २००९ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली, पण ते पराभूत झाले. संजय राठोडांनी त्यांचा पराभव केला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संजय देशमुखांनी भाजपत प्रवेश केला. पण भाजप-शिवसेना युतीमुळे संजय देशमुखांना तिकीट मिळालं नाही आणि त्यांनी बंडखोरी करत संजय राठोडाविरुद्ध निवडणूक लढवली होती.

पोहरादेवी गडावरील महंत सुनील महाराज यांचा ठाकरे गटातला प्रवेश महत्त्वाचा मानला गेला. आधी बंजारा समाजाला आपल्या बाजूनं करण्याचा प्रयत्न ठाकरेंनी केलाय आणि त्यानंतर आता संजय देशमुख यांचा प्रवेश होणार आहे. त्यामुळे ठाकरेंची ही खेळी राठोडांच्या विरोधात यशस्वी ठरणार का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT