नारायण राणेंनी यात्रेची येड्यांची जत्रा केली; संजय राऊतांचा राणेंवर पुन्हा प्रहार
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जनआशीर्वाद यात्रेदरम्यान झालेल्या अटक व सुटकेनंतर राज्यात जोरदार कलगीतुरा रंगला आहे. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेचे खासदार तथा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी पुन्हा एका राणेंवर प्रहार केला आहे. नारायण राणे यांनी केलेलं विधान, भाजपने दिलेला पाठिंबा या मुद्यावरुन राऊतांनी टीकास्त्र डागलं आहे. इतकंच नाही, तर राणे यांच्या दोन्ही मुलांवरही […]
ADVERTISEMENT
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जनआशीर्वाद यात्रेदरम्यान झालेल्या अटक व सुटकेनंतर राज्यात जोरदार कलगीतुरा रंगला आहे. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेचे खासदार तथा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी पुन्हा एका राणेंवर प्रहार केला आहे. नारायण राणे यांनी केलेलं विधान, भाजपने दिलेला पाठिंबा या मुद्यावरुन राऊतांनी टीकास्त्र डागलं आहे. इतकंच नाही, तर राणे यांच्या दोन्ही मुलांवरही राऊत यांनी निशाणा साधला.
संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून राज्यात आठवडाभर रंगलेल्या राणे प्रकरणावर भाष्य केलं आहे. ‘मुख्यमंत्री ठाकरे यांना धमकी देणाऱ्या नारायण राणे यांच्यावर कायद्याने कारवाई केली. राणे यांच्यावरील कारवाई unconstitutional म्हणजे घटनाबाहय असल्याचे तारे भाजप नेते तोडतात तेव्हा आश्चर्य वाटते. राणे हा अपराध वारंवार करीत राहिले! त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे हा कोणाला गुन्हा वाटत असेल तर ते भारतीय संविधानास कुचकामी ठरवत आहेत’, अशा शब्दात राऊतांनी राणे यांच्यावरील कारवाईवर टीका करणाऱ्यांना सुनावलं.
‘केंद्रातले एक मंत्री नारायण राणे महाराष्ट्रात भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी आले. त्या यात्रेची त्यांनी येड्यांची जत्रा केली. मोदी सरकारातील अनेक मंत्री देशभरात अशा जन आशीर्वाद यात्रा करीत फिरत आहेत. महाराष्ट्रात भागवत कराड, भारती पवार, कपिल पाटील फिरत आहेत. त्या सर्व यात्रा सुरळीत पार पडत आहेत. फक्त राणे यांनी परंपरेनं गोंधळ घातला. त्यामुळे मोदींच्या यात्रेचं महत्त्वच नष्ट झाले’, असा टोला राऊतांनी लगावला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
‘महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष विरोधी बाकावर आहे. विरोधात बसणे त्यांना कमीपणाचे वाटते. त्याच न्यूनगंडातून भाजप राज्य सरकारवर घाणेरड्या पद्धतीनं हल्ले करीत आहे. स्वतः हल्ले करून थकले तेव्हा ते काम त्यांनी बाहेरून आलेल्या राणे यांच्यासारख्या नेत्यांना दिले. राणे जे करीत आहेत त्यामुळे जत्रेचा तंबूच उधळला गेला. सार्वजनिक जीवनातील व्यक्तीने परंपरा, प्रतिष्ठा सोडली की काय घडते, याचा अनुभव सध्या महाराष्ट्र घेत आहे. गेले चारेक दिवस इलेक्ट्रॉनिक मीडियाला चोवीस तास रटरटणारे खाद्य मिळाले, पण राज्याची इभ्रत या सर्व प्रकरणात मातीमोल झाली’, अशी खंत राऊत यांनी व्यक्त केली.
ADVERTISEMENT
‘केंद्रीय मंत्री राणे हे गेली वीस वर्षे शिवसेना व उद्धव ठाकरेंवर असंसदीय भाषेत बोलत आहेत. शिवसेनेच्या नेत्यांवर ते व त्यांचे चिरंजीव असभ्य भाषेत बोलत असतात. त्याची दखल कोणी घेत नाही, पण राणे आता केंद्रीय मंत्री आहेत व उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांना थोबाडीत मारण्याची भाषा केंद्राचे एक मंत्री असलेले राणे करतात व त्यांच्या बाजूला बसलेले भाजपचे पुढारी हतबलतेने ही नौटंकी पाहतात. राणे यांच्या घाणेरड्या वक्तव्याचे पडसाद उमटले. राणे यांच्या असभ्य वर्तणुकीचे समर्थन फडणवीस-चंद्रकांत पाटील यांच्यापासून त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नड्डा करतात. गृहमंत्री अमित शहा यांनीही राणे यांना फोन करून सांगितले, ”राणेजी, हम आपके साथ है!” हे सत्य असेल तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि अस्मितेचा हा अपमान आहे! महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान करणाऱ्यांच्या मागे ‘दिल्ली’ प्रत्येक वेळी उभी का राहते?’, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.
ADVERTISEMENT
‘राणे इतक्या वर्षांत कधी शिवतीर्थावरील शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळावर गेले नाहीत, पण आता जन आशीर्वाद यात्रेच्या सुरुवातीला गेले. हा त्यांच्या राजकारणाचा व शिवसेनेस डिवचण्याचा भाग होता. स्मृतिस्थळावरून राणे म्हणाले, ”आज बाळासाहेब असते तर त्यांनी मला आशीर्वाद दिले असते.” राणे यांचे हे विधान हास्यास्पद आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी राणे यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्या वेळी रंगशारदात बाळासाहेबांनी केलेले ‘आशीर्वादपर’ भाषण राणे यांनी पुन्हा ऐकायलाच हवे. राणे यांच्या शिवसेनेवरील असभ्य वक्तव्याने आज भाजपला गुदगुल्या होत असतील, पण या अस्वलाच्या गुदगुल्या आहेत हे भविष्यात समजेल’, असा इशारा राऊतांनी भाजपला दिला.
‘मुख्यमंत्र्यांना धमकी दिल्याप्रकरणी राणे यांना अटक केली. यात सरकारचे काय चुकले? पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस यांना धमकी दिल्याप्रकरणी यापूर्वी अनेक संशयितांना अटक झाली आहे. त्यापैकी अनेकजणांवर देशद्रोहाचे आरोप लावून त्यांना आजही तुरुंगात डांबले आहे. ८४ वर्षांचे स्टेन स्वामी हे त्यापैकी एक होते. त्यांना जामीनही मिळू दिला नाही व शेवटी ते तुरुंगातच मरण पावले’, असं राऊत म्हणाले.
‘राणे यांनी एकदा नाही, वारंवार धमकीवजा असभ्य भाषेचा वापर केला. अटकेनंतर पुन्हा सुरू केलेल्या यात्रेत राणे हे अनेकांवर व्यक्तिगत स्वरूपाचे, असभ्य आरोप करीत आहेत. मोदी यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा हा हेतू नव्हता! केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी स्वतःची तरी प्रतिष्ठा ठेवायला हवी होती. पुन्हा राणे यांच्यावर कारवाई केली म्हणून महाराष्ट्रात तालिबानी राजवट सुरू झाल्याचा साक्षात्कार देवेंद्र फडणवीस यांना व्हावा? ज्या महाराष्ट्राचे ते काल मुख्यमंत्री होते ते राज्य तालिबान्यांचे? औरंगजेब, अफझल खान, शाहिस्ते खान अशा तालिबानी राजवटीचा अस्त करून शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले हे राज्य ‘तालिबानी’ म्हणणे ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची बदनामी आहे. राणे यांच्या वक्तव्याची ‘री’ ओढण्यात भाजपने स्वतःलाच चिखल फासून घेतला’, अशी टीका राऊत यांनी फडणवीसांवर केली आहे.
रोखठोकमध्ये ‘मुंबई तक’च्या मुलाखतीचा उल्लेख
संजय राऊत यांनी रोखठोमध्ये ‘मुंबई तक’ला राणे यांनी दिलेल्या मुलाखतीचाही उल्लेख केला. ‘राणे म्हणतात, ”अरे, मी काय नॉर्मल माणूस आहे काय?” मला हात लावून बघाच! राणे म्हणतात (साहिल जोशींना दिलेल्या मुलाखतीत) ”आम्ही वर बसलोय (म्हणजे केंद्रात). महाराष्ट्र वरच्या लोकांशी काय संघर्ष करणार?” राणे यांची ही विधाने महाराष्ट्राला कमी लेखणारी आहेत. फडणवीस व इतरांना महाराष्ट्राला कमी लेखणे मान्य आहे काय? दिल्लीशी संघर्ष करूनच महाराष्ट्राने ‘मुंबई’ मिळवली हे शिवसेना सोडल्यावर राणे विसरलेले दिसतात’, असा सवाल राऊत यांनी केला आहे.
राणेंच्या पराभवाला त्यांची मुलं जबाबदार
‘कोकणातील शिवसेना वाढीत आपले योगदान आहे असा दावा जामिनावर सुटताच राणे करतात. त्यावर कोणी विश्वास ठेवायचा? शिवसेना वाढीत योगदान असणारा कोणताही नेता स्वतःच्याच मतदारसंघात पराभूत होत नाही. राणे यांचा पराभव कोकणात शिवसेनेनेच केला व ते भाजपच्या मेहरबानीने राज्यसभेत गेले. राणे यांच्या राजकीय कारकीर्दीचे सगळ्यात जास्त नुकसान त्यांच्या मुलांनी केले आहे. टीका करणे व स्वीकारणे ही लोकशाहीची परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे, पण ठाकऱ्यांपासून पवारांपर्यंत, राहुल गांधींपासून मोदींपर्यंत सगळ्यांचे ‘आईबाप’ काढणाऱ्या राणेंच्या मुलांनी त्यांच्या पिताश्रींचे नुकसान केले. एक दिवस हीच वेळ ते फडणवीस, चंद्रकांत पाटलांवर आणतील’, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
‘हे राजकारण खरे नाही, असे फडणवीसांनी एकदा राणे यांना समोर बसवून समजावून सांगायला हवे. कारण फडणवीस यांचा उल्लेख राणे यांनी ‘मार्गदर्शक’ म्हणून केला आहे. राणे यांची मुले इतरांचे बाप ऊठसूट जाहीरपणे काढतात. ”तुम्ही बिनबापाचे आहात काय?” असा प्रश्न त्यांना एक दिवस भारतीय जनता पक्षाचे लोकच विचारतील तेव्हा ते काय उत्तर देतील? महाराष्ट्राच्या राजकारणातील हे गढूळ प्रवाह थांबले नाहीत तर राज्याची बदनामी होईल. महाराष्ट्रातील चार शहाण्यांनी पुढे येऊन राज्यातील पेंढाऱ्यांचे कान उपटावेत, अन्यथा राज्याची घडी विस्कटेल’, असा इशारा राऊतांनी दिला आहे.
ADVERTISEMENT