खासदार राहुल शेवाळेंवर बलात्काराचा आरोप, ‘धर्मवीरां’प्रमाणेच न्याय हवा; पीडितेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने बलात्कार, लैंगिक शोषण आणि लैंगिक छळाचा आरोप केला आहे. यासंदर्भातले ट्विट्स या महिलेने पोस्ट केले आहेत. तसंच माझी तक्रार पोलीस नोंदवून घेत नाहीयेत त्यामुळे मला आता धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रमाणे न्याय मिळवून द्यावा असं म्हणत या पीडितेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलं आहे.

ADVERTISEMENT

काय म्हटलं आहे या पीडित महिलेने पत्रात?

माझ्यावर झालेल्या खासदार राहुल शेवाळेंकडून झालेल्या अत्याचार, बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणी मी साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी गेले होते. मात्र पोलिसांनी FIR केलीच नाही तसंच या प्रकरणी तपासही केला नाही. ११ वर्षांपासून राहुल शेवाळे हे सगळं करत आहेत.

माझ्यावर राहुल शेवाळेंनी कसे अत्याचार केले त्याची सीडी दिली आहे. तसंच माझे आणि राहुल शेवाळे यांच्या संबंधाबाबतचे १०० पुरावे दिले आहेत. मात्र राहुल शेवाळे आता हे सगळं नाकारत आहेत. तसंच मी पैशांसाठी त्यांना धमकावत असल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र मुख्यमंत्री महोदय मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की मी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. मी पैशांसाठी कशाला कुणाला धमक्या देईन?

हे वाचलं का?

धर्मवीरांप्रमाणे न्याय देण्याची महिलेची मागणी

नुकताच मी धर्मवीर हा सिनेमा पाहिला या सिनेमात पीडित मुलीच्या आत्महत्येनंतर तिचे आई वडील आनंद दिघेंकडे जातात. त्यानंतर आनंद दिघे त्या मुलीच्या आई वडिलांना न्याय मिळवून देतात. मलाही तसाच न्याय तुम्ही मिळवून द्यावा. अन्यथा माझ्यावर जीव देण्याचीच वेळ येईल असंही या पीडित महिलेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. दुसरीकडे राहुल शेवाळे यांनी माझं करिअर उद्ध्वस्त करेन अशीही धमकी दिल्याचा आरोप केला आहे. राहुल शेवाळे हे आता त्यांचं राजकीय वजन वापरून मला धमकावत आहेत.

पीडित महिलेने एक ट्विटर अकाऊंट तयार केलं आहे. त्यावर या महिलेने व्हीडिओही पोस्ट केले आहेत. या महिलेने आपल्या पत्रात पुढे असं म्हटलं आहे की माझा दुबई या ठिकाणी टेक्सटाइल्सचा व्यवसाय आहे. मी जेव्हा मुंबईला येण्याचा प्रयत्न करते तेव्हा मला विविध मार्गाने धमकावण्यात येतं. एवढंच नाही तर मला आता असं वाटू लागलं आहे की आता माझ्या जिवालाही धोका आहे. मी एका चांगल्या घरातली मध्यमवर्गीय मुलगी आहे. जे काही राहुल शेवाळेंकडून केलं जातं आहे त्यामुळे मी खचून गेले आहेत.

ADVERTISEMENT

मी मुंबईत आल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊ नये म्हणूनही मला धमक्या देण्यात आल्या आहेत. जर आत्ता मी गप्प राहिले तर माझ्यासारख्याच दुसऱ्या एखाद्या मुलीला मूर्ख बनवलं जाईल. आत्ताचं सरकार हे तुमचं म्हणजेच एकनाथ शिंदे आणि भाजपचं सरकार आहे. मला तुमच्याकडून न्याय हवा आहे त्यामुळे मी हे पत्र तुम्हाला लिहिते आहे असंही या महिलेने या पत्रात म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

मी तुमच्यापुढे न्याय मिळावा म्हणून अक्षरशः या पत्रातून याचना करते आहे. जर साकीनाका पोलिसांनी गुन्हा नोंद केला नाही तर माझ्यापुढे आता आत्महत्या करण्याशिवाय काहीही पर्याय राहणार नाही असंही या महिलेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नीने नेमकं काय म्हटलं आहे?

खासदार राहुल शेवाळे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन जे आरोप सुरू आहेत, ते पूर्णतः निराधार आहेत. सामाजिक आणि राजकीय जीवनात गेल्या २५ वर्षांहून जास्त काळ कार्यरत असणाऱ्या लोकप्रतीनिधीची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचे हे षडयंत्र आहे. सदर महिला गेल्या काही महिन्यांपासून खासदार राहुल शेवाळे आणि आमच्या कुटुंबीयांना धमक्या देत असून याविरोधात आम्ही माननीय अंधेरी महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयात रितसर तक्रार दाखल होती. याची दखल घेऊन ११ जुलै २०२२ रोजी सदर महीलेविरोधात मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात एफ आय आर नोंदविण्यात आली आहे. यानुसार सदर महिलेविरोधात लवकरच योग्य ती कारवाई पोलिसांकडून केली जाईल, याचा आम्हाला विश्वास आहे.

सदर महिलेने गेल्या काही महिन्यांपासून मला आणि माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. खंडणी वसूल करण्याच्या इराद्याने धमकावणे, प्रतिष्ठित व्यक्तीची प्रतिमा मलिन करणे यासाठी सदर महीले विरोधात शारजा, दुबई येथे देखील काही महिन्यांपूर्वी गुन्हा नोंदविण्यात आला होता आणि तिला सुमारे ८० दिवसांचा तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. तसेच सदर महिलेच्या कुटुंबाची पार्श्वभूमी देखील गुन्हेगारी स्वरूपाची आहे. एका महिलेचा बलात्कार करून खून केल्याप्रकरणी सदर महिलेचा भाऊ दिल्लीतील तुरुंगात शिक्षा भोगत असल्याची देखील माहिती आहे.

प्रसिद्धी माध्यमांना मी नम्र विनंती करते की, खासदार राहुल शेवाळे यांची राजकीय आणि सामजिक प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी जाणीवपूर्वक रचले गेलेले हे षडयंत्र असून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने याबाबतच्या कोणत्याही निराधार, एकतर्फी आणि खोट्या वृत्तांची दखल घेऊ नये. तसेच या प्रकरणी कोणतेही वृत्त प्रसारित करताना माझ्याशी किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधून आमची बाजू देखील मांडली जाईल, अशी आशा बाळगते असं पत्र राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांनी लिहिलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT