Udayanraje : छत्रपती शिवरायांचा अपमान झाल्यावर गप्प बसणारेही राज्यपालांएवढेच दोषी

मुंबई तक

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सर्व धर्म समभावाची शिकवणूक दिली. सर्व जाती धर्मांतल्या लोकांवर होणारा अन्याय, जुलमी राजवट यातून सुटका करण्यासाठी हा नारा त्यांनी दिला होता. त्यांच्या दरबारात सगळ्या जाती धर्माचे लोक होते. लोकशाहीचा पाया खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला. अशा शिवरायांचा अपमान करताना लाज वाटत नाही का? असा सवाल छत्रपती उदयनराजे यांनी रायगडावरून केला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सर्व धर्म समभावाची शिकवणूक दिली. सर्व जाती धर्मांतल्या लोकांवर होणारा अन्याय, जुलमी राजवट यातून सुटका करण्यासाठी हा नारा त्यांनी दिला होता. त्यांच्या दरबारात सगळ्या जाती धर्माचे लोक होते. लोकशाहीचा पाया खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला. अशा शिवरायांचा अपमान करताना लाज वाटत नाही का? असा सवाल छत्रपती उदयनराजे यांनी रायगडावरून केला आहे. राज्यपालांनी जे वक्तव्य केलं त्याविरोधात आज त्यांनी रायगडावर जाऊन आपली भूमिका मांडली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यानंतर जे गप्प बसले ते राज्यपालांएवढेच दोषी

छत्रपती शिवरायांचा अपमान झाल्यानंतर जे गप्प बसले ते राज्यपालांएवढेच दोषी आहेत. जी चूक आहे ती चूक असते त्याविरोधात आवाज उठवलाच पाहिजे. प्रोटोकॉल वगैरे कारणं देता कामा नयेत. छत्रपती शिवरायांनी जर प्रोटोकॉल वगैरे कारणं दिली असती तर आज आपण गुलामगिरीत असतो असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभावाचा विचार दिला

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभावाचा विचार दिला, रूजवला. त्याच महान व्यक्तीची विटंबना चित्रपट, लिखाण आणि वक्तव्यांतून केली जाते आहे. अशा वेळी आपण शांत राहून चालणार नाही. आधी वक्तव्य करायचं आणि मग म्हणायचं की मी त्या अर्थाने बोललो नव्हतो याला काही अर्थ नाही. मुळात कुणालाही असं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा अधिकार नाही. रायगड किल्ल्यावर निर्धार शिवसन्मानाचा हे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी उदयनराजेंनी हे वक्तव्य केलं.

सगळ्यांना एकत्र आणणारे शिवाजी महाराज होते

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी जो विचार दिला त्यांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र केलं. त्यानंतर त्यांनी स्वराज्याचा विचार केला. त्यामुळे आज आपण लोकशाहीत राहू शकतो आहे. याचा विसर कुणालाही पडता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य रयतेसाठी वेचलं आज अशाच महाराजांचा अपमान होत असताना गप्प कसं बसून राहायचं?

तर देशाचे ३० तुकडे होतील

सर्व धर्म समभावाचा विसर जेव्हा राजकीय लोकांना पडला तेव्हा काय झालं? या देशाचं विभाजन झालं, देशाचे तीन तुकडे झाले. आपण काय मिळवलं?

आज प्रत्येक राजकीय पक्ष स्वार्थी झाला आहे. छत्रपती शिवरायांना वंदन करायचं आणि त्यांचा अपमान केला तरी गप्प बसायचं. त्यावेळी तीन तुकडे देशाचे झाले, आता जर आता आपण गप्प बसलो तर ३० तुकडे व्हायला वेळ लागणार नाही असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.

छत्रपती शिवरायांचं राज्य रयतेचं राज्य म्हणून ओळखलं जातं

आपल्या देशात राजे अनेक होऊन गेले. त्यांचं राज्य हे त्यांच्या नावाने ओळखलं गेलं. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचं राज्य म्हणून ओळखलं गेलं हा फरक आहे असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे. उदयनराजे म्हणाले की राष्ट्रपती हे देशातलं सर्वोच्च पद आहे तसंच राज्यपाल हे राज्याचं सर्वोच्चपद आहे. त्यांच्या तोंडी असली भाषा अजिबात शोभत नाही. राजकीय मंडळी आपल्या स्वार्थासाठी यावर पांघरूण घालत असतील तर लाज वाटली पाहिजे. राज्यपालांचं नाव घेऊन मी त्या व्यक्तीला मोठं करणार नाही. ते पद मोठं आहे. अनेक महापुरूषांचा त्यांनी अपमान केला आहे. आपण ते पाहात बसलो मात्र आता गप्प बसणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा आपला अपमान आहे हे आपल्याला वाटत नाही का? असाही प्रश्न उदयनराजेंनी विचारला आहे. विकृत लोकांच्या तावडीत देश गेला आहे हे सांगताना मला खंत वाटते आहे. लोकशाहीत तुम्ही सगळेजण हे राजे आहात. तुमच्यामुळे हे लोक पदावर बसले आहेत. त्यांच्यामुळे तुम्ही नाही, तुमच्यामुळे ते आहेत. अशात या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं अवमान करताना लाज वाटत नाही का? या लोकांची नीतीमत्ता गेली कुठे? असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp