जिल्हा परिषद शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देणारे गुरुजी निलंबीत, शिक्षणतज्ज्ञांमध्ये नाराजी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

स्मिता शिंदे, शिरुर प्रतिनिधी

ADVERTISEMENT

राज्यात मराठी शाळांची बिकट अवस्था हा नेहमी चर्चेचा विषय असतो. मुंबईसारख्या शहरात मराठी शाळा बंद होत चालल्यामुळे नेहमी राजकारण रंगताना दिसतं. परंतू ग्रामीण भागात अनेक मराठी शाळांनी विविध उपक्रम राबवत पालकांची पसंती मिळवली. यातलीच एक शाळा म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या शिरुर तालुक्यातील वाबळेवाडीतील जिल्हा परिषदेची शाळा. स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने बांधण्यात आलेल्या या शाळेचं नाव गेल्या काही वर्षांमध्ये चांगलंच गाजलं. झिरो एनर्जी शाळा म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवणाऱ्या या शाळेचे मुख्याध्यापकच आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

या शाळेच्या मुख्याध्यापकांवर जिल्हा परिषदेने थेट निलंबनाची कारवाई केल्यामुळे शिक्षणतज्ज्ञांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं आहे. शिक्षणतज्ज्ञ डॉ. हेरंब कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करत मुख्याध्यापक वारे गुरुजींच्या समर्थनार्थ एक मोहीम सुरु केली आहे.

हे वाचलं का?

जिल्हा परिषदेची शाळा का होती चर्चेत?

राज्यातील पहिली टॅबलेट शाळा होण्याचा मान या शाळेने मिळवला होता. झिरो एनर्जीच्या माध्यमातून या शाळेने सर्वांचं लक्ष वेधून गेलं. आर्ट ऑफ लिव्हींग आणि बँक ऑफ न्यूयॉर्कच्या माध्यमातून भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी या शाळेची देखणी वास्तू तयार झाली. या शाळेचं नाव नंतर इतक चर्चेस आलं की या शाळेत अॅडमिशन मिळवण्यासाठी ५ वर्षांची वेटिंग लिस्ट तयार झाली. आपल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून या शाळेने नेहमीच सर्वांची वाहवा मिळवली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

वादाचं नेमकं कारण आहे तरी काय?

गेल्या काही महिन्यांपासून शाळेत अॅडमिशन घेण्यासाठी भरमसाठी फी आकारली जात असल्याचा आरोप होतो आहे. तसेच स्थानिक विद्यार्थ्यांना या शाळेत प्रवेश दिला जात नसल्याचीही अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. याबाबत काही नागरिकांनी थेट जिल्हा परिषदेकडे तक्रार केल्यानंतर जिल्हा परिषदेने थेट वारे गुरुजींवर निलंबनाची कारवाई करत त्यांना खेड पंचायत समितीत हजर राहण्याचे आदेश दिलेयत.

लॉकडाउनच्या काळात सर्व शाळा बंद असताना वारे गुरुजींच्या माध्यमातून वाबळेवाडीच्या शाळेने ग्रुप होम स्कुलिंग सुरु केलं. यामधून मुलांच्या शिक्षणाचा गाडा सुरु झाला परंतू काही लोकांनी केलेल्या तक्रारीमुळे जिल्हा परिषदेने वारे गुरुजींची चौकशी सुरु केली आहे.

जमिनीच्या व्यवहारावरुन होत आहेत आरोप –

मुख्याध्यापक दत्तात्रय वारे हे शिक्षक असताना त्यांनी साडेआठ कोटी रुपये किमतीची शेतजमिन खरेदी केल्याचा आरोप करण्यात येतो आहे. वारे गुरुजी हे मुळचे शिरुर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक या गावचे रहिवासी. वारे यांचं कुटुंब हे शेतकरी कुटुंब आहे, वारे यांचे वडीलही सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांचं घर हे वडिलोपार्जित शेतजमिन आणि निवृत्तीवेतनावर चालतं. याच भागभांडवलाच्या जोरावर वारे यांनी शिक्षक पतपेढीचं कर्ज घेऊन ४ एकर जमिन ३५ लाखांत खरेदी केली. परंतू हीच जमिन बाजारभावात ८ कोटींना असल्याचा आरोप केला जातोय.

परंतू स्थानिक गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे आरोप केवळ राजकीय सुडापोटी केले जात आहेत.

शाळेच्या नावाने राजकारण आणि भाजप नेत्यांची उपस्थिती –

जिल्हा परिषदेच्या शाळेला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आल्यामुळे ही शाळा भाजप आणि संघाची असल्याचा आरोप स्थानिक राजकारणात होतो आहे. २०१८ साली शाळेच्या उद्घाटनाला माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस शिरुर येथे आल्या होत्या. परंतू यानंतर राज्यात सत्ताबदल झाला, शिरुरमध्ये राष्ट्रवादीचा आमदार निवडून आल्यानंतर या वादाला स्थानिक पातळीवर राजकीय रंग दिला गेल्याचं चित्र पहायला मिळतंय.

आरोपांवर वारे गुरुजी म्हणतात…

या सर्व घडामोडींवर मुंबई तक ने दत्तात्रय वारे गुरुजींशी संवाद साधला. आपल्यावर होत असलेल्या आरोपांवर वारे गुरुजींनी परखड मत मांडलं.

“माझ्या कामाबाबत किंवा कार्यपद्धतीबाबत वाबळेवाडीतील एकही ग्रामस्थाची किंवा पालकांची अथवा विद्यार्थ्यांची तक्रार नाहीये. सर्व जण आजही माझ्या कामाच्या पर्यायाने माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. हे मी केलेल्या कामाचे भाग्य समजतो. पण, केवळ राजकीय आकसापोटी खोटी तक्रार केलेली आहे या तक्रारीच्या माध्यमातून वाबळेवाडी सारखी आंतरराष्ट्रीय शाळा बंद पाडण्याचा कुटील डाव आहे. माझ्यासारख्या प्रामाणिक शिक्षकावर केवळ राजकीय सूडापोटी खोटेनाटे आरोप करून ही शाळा बंद पाडण्यासाठी केले जाणारे प्रयत्न खूपच दुःखद व वेदनादायी आहेत. कामात हलगर्जीपणा, निष्काळजीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याचे कारण निलंबन आदेशात नमूद केले आहे. मी निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणाने कर्तव्यात कसूर करून जर वाबळेवाडी सारखी आंतरराष्ट्रीय शाळा घडू शकत असेल तर भविष्यात अशा शाळा घडवण्यासाठी मी पुन्हा निष्काळजीपणा हलगर्जीपणा अनेक करव्यात कसूर करण्यास तयार आहे”

जिल्हा परिषदेचं आरोपांवर काय आहे म्हणणं?

वाबळेवाडीच्या शाळेवरुन सुरु असलेल्या राजकारणावर मुंबई तक ने जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधला. “अनेक पत्रकार आम्हाला श्री. दत्तात्रेय वारे यांना निलंबीत करण्याचं कारण विचारत आहेत. हा दस्तावेज एका प्रकारची नोटीस आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपींची फक्त चौकशी सुरु आहे. ते एक आदरणीय शिक्षक आहेत, ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अद्याप वारे गुरुजींनी आपल्यावरील आरोपांचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. जिल्हा परिषद या प्रकरणात कोणत्याही दबावाखाली न येता कायद्याप्रमाणे कारवाई करेल.”

याचसोबत वारे गुरुजींवर होत असलेल्या आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेने समिती नेमली आहे. या समितीच्या माध्यमातून वारे यांनी केलेल्या मालमत्ता खरेदी बरोबर आर्थिक व्यवहारातील रकमेचा तपशील तपासला जाणार आहे. वारे गुरुजी यांनी जमीन खरेदीसाठी ४० लाख रुपये रक्कम उभी केल्याचे दिसून आले आहे. ही रक्कम कशी उभी केली याबाबत कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना वारे यांना देण्यात आले आहेत तसेच चौकशी समितीने जातेगाव येथील आयडीबीआय बँकेचा त्यांच्या खात्याचा तपशील वारे यांना पाठवला असून संबंधित रकमेची माहिती वारे यांना द्यावी लागणार आहे तसेच बँक खात्याचा मागील तीन वर्षांचा तपशील प्राप्तीकर रिटर्न नमूना क्रमांक १६ सादर करण्याच्या सूचना ही चौकशी अधिका-यांनी दिल्या आहेत.

दरम्यान शिरुरचे राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार आगामी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा चर्चेला आणणार आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT