उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, रवींद्र चव्हाणांनी फोडला 'हा' मोठा नेता.. आधी धनुष्यबाण नंतर मशाल आता कमळ!
कल्याण डोंबिवलीत राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे हे आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
ADVERTISEMENT

डोंबिवली: कल्याण-डोंबिवलीत शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भारतीय जनता पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. दीपेश म्हात्रे यांच्या सोबत 7 ते 8 माजी नगरसेवक हे भाजपमध्ये प्रवेश करतील असे सांगितले जात आहेत. हा पक्षप्रवेश आज (9 नोव्हेंबर) डोंबिवली जिमखाना येथे आयोजित करण्यात आला आहे.
सूत्रांनुसार, दीपेश म्हात्रे यांना विधान परिषद किंवा केडीएमसीत महापौर पद अशा दोन अटींवर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.
म्हात्रे हे रविवारी महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईक आणि माजी मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. म्हात्रे यांचे हे पाऊल केवळ उद्धव ठाकरेंनाच नव्हे तर सध्या भाजपसोबत युतीत असलेल्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेलाही मोठा धक्का मानला जात आहे.
हे ही वाचा>> 'फडणवीस साहेब तेव्हा साफ खोटं बोलले...', गुवाहटीच्या 'त्या' फोनबाबत बच्चू कडूंचा खळबजनक खुलासा
विशेषतः आगामी केडीएमसी निवडणुकीपूर्वी हे लक्षात घेण्यासारखे आहे की, दीपेश म्हात्रे यांनी शिवसेनेत नगरसेवक आणि केडीएमसी सभापती पद भूषविले आहेत. दीपेश म्हात्रे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जात होते.










