Vidhan Sabha Live : विधानभवनाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा, कालिदास कोळंबकर बनले अध्यक्ष

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि अखेरचा दिवस आहे. पहिल्या दिवशी भाजपच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर भाजपने दुसऱ्या दिवशी कामकाजावर बहिष्कार घातला आहे. भाजप आमदारांनी आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी करत विधानभवनाच्या आवारात प्रतिविधानसभेचं कामकाज सुरु केलं आहे. दरम्यान तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी प्रतिविधानसभेचं कामकाज तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांच्याकडे या प्रतिविधानसभेचं अध्यक्षपद देण्यात आलं असून भाजप आमदारांनी सरकारविरोधात टीकास्त्र सोडलं आहे. शेतकरी, विद्यार्थी, MPSC च्या विद्यार्थ्यांचे प्रश्न यावर आवाज उठवला तर आमदारांना खोट्या आरोपांखाली निलंबीत करण्यात आलं. खूर्चीवर बसून जे घडलंच नाही ते आरोप केले जात आहेत असा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रतिविधानसभेच्या कामकाजाला सुरुवात केली.

या प्रतिविधानसभेत भाजप आमदारांनी १२ आमदारांच्या निलंबनाचा निषेध करत महाविकास आघाडी सरकार लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा आरोप केला. राधाकृष्ण विखे-पाटील, जयकुमार गोरे यासारख्या अनेक आमदारांनी या प्रतिविधानसभेत सरकारवर हल्लाबोल केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान विधानसभेत सत्ताधारी पक्षातल्या आमदारांनी या कामकाजाला विरोध दर्शवला आहे. सभागृहाचं कामकाज सुरु असताना विधानभवनाच्या आवारात असं कामकाज करता येत नाही असं म्हणत प्रतिनिधानसभेचं कामकाज थांबवण्याची मागणी आमदार भास्कर जाधव, मंत्री नवाब मलिक, आमदार सुनील प्रभू, पृथ्वीराज चव्हाण आणि सुनील केदार यांनी केली. विरोधी पक्षांना स्पीकर आणि इतर साहित्य देण्याची परवानगी दिलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सत्ताधारी पक्षाने केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT