RSS ने ५२ वर्ष तिरंगा का फडकावला नाही? २००२ पूर्वीच्या फ्लॅग कोडमध्ये काय म्हटलंय?

भाग्यश्री राऊत

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: पंतप्रधान मोदींनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाची घोषणा केली. आपल्या सोशल मीडियावर प्रोफाईल म्हणून तिरंगा ठेवा, असं आवाहन त्यांनी केलं. त्यानंतर सर्वांनी प्रोफाईल बदलायला सुरुवात केली. काँग्रेसनेही यात उडी घेत पंडीत जवाहरलाल नेहरूंचा हातात तिरंगा असलेला फोटो सगळीकडे लावला आणि भाजपवर टीका करायला सुरुवात केली. आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजपसह आरएसएवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींचा संदेश त्यांच्याच परिवारापर्यंत पोहोचला नसावा, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं. त्यानंतर काँग्रेस नेते पवन खेरा यांनी मोहन भागवत आणि आरएसएसच्या ट्विटर हँडलचे फोटो शेअर केले ज्यामध्ये त्यांनी प्रोफाईलवर तिरंगा लावलेला नाही. तिकडे राहुल गांधींनीही ट्विट करत म्हटलं, ज्यांनी ५२ वर्ष तिरंगा फडकवला नाही, अशा संघटनेतून हर घर तिरंगा अभियान चालवणारी ही लोक आली आहेत. यानंतर सोशल मीडियावरही आरएसएसच्या प्रोफाईलवरून वाद सुरू झाला. आरएसएसनं ५२ वर्ष तिरंगा का फडकवला नाही? असा प्रश्न विचारला जातोय. पण, आरएसएसनं ५२ वर्ष तिरंगा का फडकवला नाही? याचं मागचं कारण तुम्हाला माहितीये का?.

ADVERTISEMENT

राष्ट्रध्वज फडकवण्याविषयी नवीन जिंदाल केस काय होती?

राष्ट्रध्वज कोण आणि कधी फडकवू शकतो हा मुद्दा तेव्हा चर्चेत आला जेव्हा उद्योगपती नवीन जिंदाल यांनी फेब्रुवारी 1995 मध्ये आपल्या कारखान्यावर प्रत्येक दिवशी तिरंगा फडकवायला सुरुवात केली. पण, जिल्हा प्रशासनानं त्यांना बंदी घातली. त्यानंतर त्यांनी कोर्टात धाव घेत देशातील प्रत्येक नागरिकाला तिरंगा फडकवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. इतक्यात सरकारनं २००२ मध्ये फ्लॅग कोड म्हणजेच ध्वजसंहितेत सुधारणा केली. त्यावेळी आरएसएसचे नेते के. सूर्यनारायण राव यांनी बँगलोरमध्ये माध्यमांशी बोलताना आरएसएसनं ५२ वर्ष आपल्या संघ मुख्यालयावर झेंडा का फडकवला नव्हता? यामागचं कारण सांगितलं. ते म्हणाले, ”२००२ पूर्वीच्या फ्लॅग कोडमध्ये तिरंगा फडकवण्याबाबत नियम अधिक कडक होते. पण, २००२ मध्ये फ्लॅग कोडमध्ये दुरुस्ती करण्यात आली.”

RSS चं म्हणणं काय? –

हे वाचलं का?

फ्लॅग कोडमधील नियमांमुळे आम्ही इतके दिवस तिरंगा फडकवला नाही. पण, आता नियम शिथिल झाल्यामुळे आम्हाला आता तिरंगा फडकवायला हरकत नाही. सध्या जो वाद सुरूये त्याबाबत मुंबई तकनं संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांच्यासोबत संपर्क साधला. त्यांनीही आम्हाला नवीन जिंदाल केसचा दाखला दिला. ते म्हणतात, ”नागरिकांना २००२ पूर्वी तिरंगा फडकवण्याची परवानगी नव्हती. पण, आता आमचा हरघर तिरंगा अभियानाला पाठिंबा आहे. त्याचं कोणीही राजकारण करू नये.”

सरंसंघचालक मोहन भागवत या वादावर काय म्हणाले?

”कायम हा प्रश्न उपस्थित केला जातो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भगवा झेंडा फडकवतो तिरंगा नाही. मात्र मी तुम्हाला सांगू इच्छितो की तिरंगा झेंडा जन्माला आला तेव्हापासून संघ त्याच्यासोबत ठामपणे उभा आहे. मी तुम्हाला सत्यकथा सांगतो आहे. जेव्हा तिरंगा झेंडा आपला ध्वज असेल हे निश्चित झालं तेव्हा फैजपूरमध्ये काँग्रेसच्या अधिवेशात तिरंगा फडकवला गेला. त्यावेळी ध्वजस्तंभ ८० फूट उंच होता” असंही मोहन भागवत यांनी सांगितलं. यावेळी मोहन भागवत यांनी माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरुंची एक कथा सांगितली.

ADVERTISEMENT

RSS ला भगवा झेंडा प्रिय, तिरंगा का नाही? मोहन भागवत यांनी दिलं उत्तर; म्हणाले…

ADVERTISEMENT

2002 पूर्वीच्या फ्लॅग कोडमध्ये खरंच तिरंगा फडकावण्यासाठी बंदी होती? –

२००२ पूर्वी शाळेत शिकलेल्यांना हे माहिती असेल की त्यांच्या शाळेत स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनाला तिरंगा फडकत होता. मग ती शाळा खासगी असो किंवा सरकारी. मग याठिकाणी फ्लॅग कोडचे नियम लागू होत नाहीत का? असाही सवाल उपस्थित होतोय. म्हणूनच २००२ पूर्वीचा फ्लॅग कोड म्हणजे ध्वजसंहितेत नेमकं काय म्हटलं होतं? हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्हाला पंजाब सरकारच्या वेबसाईटवर १९८२ मधील प्रोटोकॉल सापडला. या सरकारी मॅन्युअलमध्ये २००२ पूर्वीचा फ्लॅग कोड दिला आहे. यामध्ये म्हटलंय, सरकारी इमारतींवर सुर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत दररोज तिरंगा फडकू शकतो. इथं सरकारी आणि दररोज हे दोन शब्द महत्वाचे आहेत.

कारण, याच मुद्याविरोधात जिंदाल यांनी न्यायालयात धाव घेत देशातील प्रत्येक नागरिकाला दररोज तिरंगा फडकवण्याची परवानगी मागितली होती. पण, नागरिकांना तिरंगा फडकवण्याची पूर्णपणे बंदी होती का? त्याबाबत या सरकारी मॅन्युअलमध्ये म्हटलंय, १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन, २६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन, तसेच महात्मा गांधी जयंती यासारख्या राष्ट्रीय दिनी तिरंगा फडकवायला निर्बंध नाहीत. म्हणजे या दिवशी देशातील नागरिकांना तिरंगा फडकवण्याचे अधिकार होते.

RSS नं त्यांच्या मुख्यालयावर तिरंगा कधी फडकावला?

हे सर्व पाहिल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की आरएसएसनं त्यांच्या मुख्यालयावर तिरंगा कधी फडकवला. तर २००२ मध्ये वाजपेयी सरकार असताना आरएसएसनं तिरंगा फडकवला होता. पण, याआधी म्हणजेच २००१ मध्ये राष्ट्रप्रेमी युवा दलाच्या तीन कार्यकर्त्यांनी नागपुरातल्या आरएसएस मुख्यालयावर तिरंगा फडकवला होता. यावेळी त्यांना अटकही झाली होती आणि त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. इतकंच नाहीतर १५ ऑगस्ट १९४७ आणि २६ जानेवारी १९५० ला त्यांच्या मुख्यालयावर तिरंगा फडकवला होता, असा दावाही आरएसएसचा आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT