महाराष्ट्र जाणार अंधारात! वीज कर्मचाऱ्यांनी उपसले संपाचं हत्यार
महाराष्ट्रावर बत्ती गुल होण्याचं संकट ओढावलं आहे. राज्य सरकारच्या महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या तीन दिवसीय संपाला बुधवारपासून (4 जानेवारी) सुरूवात झाली असून, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वीज पुरवठा विस्कळीत होण्यास सुरूवात झाली आहे. अदाणी वीज कंपनीनं महावितरणच्या भांडुप कार्यक्षेत्रातील काही भागांत वीज वितरण परवाना देण्यासाठी राज्य […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रावर बत्ती गुल होण्याचं संकट ओढावलं आहे. राज्य सरकारच्या महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या तीन दिवसीय संपाला बुधवारपासून (4 जानेवारी) सुरूवात झाली असून, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वीज पुरवठा विस्कळीत होण्यास सुरूवात झाली आहे.
अदाणी वीज कंपनीनं महावितरणच्या भांडुप कार्यक्षेत्रातील काही भागांत वीज वितरण परवाना देण्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे अर्ज केला आहे. अदाणी कंपनीला वीज वितरण परवाना मिळण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून, याला वीज कर्मचाऱ्यांच्या विरोध होत आहे.
कामगार संघटनांशी सरकारने चर्चा केली, मात्र चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. आजपासून वीज कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचं मोठं आव्हान महावितरणसमोर उभं ठाकलं आहे. दरम्यान, वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या असल्याचं महावितरण कंपनीनं म्हटलं आहे.
संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना इशारा
वीज कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसल्यानं वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, संपकरी कर्मचाऱ्यांना इशाराही देण्यात आला आहे. कामगार संघटनांनी बेकायदा संप सुरू न ठेवता तो त्वरित मागे घ्यावा. संप करणाऱ्यांवर मेस्मा कायदा लागू करण्याची वेळ आणू नये, असा इशारा महावितरण व राज्य वीज कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी दिला आहे.