कोळसा खाणीतला कामगार ते नक्षली चळवळीतला म्होरक्या, जाणून घ्या कोण आहे मिलींद तेलतुंबडे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांच्या C-60 कमांडोंनी केलेल्या धडक कारवाईत २६ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं. यामध्ये जहाल नक्षलवादी नेता मिलींद तेलतुंबडे याचाही समावेश आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत नक्षलवादी कमांडर मिलिंद तेलतुंबडेसह इतर प्रमुख 4 नक्षलवादी ठार झाले आहेत. या कारवाईनंतर पोलिसांनी 5 AK47 आणि इतर शस्त्रांसह दारुगोळा जप्त केला आहे.

मिलींद तेलतुंबडे हा भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपी आनंद तेलतुंबडे यांचा भाऊ आहे. मिलींद तेलतुंबडे पोलीस कारवाईत मारला जाणं हा नक्षली चळवळीला मोठा धक्का मानला जात आहे. यानिमीत्ताने यवतमाळच्या शाळेत शिकून कोळसा खाणीत काम करणारा एक व्यक्ती नक्षली चळवळीचा मोठा नेता कसा झाला आणि त्याच्यावर आतापर्यंत काय-काय आरोप आहेत हे यानिमीत्ताने जाणून घेणार आहोत.

नक्षलवादी बनण्याआधी मिलिंद तेलतुंबडे नेमकं काय करायचा?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मिलींद बाबुराव तेलतुंबडे हा नक्षली चळवळीत आल्यानंतर जिवा, दिपक, प्रवीण, अरुण, सुधीर, सह्याद्री या विविध नावांनी ओळखला जात होता. यवतमाळ जिल्ह्यातील राजुर येथील शाळेत १० वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या मिलींद तेलतुंबडेने नंतर ITI चं शिक्षण घेतलं. १९८४-८५ या काळात मिलींद तेलतुंबडेने धोपटाडा येथील ओपन कॉस्ट कोलमाईन्स येथे कामाला सुरुवात केली.

यानंतर दोन वर्षांनी पद्मापूर ओपन कॉस्ट कोलमाईन्स येथे काम करत असताना मिलींद तेलतुंबडेचा अॅडव्होकेट सुजन अब्राहम यांच्याशी संपर्क आला आणि तो नक्षली विचारसरणीकडे आकर्षित झाला. यानंतर मिलींद संयुक्त खदान मजदुर संघ, इंडियन माईन वर्कर्स फेडरेशन या संघटनांच्या माध्यमातून कामगार चळवळींमध्ये सक्रीय झाला. १९९४ च्या आगोदर मिलींद तेलतुंबडेने नवजीवन भारत सभा या संघटनेचं अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. नक्षल चळवळीमध्ये सहभाग घेतल्यानंतर चंद्रपूर, वणी, उमरेड, नागपूर येथील कोळसा पट्ट्यांमध्ये मिलींद डीव्हीसीएम म्हणून काम करत होता.

ADVERTISEMENT

२००४-०५ सालात मिलींद तेलतुंबडेला महाराष्ट्र राज्य स्टेट कमिटीचं सदस्यत्व मिळालं. श्रीधर श्रीनिवासन यांच्या अटकेनंतर मलिंदला स्टेट कमिटीवर सचिव म्हणून पदोन्नती मिळाली. यानंतर २०१२-१३ या काळात मिलींदला उत्तरत गडचिरोली गोंदिया बालाघाट डीव्हीजनचा प्रमुख बनवण्यात आलं. २०१३ साली मिलींदला माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचं सदस्यत्व मिळालं. २०१६-१७ सालात महाराष्ट्र स्टेट कमिटी बंद करण्यात आली आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड अशा नवीन झोनची निर्मीती करण्यात आली याची जबाबदारीही मिलींद तेलतुंबडेवर होती.

ADVERTISEMENT

गडचिरोली, गोंदिया, बालाघाट आणि राजनांदगाव या जिल्ह्यांमध्ये पोलिसांच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष ठेवून मोठ्या हिंसक घटना घडवून आणण्याचं नियोजन करण्याची जबाबदारी मिलींद तेलतुंबडेवर होती. नक्षल चळवळीचा शहरी भागांमध्ये प्रसार करण्यातही मिलींद तेलतुंबडेचा मोलाचा सहभाग मानला जातो.

मिलींद तेलतुंबडेवर आतापर्यंत ६३ गुन्ह्यांची नोंद आहे. ज्यात ४२ गुन्हे पोलीस चकमक, ७ गुन्हे हे नागरिकांच्या खुनाचे, पोलीस खुनाचे ४ गुन्हे, जाळपोळी संदर्भात २ आणि दरोड्याच्या एका गुन्ह्याचा समावेश आहे. २०१९ मध्ये १ मे रोजी जांभुळखेडा ब्लास्ट करवून १५ जवानांची नक्षलवाद्यांनी हत्या घडवून आणली होती, यात मिलींदचा सहभाग होता. याव्यतिरीक्त मागच्या वर्षी कोपर्शी येथे पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत एक पोलिस अधिकार व एक जवान शहीद झाला होता त्यातही मिलींदची महत्वाची भूमिका होती. अशा पद्धतीने २० वर्षांपेक्षा जास्त काळ सुरु असलेला मिलींद तेलतुंबडेचा दहशतवादाचा खेळ अखेरीस १३ नोव्हेंबरला पोलीस कारवाईत संपुष्टात आला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT