राहुल गांधी-आदित्य ठाकरे एकत्र; राऊत म्हणाले, दोघांमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता

भारत जोडो यात्रेत आज आदित्य ठाकरेही सहभागी झाले.
Rahul Gandhi - Aditya Thackerya - Sanjay Raut
Rahul Gandhi - Aditya Thackerya - Sanjay RautMumbai Tak

नांदेड : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे सहभागी झाले. या यात्रेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला होता. त्यानुसार शुक्रवारी दुपारी नांदेड विमानतळावर आदित्य ठाकरे यांचं आगमन झालं. त्यानंतर दुपारी ३ वाजता चोरंबा फाटा येथून ते राहुल गांधींसोबत पदयात्रेत ते सहभागी झाले. यावेळी त्यांच्यासह विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नांदेड हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, आमदार सचिन अहिर आणि आणि शिवसेनेचे पदाधिकारी हेही या यात्रेत सहभागी झाले

यावेळी मुंबई तकशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, लोकं रस्त्यावर उतरले आहेत. आम्ही देखील लोकशाही आणि संविधान वाचवायला निघालो आहोत. त्याला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. महाविकास आघाडीचा भाग म्हणून आम्ही भारत जोडो यात्रेत सहभागी झालो. तसंच आम्ही किमान पीडीपी सोबत तरी युती केली नाही. त्याचसोबत आम्ही 40 गद्दारांप्रमाणे स्वतःला विकलो गेलो नाही, अशीही टीका त्यांनी केली.

संजय राऊत काय म्हणाले?

दरम्यान, या दोन युवा नेत्यांमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असं म्हणतं आदित्य ठाकरे यांच्या या सहभागावर शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे हे दोन प्रमुख नेते आज भारत जोडोसाठी एकत्र चालतील. त्यामुळे देशात एक नवीन उर्जा तयार होईल. देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता या दोन्ही नेत्यांमध्ये आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेला महाराष्ट्राचा आणि शिवसेनेचा पाठिंबा आहे. देश जोडण्यासाठी ही यात्रा आहे, देश जोडण्यासाठी युवांच्या उर्जेची गरज आहे. त्यामुळे हे दोन युवा नेते चालतील, देश जोडतील तर हा देश मजबूत होईल, बलवान होईल.

काँग्रेस अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उपस्थिती :

दरम्यान, काल राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हेही उपस्थित होते. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही या यात्रेत उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थिती लावली होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in