Aditya Thackeray म्हणाले की मी देवेंद्र फडणवीसांच्या जागी असतो तर आत्ता पद सोडलं असतं आणि....

इंडिया टुडेच्या कॉनक्लेव्हमध्ये नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
Aditya Thackeray said that if I was in place of Devendra Fadnavis, I would have quit now and re election in Maharashtra
Aditya Thackeray said that if I was in place of Devendra Fadnavis, I would have quit now and re election in Maharashtra

मी जर आजच्या घडीला उपमुख्यमंत्री असतो तर असल्या सरकारमध्ये राहिलो नसतो. देवेंद्र फडणवीस यांच्या जागी असतो तर मी राजीनामा दिला असता आणि नव्याने निवडणूक घेतली असती असं वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. इंडिया टुडेच्या कॉनक्लेव्हमध्ये आदित्य ठाकरे यांची उपस्थिती होती. त्यावेळी त्यांनी शिवसेना का फुटली? शिवसेनेचं भवितव्य काय आहे? याबाबत सविस्तर भाष्य केलं. इंडिया टुडे ग्रुपचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी हे भाष्य केलं आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आत्ता जे काही महाराष्ट्रात घडलं आहे तो प्रकार एका माणसाच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे झाला आहे. आम्हाला जे सोडून गेले ते त्यांच्या स्वार्थासाठी गेले. आज ते स्वतःला शिवसेना म्हणवत आहेत. मात्र आज माझं त्यांना आव्हान आहे की आज मी राजीनामा देतो आणि ४० आमदारांनी राजीनामा द्यावा आपण पुन्हा निवडणूक घेऊ जो काही महाराष्ट्राच्या जनतेचा कौल असेल तो आम्हाला मान्य असेल असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे. मी रोज किंवा जवळपास एक दिवसाआड हे आव्हान देत असतो मात्र ते स्वीकारत नाहीत.

अडीच वर्षांचं वचन भाजपने मोडलं नसतं तर

अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचं आमच्यात आणि भाजपमध्ये ठरलं होतं. भाजपने वचन मोडलं ते मोडलं नसतं आज ही वेळ आलीच नसती. अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी बसले असते. आज ते उपमुख्यमंत्रीपदी बसले आहेत. मात्र मी त्यांच्या जागी असतो तर राजीनामा दिला असता आणि अशा सरकारमध्ये मी राहिलो नसतो नव्याने निवडणुका घेतल्या असत्या.

शिवसेना का फुटली? शिवसेनेचं भवितव्य काय?

४० आमदार शिवसेना सोडून जातात आणि तुम्ही त्यांना गद्दार म्हणता त्यांच्यावर ५० खोक्यांचा आरोप लावता. चाळीस लोक कसे काय सोडून जातील? यावर आदित्य ठाकरे म्हणाले की आम्ही घाणेरडं राजकारण केलं नाही, भाजपने ते केलं. जे लोक आज सोडून गेले आहेत त्यांच्यावर आम्ही आंधळेपणाने विश्वास ठेवला. मात्र या लोकांनी जे केलं आहे ते महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं आहे. त्यामुळे निवडणुकीत महाराष्ट्राची जनता योग्य तो न्याय करेल. शिवसेना डॅमेज करण्यासाठी, पक्ष पळवण्यासाठी चिन्ह पळवण्यासाठीच निवडणूक आयोगाकडे जाण्याचं कारण होतं. अंधेरी पोटनिवडणूक त्यांना हाणून पाडायची होती असाही दावा आदित्य ठाकरे यांनी इंडिया टुडे कॉनक्लेव्ह मध्ये केला.

देशाच्या लोकशाहीचं काय होणार? याची चिंता जास्त वाटते

शिवसेनेचं भवितव्य हा आमचा प्रश्न नाही. आम्ही लढतो आहोत. ४० गद्दार आमदार आणि १२ गद्दार खासदार निघून गेले. आमच्या पक्षात जे झालं त्यामुळे मला पक्षापेक्षा देशातल्या लोकशाहीची चिंता जास्त वाटते आहे. देशभरात हेच फोडाफोडीचं राजकारण कमी अधिक प्रमाणात चाललं आहे. त्यामुळे मला पक्षापेक्षा जास्त चिंता देशातल्या लोकशाहीची आणि देशाच्या राज्यघटनेची वाटते असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. गद्दार हा शब्द मी वापरतो आहे कारण त्यांच्यासाठी वेगळा कोणताही शब्द नाही असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in