
मुंबई: राज्यसभा निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला आणि विशेषत: शिवसेनेला अत्यंत अनपेक्षितपणे पराभवाचा धक्का दिला. या निवडणुकीत भाजपने आपला तिसरा उमेदवार जिंकून आणण्यात यश मिळवलं आहे. मात्र, असं असलं तरीही शिवसेना खासदार संजय राऊत हे मात्र हा भाजपचा विजय नसल्याचं म्हणत आहेत.
राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊत यांनी मीडियासमोर येऊन हा भाजपचा विजय नसल्याचं म्हटलं आहे. भाजपने निवडणूक आयोगावर दबाव टाकून हा विजय मॅनेज केला असल्याची टीका यावेळी संजय राऊतांनी केली आहे.
पाहा संजय राऊत काय म्हणाले:
'भाजपने नक्कीच जागा जिंकली पण त्यांचा विजय झाला असं मी मानत नाही. पहिल्या पसंतीची सर्वाधिक मतं ही संजय पवारांना होती. किती होती तर 33 पहिल्या पसंतीची... 26 किंवा 27 मतं महाडिकांना पडली. दुसऱ्या पसंतीच्या आकडेमोडीवर त्यांचा विजय झाला. हे मान्य आहे. पण मोठा विजय झाला वैगरे हे जे काही चित्र निर्माण केलं तसं नाहीए. काही अपेक्षित मतं. बाहेरची आम्हाला पडू शकले नाहीत हे खरं आहे.' असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
'ही दोन-चार मतांची घासाघीस झाली. ते कोण आम्हाला माहिती आहेत. पण आमच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी संजय पवारांची जागा जिंकण्यासाठी शर्थ केली. आम्हाला पूर्ण खात्री होती की, आम्ही जिंकू म्हणून.'
'मात्र, पहिल्या क्रमांकांच्या मताचा हिशोब झाला असता तर आम्ही जवळजवळ जिंकलेलोच आहोत. आता ही अत्यंत किचकट प्रक्रिया आहे. राज्यसभेच्या निवडणुकीची. पहिली पसंती, दुसरी पसंती. यावेळी दुसऱ्या पसंतीवर भाजपचा विजय झाला आहे त्यामुळे त्यांचं अभिनंदन.' अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
'आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले लोकं तिथे गेले नाहीत. काही अपक्ष आहेत, काही अमिषं आहेत. काही ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणा आहेत. ठीक आहे आज जिंकले उद्या पाहू... होत असतं निवडणुकांमध्ये अशा प्रकारे.'
'आम्ही आमच्या मतांचा कोटा ज्याप्रमाणे ठरवला होता आम्ही दुसऱ्या पसंतीची मतं घेतली नाहीत आणि माझं एक मत या ठिकाणी बाद करायला लावलं. एक लक्षात घ्या. खरं म्हणजे त्यांची दोन मतं बाद होऊ शकत होती. पण दिल्लीतील निवडणूक आयोगावर दबाव टाकून ज्या पद्धतीने आमची मतं बाद केली. त्या पद्धतीने त्यांचीही मतं बाद करण्यासाठी आम्ही पत्र लिहलं होतं. पण निवडणूक आयोगाने त्यांना झुकतं माप दिलं आणि आमचं मत बाद केलं. अशा प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणा निवडणूक आयोगाला वापरुन तुम्ही निवडणू आयोगाला वापरत असाल तर त्याला विजय कसा म्हणणार?' असा सवाल संजयय राऊत यांनी केला आहे.
'जिंकलात.. पण विजय नाही. राज्यसभेनंतर विधानपरिषदेच्या ज्या जागा आहेत त्यात शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या ज्या जागा आहेत त्या आम्ही 100 टक्के जिंकू.'
'हरियाणा, राजस्थान आणि महाराष्ट्रात जे घडलं आहे त्यामुळे निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेबाबत एक गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. आमच्याकडे 169 चं बहुमत आहे. काही अपक्ष जे नेहमी इकडे-तिकडे जात असतात ते पुन्हा इकडे येतील.' असा दावाही संजय राऊत यांनी केला आहेय.