गिरीश महाजनांचा दणका : मिटकरींच्या गावातील राष्ट्रवादीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य अपात्र

जिल्हा परिषद, सहकारी सोयाटीमधील पराभवानंतर अमोल मिटकरी यांना त्यांच्या गावात तिसरा झटका
Girish mahajan - Amol Mitakri
Girish mahajan - Amol MitakriMumbai tak

अकोला : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीच्या आमदार अमोल मिटकरी यांना मोठा धक्का दिला आहे. भाजपच्या विजयसिंह सोळंके यांच्या तक्रारीनंतर मंत्री महाजन यांच्या आदेशानुसार मिटकरी यांच्या गावातील कुटासा ग्रामपंचायतीचे 12 सदस्य अपात्र ठरविण्यात आले आहेत. या 12 पैकी 10 सदस्य अमोल मिटकरी गटाचे अर्थात राष्ट्रवादीचे असल्याची माहिती आहे.

कुटासा गावच्या सरपंच यांनी सदस्यांशी संगनमत करुन 15 लाख रुपयांची ग्रामपंचायतीची इमारत बेकायदेशीरपणे पाडल्याचं आरोप विजयसिंह सोळंके यांनी केला होता. संबंधित इमारत पाडतांना वादळामुळे इमारत पाडल्याचं कारण सरपंचांनी दिलं होतं. मात्र सर्व चौकशीअंती हे कारण खोटं असल्याचा उल्लेख महाजन यांच्या आदेशात आहे. त्यामुळे ठरावाच्या बाजूने सह्या करणाऱ्या सरपंचांसह सर्व 12 लोकांचे सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. या आदेशामुशळे जिल्हा परिषद, सहकारी सोयाटीमधील पराभवानंतर अमोल मिटकरी यांना त्यांच्या गावात तिसरा झटका बसला आहे.

काय म्हटलं आहे आदेशात?

कुटासा ग्रामपंचायत इमारत ही सन २४/८५/८६ मध्ये रु. १५ लक्ष खर्च करुन बांधलेली असून श्री. अनंता रघुनाथ लाखे, सरपंच (ग्रामपंचायत, कुटासा ता. अकोट जि. अकोला) यांनी पुर्व परवानगी न घेता पाडली. याबाबतचे फोटो -पंचायत समिती सदस्य/ग्राम पंचायत सदस्य पानटपरी चालक यांचे प्रतिज्ञालेख व ग्रामस्थांचे निवेदन यामध्ये ग्रामपंचायत इमारत पाडली असे नमुद आहे.

अनंता रघुनाथ लाखे यांच्या म्हणण्यानुसार ग्राम पंचायतीची इमारत ही दिनांक २९/५/२०२१ रोजी नैसर्गिक आपत्तीमध्ये पडली आहे. मात्र तलाठी, कुटासा यांचे पत्र ०९.०६.२०२१ नुसार कुटासा येथे २९.०५.२०२१ रोजीचे नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी वादळवारा याबाबतची कुठलीही नोंद उपलब्ध नाही असे नमुद आहे. पोलीस पाटील कुटासा यांचा दाखला ३१.०७.२०२१ मध्ये नमुद आहे की, दिनांक २९.०५.२०२१ रोजी चक्रीवादळ तसेच वादळ किंवा अतिवृष्टी झाली नसून कोणत्याच प्रकारची पडझड झाली नाही. तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत कुटासा यांचे पत्र दिनांक ३१.०७.२०२१ मध्ये नमुद आहे की, दिनांक २९.०५.२०२१ रोजी कुटासा येथे कोणत्याही प्रकारचे चक्रीवादळ / अतिवृष्टी वादळ झालेले नाही. तसेच कोणत्याही प्रकारची पडझड नुकसान झाले नाही.

सदर तलाठी, पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष यांचे दाखले उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.), जिल्हा परिषद, अकोला यांनी सत्यप्रत केले आहे. ग्रामपंचायत इमारत २९. ०५. २०२१ रोजी पाडल्याचा अहवाल दिल्यानंतर उक्त ग्रामपंचायत इमारत पाडण्यासाठी २३. ०६. २०२१ चा अकोला जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेमध्ये पडलेली इमारत पाडण्याचा ठराव का घेण्यात आला ? या वरुन ३१.०५.२०२१ रोजी ग्रामपंचायतीने केलेला पंचनामा खोटा असल्याचे सिध्द होते.

खोटा पंचनामा करणे व पडलेला ग्रामपंचायत मलबा याचे संरक्षण करण्यास असमर्थ राहिल्याने सरपंच व सर्व सदस्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे सिध्द होते. प्रतिवादी सरपंच यांनी आपल्या समर्थनार्थ कोणताही सबळ पुरावा या न्यायालयासमोर सादर केलेला नाही. उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता, वर नमूद मुद्यांवरुन सरपंच व सर्व सदस्यांनी आपले कर्तव्यात कसूर करुन नियमबाहयता केली असल्याचे सिध्द होत असल्याने विभागीय आयुक्त, अमरावती यांनी पारित केलेल्या आदेशात बदल करुन संबंधित १२ सदस्यांना अपात्र घोषित करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in