
२०१९ ची निवडणूक आम्ही सगळ्यांनी महायुती म्हणून लढवली होती. बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो प्रचाराच्या बॅनरवर होते. जनतेने महायुतील कौलही दिला. मात्र दुर्दैवाने भाजपला सोडून काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आघाडी करण्यात आली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंना खऱ्या अर्थाने दुःख झालं असेल. ज्यांना बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर जवळ केलं नाही त्यांच्यासोबत शिवसेना गेली असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे तसंच आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.
आम्ही जी भूमिका घेतली ती बाळासाहेब ठाकरे यांना आवडणारी भूमिका आहे कारण ही त्यांच्या विचारांची भूमिका आहे. युतीचं सरकार यापूर्वीही राज्यावर आलं होतं. त्याचे शिल्पकार बाळासाहेब ठाकरे होते. महायुती म्हणून निवडणूक लढवण्यात आली. २०१९ ला जनतेने आम्हाला कौलही दिला. मात्र दुर्दैवाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यात आली.
महाविकास आघाडी तयार करण्यात आली तेव्हाच बाळासाहेब ठाकरेंना दुःख झालं असेल. कारण महाविकास आघाडीत आमच्या आमदारांचं खच्चीकरण होत होतं, शिवसैनिकांवर अन्याय होत होता. शिवसैनिकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही हा लढा उभा केला. बाळासाहेब ठाकरेंना आता खरा आनंद वाटत असेल. शिवसेना वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी पुढाकार घेतला याचं त्यांना समाधान असेल असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
निवडणूक आयोगाने आता कुणाची खरी शिवसेना याचे पुरावे मागितले आहेत. दोन्ही गट भूमिका मांडतील. विधानसभेत दोन तृतीयांश बहुमत आमच्याकडे आहे. शिवसेना आम्हीच आहोत. लोकसभेतही दोन तृतीयांश खासदार आमच्यासोबत आहेत. आम्हाला शिवसेना म्हणून मान्यता आहे. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आहे. विधीमंडळात आम्हाला मान्यता आहेच. त्यामुळे आता निवडणूक आयोगापुढे आम्ही आमची भूमिका मांडू असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल हा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावेळी लवकरच विस्तार केला जाईल असं म्हटलं आहे. तसंच मागच्या मंत्रिमंडळाने जे निर्णय घाईत आणि गडबडीत घेतले, जे जीआर घाईत काढले त्यांना स्थगिती दिली आहे. मात्र कुठल्याही विकासकामांना स्थगिती देणार नाही असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.