
मुंबई: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल सामना या वृत्तपत्राला मुलाखत दिली. ही मुलाखत दोन भागांमध्ये दाखवली जाणार आहे. या मुलाखतीवरती अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी यावर पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली. शिंदे गटातून अद्याप कोणी प्रतिक्रिया दिलेली नव्हती. आता शिंदे गटाचे प्रतोद असलेल्या भरत गोगावले यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
आज उद्धव ठाकरे आपल्या मुलाखतीमध्ये म्हटले की जो पालापाचोळा होता तो निघून गेलेला आहे. त्यावर भरत गोगावले म्हणाले ''आज आम्ही जरी पालापाचोळा वाटत असलो, तरी याच पालापाचोळ्याने करामत करून दाखवली आहे, हे सगळ्या महाराष्ट्राने आणि देशाने पाहिले आहे.
पालापाचोळा काय करू शकतो याचे उदाहरण आपण पाहिले आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुणी किती बोलावं? काय बोलावं? याबाबत आम्हाला काही संकेत आहेत. आम्ही आमचं काम केलेला आहे, आगे देखो होता है क्या अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी मुंबई तकशी बोलताना दिली आहे.
आगामी निवडणुकीत शिंदे गटाची काय रणनिती असेल यावर भरत गोगावले म्हणाले ''तीन ते चार महिन्यानंतर नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ही आपल्याला करामत दिसेल. अडीच वर्षानंतर विधानसभा निवडणूक असून त्याआधी लोकसभेची निवडणूक आहे. त्याच्यामध्ये आम्ही करिष्मा करून दाखवणार आहोत. ते मी तुम्हाला आत्ताच सांगत आहोत.''
काल उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना आवाहन केले होते की बाळासाहेबांचा फोटो न लावता मतं मागून दाखवा. त्यावर भरत गोगावले म्हणाले ''बाळासाहेबांना आम्ही दैवत मानलं आहे. याचा अर्थ वडील जरी त्यांचे असले तरी त्यांना उंचीवर नेण्याचं काम हे सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकांनी केलेलं आहे, हे कुणाला नाकारता येणार नाही, म्हणून बाळासाहेब कुणाची प्रायव्हेट मालमत्ता नाही. ती आम्हा सर्व शिवसैनिकांची मालमत्ता आहे. त्याचा वापर करून आम्ही पुढे चाललो आहोत. आम्ही उद्धव साहेबांची मालमत्ता वापरत नाही. बाळासाहेबांनी सर्वांसाठी केलेला जो त्याग आहे त्यात त्यागाचा विचार आम्ही पुढे घेऊन चाललो आहोत''.
आम्ही अजूनपर्यंत वाट पाहत होतो की काहीतरी दोन पाऊले पाठी-पुढे सरकण्याचे काम होईल. परंतु हे आता दिसत नाही. आम्ही सर्वांनी सांगितलं होतं, मुलाखत घेणारे हे सुपारी घेऊन आले आहेत. त्यांनी आता सेकंड इनिंग सुरू केली आहे, हे या मुलाखतीद्वारे कळते आहे अशी सविस्तर प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली आहे.