‘बेडकांना हत्तीच्या मालकाचाच आशीर्वाद ‘, शिवसेनेचे (UBT) स्फोटक भाष्य
भाजप आणि शिवसेनेतील राजकीय वादावर उद्धव ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे यांना नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे बळ देत असल्याचे ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.
ADVERTISEMENT

Maharashtra Politics : ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रामध्ये शिंदे’, या जाहिरातीवरून भाजप-शिवसेनेत झालेला संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळाला. भाजपच्या खासदाराने शिंदेंना थेट बेडूक संबोधले, तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही पक्षातील नाराजी जाहिरपणे बोलून दाखवली. या सगळ्या प्रकरणावर शिवसेनेने (UBT) एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना डिवचत भाष्य केलं आहे.
सामना अग्रलेखात काय म्हटलं आहे?
– “महाराष्ट्रातील मुडदूस सरकारचे भवितव्य काय हे कोणीच सांगू शकणार नाही. गेले चारेक दिवस दोन्ही बाजूच्या शेंदाड शिपायांनी एकमेकांवर यथेच्छ शेणफेक केल्यावर भाजपचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकतर्फी जाहीर केले की, ‘भाजप व बनावट शिवसेनेत काही मतभेद होते, पण आता ते राहिलेले नाहीत.’ बावनकुळे हे नेहमीप्रमाणेच अंधारात चाचपडत आहेत. आमच्यात काही मतभेद नाहीत, असे बावनकुळे सांगतात. त्याच वेळी देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य प्रवक्ते व शेणफेक विभागाचे प्रमुख खासदार अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले की, ‘मुख्यमंत्री शिंदे व त्यांचे लोक म्हणजे बेडूक आहेत. बेडूक कितीही फुगला तरी त्यास हत्ती होता येणार नाही!”
‘बेडकांची चाळीस पिले…’, शिंदेंच्या आमदारांना डिवचलं
– “बोंडे यांची शाळा घेणे गरजेचे आहे. वाक:प्रचार म्हण अशी आहे की, बेडूक कितीही फुगला तरी बैल होऊ शकत नाही. पण मालकांना बैल कसे म्हणावे? म्हणून बैलाच्या जागी हत्ती आणला व त्यात काही चुकीचे नाही. म्हणजे फडणवीस हे वैभवशाली हत्ती तर मुख्यमंत्री शिंदे हे डबक्यातले बेडूक आहेत. फडणवीस यांच्या प्रवक्त्याने शिंदे यांना बेडूक वगैरे म्हटले तरी बेडकांची चाळीस पिले तोंडातून अक्षर काढायला तयार नाहीत. सगळे कसे चिडीचूप.”
– “खासदार बोंडे असेही म्हणाले की, ‘शिंदे यांची उडी ठाण्याच्या पलीकडे नाही. त्यांना ठाणे म्हणजे महाराष्ट्र वाटतो काय?’ बोंडे यांच्या मुखातून फडणवीस बोलत आहेत हे नक्की. शिंदे व त्यांच्या लोकांनी महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रांत दिलेल्या जाहिरातींचे हे असे पडसाद महाराष्ट्रात उमटले. फडणवीस यांच्यापेक्षा आपणच महाराष्ट्रात लोकप्रिय असून जनतेचा कौल आपल्यालाच आहे असा ‘टेंभा’ मिरवणारी मुख्यमंत्री शिंदे यांची एक जाहिरात प्रसिद्ध होताच गोंधळ उडाला व भाजपच्या लोकांनी शिंद्यांच्या गटाला बेडूक वगैरे म्हणेपर्यंत मजल गेली.”










