
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरून व्यक्त होत असलेल्या संतापाची धग अद्यापही कमी झालेली नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 13व्या वंशजांसह विविध राजकीय पक्षाकडून होत आहे. आज पुण्यात राज्यपालांना काळे झेंडे दाखवण्यात आले. काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसी कारवाई करण्यात आल्यानंतर छत्रपती संभाजीराजेंच्या संतापाचा कडेलोट झाला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून सतत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केल्या जाणाऱ्या विधानावरून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज पुण्यात छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. राज्यपालांना काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर छत्रपती संभाजीराजेंनी हा कुठला न्याय आहे? असा सवाल शिंदे-फडणवीस सरकारला केला आहे.
छत्रपती संभाजीराजेंनी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक करतानाचा व्हिडीओ ट्विट केलाय. छत्रपती संभाजीराजे म्हणतात, 'राज्यपालांना काळे झेंडे दाखवले म्हणून अटक! आणि देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या कोश्यारींना सुरक्षा ! हा कोणता न्याय?", असा सवाल छत्रपती संभाजीराजेंनी केलाय.
छत्रपती संभाजीराजे पुढे म्हणतात, "स्वराज्य'चे प्रवक्ते धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे येथे भगतसिंग कोश्यारीला काळे झेंडे दाखवले. म्हणून स्वराज्यच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, मग कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून उघड माथ्याने कसे फिरत आहेत?", अशा शब्दात छत्रपती संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केलाय.
"आमच्या दैवतांचा, महापुरुषांचा अवमान करून कोश्यारी उघड माथ्याने राज्यात फिरतात, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. उलट त्यांच्या वक्तव्याचा संविधानिक मार्गाने निषेध केला तरी पोलिस कारवाई करतात. हा कुठला न्याय आहे?", असा सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून शिंदे सरकारला केला आहे.