
पुणे : 'मी एकटी म्हणजे आयोग, हे आधी डोक्यातून काढा. आयोग म्हणजे त्यात इतर सदस्यही असतात. तसंच मला यापूर्वी असल्या ५६ नोटिसा आल्या, त्यात अजून एकाची भर पडली, असं म्हणतं भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना प्रत्युत्तर दिलं. त्या पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये बोलतं होत्या.
अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या कपड्यांवरुन या दोन्ही नेत्या आमने-सामने आल्या आहेत. शुक्रवारी रुपाली चाकणकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांच्यावर आरोप केले होते. वाघ यांनी आकसापोटी आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आयोगाविरोधात भूमिका घेतली आणि यातून त्यांनी आयोगाचा अवमान केला, असा दावा करत रुपाली चाकणकर यांनी वाघ यांना कलम ९२ (२) (३) नुसार नोटीस बजावली होती. यावर आज वाघ यांनी प्रत्तुत्तर दिलं.
चित्रा वाघ म्हणाल्या, आम्ही काय गुळं खोबर देऊन आमंत्रण देण्यासाठी गेलो नव्हतो. पण तरीही त्यांनी या प्रकरणात उडी घेतली. महिलांचा आदर आणि सन्मान जपण्यासाठी महिला आयोग स्थापन झाला, असं सांगितलं. पण आयोगाच्या कार्यपद्धतीमुळे न्यायाची भाषा कोणती, हा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हीही तिथे काम करुन आलेलो आहोत.
एकटी अध्यक्ष म्हणजे आयोग नसतो. एकटी मी म्हणजे आयोग, हे डोक्यातून काढा. आयोग म्हणजे अध्यक्षांसह सदस्य असतात. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (डी.जी) आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात. त्यामुळे मला पाठवलेली नोटीस सर्व सदस्यांच्या सहमतीने पाठवली का? त्यामुळे असल्या ५६ नोटीसा रोज येत असतात. त्यात एकाची भर पडली, अशी खिल्ली उडवत चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या नोटीसला केराची टोपली दाखविली.
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, महिला आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितलं की मुंबई पोलिस आयुक्तांनी दखल घेतली नाही, पण हे कशाच्या आधारावर सांगता? मुंबई पोलिसांकडून खुलासा मागविला का? एवढ्या मोठ्या पदावर बसल्यानंतर अशी विधानं शोभत नाहीत. बाष्कळ विधानं बंद केली गेली पाहिजेत. तसंच काहीही झालं तरी शिवाजी महाराजांच्या पवित्र महाराष्ट्रात उर्फीचा नंगानाच चालू देणार नाही, अशी रोख-ठोकं भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली.