मातोश्रीवर खडाजंगी, अनिल परब बैठकीतून निघून गेले, वरुण सरदेसाईंसोबत मोठा वाद; नेमकं काय घडलं?
Mumbai Mahanagar Palika Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार निवड अंतिम टप्प्यात असताना, मातोश्रीवर झालेली ही खडाजंगी ठाकरे गटासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उमेदवारीवरून निर्माण झालेल्या नाराजीचा परिणाम निवडणुकीत होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबई महानगरपालिका : मातोश्रीवर खडाजंगी, अनिल परब बैठकीतून निघून गेले;
'त्या' वॉर्डवरुन वरुण सरदेसाईंसोबत मोठा वाद
Mumbai Mahanagar Palika Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी आणि जागावाटपावरून शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत मतभेद उफाळून आल्याचे चित्र समोर आले आहे. मातोश्रीवर रविवारी (दि.28) रात्री पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत मोठा वाद झाला असून, या वादाचे केंद्रबिंदू ठरले ते शिवसेना नेते अनिल परब आणि आमदार वरुण सरदेसाई. जागावाटपावरून दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली असून, वाद इतका टोकाला गेला की अनिल परब यांनी थेट बैठक सोडून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे पश्चिम येथील वॉर्ड क्रमांक 95 मधील उमेदवारी हा या वादाचा मुख्य मुद्दा ठरला. या प्रभागातून अनिल परब यांच्या गटाकडून शेखर वैंगणकर यांना उमेदवारी देण्याचे आधी निश्चित झाले होते. मात्र, ऐन वेळेला ही उमेदवारी रद्द करत श्रीकांत सरमळकर यांचे जावई आदिक शास्त्री यांना तिकीट देण्यात आल्याने अनिल परब प्रचंड नाराज झाले.
आदिक शास्त्री यांना उमेदवारी देण्याची शिफारस आमदार वरुण सरदेसाई यांनी केल्याचे समजते. याच मुद्द्यावरून परब आणि सरदेसाई यांच्यात जोरदार वाद झाला. बैठकीदरम्यान दोघांमध्ये तीव्र वाद झाला आणि अखेर अनिल परब यांनी संताप व्यक्त करत बैठक अर्धवट सोडून बाहेर पडल्याची माहिती आहे. मातोश्रीवर झालेली ही घटना पक्षातील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आणणारी ठरली आहे.
दरम्यान, या वादाला केवळ महापालिका उमेदवारीपुरते मर्यादित न ठेवता त्यामागे मागील विधानसभा निवडणुकीतील जुन्या मतभेदांची पार्श्वभूमी असल्याचेही बोलले जात आहे. मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद निर्माण झाले होते, त्याचीच किनार या ताज्या वादाला असल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगितले जाते. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार निवड अंतिम टप्प्यात असताना, मातोश्रीवर झालेली ही खडाजंगी ठाकरे गटासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उमेदवारीवरून निर्माण झालेल्या नाराजीचा परिणाम निवडणुकीत होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.










