घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हा गदाधारी हिंदुत्ववाद्यांना शिकवू नये-उद्धव ठाकरे
हिंदुत्व सोडलं म्हणजे काय? ते काही धोतर आहे का सोडायला? आम्हाला हिंदुत्व शिकवणाऱ्यांचं हिंदुत्व कुठे आहे? बाबरी पाडली तेव्हा जे बिळात लपले होते त्यांनी आम्हाला शिकवू नये असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. आपली मुंबई, आपलं कार्ड पुढे चला या बेस्टच्या कार्डचा सोहळा मुंबईत रंगला होता त्यावेळी केलेल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी ही […]
ADVERTISEMENT

हिंदुत्व सोडलं म्हणजे काय? ते काही धोतर आहे का सोडायला? आम्हाला हिंदुत्व शिकवणाऱ्यांचं हिंदुत्व कुठे आहे? बाबरी पाडली तेव्हा जे बिळात लपले होते त्यांनी आम्हाला शिकवू नये असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. आपली मुंबई, आपलं कार्ड पुढे चला या बेस्टच्या कार्डचा सोहळा मुंबईत रंगला होता त्यावेळी केलेल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी ही टीका केली आहे. घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हा गदाधारी हिंदुत्ववाद्यांना शिकवू नये असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?
“मला राजकारणाची पर्वा नाही. अशा कार्यक्रमांमध्ये राजकीय किती बोलावं? याला मर्यादा असते. सगळे ताळतंत्र सोडत असतील तर आम्हीही थोडं ताळतंत्र सोडू शकतो. हिंदुत्व सोडलं, शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. म्हणजे आम्ही नेमकं काय सोडलं? हिंदुत्व म्हणजे काय धोतर आहे का? की घातलं, नेसलं आणि सोडलं. असं मुळीच नाही. एक मुद्दा मी मुद्दाम सांगेन जे आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की काय तुम्ही हिंदुत्वासाठी केलंत? ज्यावेळी बाबरी पाडली तेव्हा सुद्धा तुम्ही बिळात लपला होतात.”
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, “राम मंदिर बांधण्याचा निर्णय हा देखील तुमच्या सरकारने घेतलेला नाही. तो निर्णय कोर्टाने दिला आहे. राम मंदिर बांधतानाही तुम्ही लोकांसमोर झोळ्या पसरवल्या आहेत. तुमचं हिंदुत्व आहे कुठे? शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जे हिंदुत्व शिकवलं आहे ते हेच आहे की मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा आहे. हे कुठले आले घंटाधारी हिंदुत्ववादी? घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हा गदाधारी हिंदुत्ववाद्यांना शिकवायला जाऊ नये. आमचं हिंदुत्व हे गदाधारी हिंदुत्व आहे. हनुमान चालीसा पठण करायचं आहे खुशाल करा. रामदासस्वामींनीही अप्रतिम मारूती स्तोत्र लिहून ठेवलं आहे. भीमरूपी महारूद्रा.. भीमरूप आणि महारुद्र रूप काय असतं तर शिवसेनेच्या अंगावर आलात तर दाखवायला कमी पडणार नाही हे लक्षात ठेवा. “