
नाशिक : नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीत नाट्यमय घडामोडीनंतर शेवटच्या क्षणी काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. यानंतर बोलताना सत्यजीत तांबे यांनी आपण सर्वपक्षीय नेत्यांना भेटणार असून त्यांच्याकडे पाठिंबा मागणार आहोत, असं स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे दोन्ही गट, भाजप, रासप, मनसे या सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्यजीत तांबे यांच्या पाठिंब्याबाबत मोठं भाष्य केलं आहे. अद्याप कोणीही पाठिंबा मागितलेला नाही. पण पाठिंबा मागितला तर नक्की विचार करु, असं बावनकुळे म्हणाले.
या निवडणुकीत भाजपच्या दोन कार्यकर्त्यांनी फॉर्म भरला आहे. पण भाजपने कोणालाही एबी फॉर्म दिलेला नाही. भाजपकडून इथे राजेंद्र विखे पाटील यांच्या नावाचा विचार सुरु होता. मात्र मागच्या सहा महिन्यांपूर्वी उमेदवारी जाहीर झाली असती तर तयारीला वेळ मिळाला असता, अशी भूमिका घेत त्यांनी निवडणूक लढविण्यासाठी असमर्थता दर्शविली. त्यामुळे भाजपने कोणालाही AB फॉर्म दिलेला नाही.
आता ही निवडणूक अपक्षांची होईल असं दिसतं आहे. त्यांचेही अपक्ष आहेत आणि आमचे ही अपक्ष आहेत. सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्याबाबत बावनकुळे म्हणाले, आज तरी आम्हाला कोणीही पाठिंबा मागितलेला नाही. मात्र सत्यजीत तांबे यांनी जर पाठिंबा मागितला तर त्याबाबत विचार करु. भाजपच्या पार्लमेंट्री बोर्डासमोर ही भूमिका मांडू आणि त्यानंतर आम्ही त्यांना प्रतिसाद देऊ, असही त्यांनी स्पष्ट केलं.
नाशिकमध्ये एबी फॉर्म का दिला नाही? या प्रश्नावर बोलताना बावनकुळे म्हणाले, गल्लीपासून दिल्लीपर्यंत आमचे सरकार आहे. पण काही ठिकाणी आमची ताकद कमी आहे, हे मान्य करायला हवं. सहकार क्षेत्र, शिक्षक मतदारसंघ यामध्ये आमची ताकद नाही. आमच्या सुतगिरण्या, दूध संघ नाही, हे मान्य करायला हवं.
कोकणमध्ये आम्ही सातत्याने हारतं आहोत, पण आता ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या रुपाने चांगला उमेदवार आहे. अमरावतीमध्ये आमची ताकद आहे तर तिथं आम्ही सहा महिने आधीच उमेदवार जाहीर केला होता. नागपूरमध्ये जाहीर केला होता. ज्याठिकाणी आम्ही कमजोर आहोत, त्याठिकाणी एक आणि एक अकरा करावेच लागते. अशीही प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली.