
नागपूर : विधानपरिषदेच्या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघात शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी दाखल न करता त्यांचे पुत्र काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. तसंच आपण भाजप आणि इतर पक्षांना पाठिंब्यासाठी विनंती करणार असल्याचंही सत्यजीत तांबे यांनी सांगितलं.
दरम्यान, या प्रकरणानंतर राज्य काँग्रेसला मोठा धक्का बसला असून भाजपचा पाठिंबा घेणं हा काँग्रेसशी दगाफटका आहे. सत्यजीत तांबेंना काँग्रेस पाठिंबा देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना तांबे पिता-पुत्रांनी दगाफटका केल्याचा आरोपही पटोले यांनी केला.
यावेळी पटोले म्हणाले, नाशिकमध्ये जे झालं त्याची इत्यंभूत माहिती हायकमांडला दिली आहे. त्यांचा आज निर्णय होईल. त्यांचे जे काही निर्देश येतील त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल. पण बंडखोरांना काँग्रेस समर्थन देणार नाही. सत्यजित तांबेंना काँग्रेसचं समर्थन नाही. भाजपला आज दुसऱ्यांचे घर फोडताना आनंद होत आहे. पण त्यांचे घर फुटेल तेव्हा त्यांना याच दुःख कळेल, असं म्हणतं पटोले यांनी भाजपवरही निशाणा साधला.
नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीत नाट्यमय घडामोडीनंतर शेवटच्या क्षणी काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेसनं इथून विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी देऊन एबी फॉर्म दिला होता, मात्र ऐनवेळी सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. नाशिक निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमधील गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.
दरम्यान, यानंतर बोलताना तांबे यांनी आपण सर्वपक्षीय नेत्यांना भेटणार असून त्यांच्याकडे पाठिंबाही मागणार आहोत, असं स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे दोन्ही गट, भाजप, रासप, मनसे या सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दुसऱ्या बाजूला भाजपनेही इथून कोणत्याच उमेदवाराला एबी फॉर्म दिलेला नाही, त्यामुळे भाजप तांबे यांना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.