निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आलेला धनुष्यबाण शिवसेनेला नेमका कसा मिळाला होता?
शिवसेनेतल्या सर्वात मोठ्या फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांनीही पक्षचिन्हावर दावा केला होता. मात्र पुढील आदेशापर्यंत निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्य-बाण चिन्ह आणि नाव गोठवलं आहे. उद्धव ठाकरेंसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातो आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांनाही शिवसेना हे नावही […]
ADVERTISEMENT

शिवसेनेतल्या सर्वात मोठ्या फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांनीही पक्षचिन्हावर दावा केला होता. मात्र पुढील आदेशापर्यंत निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्य-बाण चिन्ह आणि नाव गोठवलं आहे. उद्धव ठाकरेंसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातो आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांनाही शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. पक्षाचं नाव गोठवलं जाणार आणि शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवला जाणं हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातो आहे. आपण जाणून घेऊ धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेला कसं मिळालं होतं?
२१ जून २०२२ शिवसेनेत उभी फूट
२१ जूनला २०२२ ला शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारालं आणि ४० आमदारांना सोबत घेऊन ते गुवाहाटीला गेले होते. शिवसेनेचं पक्ष नेतृत्व म्हणजेच उद्धव ठाकरे यांनाच त्यांनी थेट आव्हान दिलं. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे नेत नाहीत हा ठपका एकनाथ शिंदे यांनी ठेवला. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. महाविकास आघाडीचं सरकार राज्यावर होतं जे उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे पडलं. त्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. आता शिंदे फडणवीस सरकार आलेलं असताना शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडले.
शिवसेनेच्या स्थापनेचा इतिहास
शिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली. मुंबईत होणारा मराठी माणसावरचा अन्याय आणि अत्याचार या विरोधात आवाज उठवणारी संघटना म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेनेचा वाघ हा शिवसेनेसोबत होताच. मात्र शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह सुरूवातीपासून शिवसेनेसोबत नव्हतं.बाळासाहेब ठाकरे यांनी या पक्षाची स्थापना केली होती. प्रबोधनकार ठाकरे यांनी ३० ऑक्टोबर १९६६ ला झालेल्या मेळाव्यात हा बाळ मी महाराष्ट्राला सोपवत आहे असं म्हटलं होतं.
धनुष्यबाण हा शिवसेनेच्या भात्यात कसा आला?
धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेला १९८९ मध्ये मिळालं. शिवसेनेची पक्ष म्हणून नोंद केल्यानंतर हे चिन्ह शिवसेनेला मिळालं.तोपर्यंत शिवसेनेने रेल्वे इंजिन, कप बशी, ढाल तलवार अशा विविध चिन्हांवर निवडणुका लढवल्या होत्या. आता शिवसेनेला पुन्हा एकदा चिन्हासाठी झगडावं लागणार आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघंही चिन्ह काय निवडणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.