"बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून मी बाहेर पडलो नाही" राज ठाकरेंनी सांगितली 'त्या' भेटीची आठवण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण चर्चेत, जाणून घ्या काय म्हणाले आहेत राज ठाकरे?
I didn't come out with a dagger in Balasaheb's back, MNS Chief Raj Thackeray said, reminiscing about that meeting
I didn't come out with a dagger in Balasaheb's back, MNS Chief Raj Thackeray said, reminiscing about that meeting

बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून मी बाहेर पडलेलो नाही. मी शिवसेनेत अस्वस्थ झालो होतो. बाळासाहेबांना समजलं होतं की मी आता पक्षात राहणार नाही. त्यावेळी त्यांना मी भेटायला गेलो होतो तो किस्सा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या भाषणात सांगितलं.

काय म्हटलं आहे बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीबाबत राज ठाकरेंनी?

त्यावेळी मी बाळासाहेबांना भेटायला गेलो होतो. मी शिवसेनेत असतानाची ती शेवटची भेट त्यांच्यासोबतची होती. माझ्यासोबत मनोहर जोशी होते. ते खोलीच्या बाहेर गेले त्यानंतर बाळासाहेब ठाकरे उभे राहिले आणि त्यांनी मला घट्ट मिठी मारली आणि मग म्हणाले जा. हे त्यांनी का केलं? कारण त्यांना कळलं होतं की मी आता शिवसेनेत राहणार नाही. मी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून बाहेर पडलेलो नाही. जे कुणी पक्षाच्या बाहेर पडले ते दुसऱ्या पक्षात गेले, सत्तेत गेले. मी स्वतःच्या जिवावार पक्ष काढला आणि तुमच्या जिवावर तो मोठा करून दाखवला असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

एकहाती सत्ता द्या महाराष्ट्रातले टोल बंद करतो असंही राज ठाकरेंनी म्हटलंय

हातात सत्ता द्या, महाराष्ट्रातले टोल बंद करतो अशी गर्जना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली आहे. मुंबईतल्या मेळाव्यात राज ठाकरे करत आहेत. ज्यांनी टोल बंद करायला हवा त्यांना पत्रकार प्रश्न विचारत नाहीत. कारण सत्ताधाऱ्यांपासून अनेकांचा 'कट' त्यामध्ये असतो. कुणी याबाबत अवाक्षर काढत नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

मनसेबाबत अपप्रचार केला जातो की आपला पक्ष आंदोलन अर्धवट सोडतो

आपल्या विरोधात काही पक्ष, संघटना असा प्रचार करतात की राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष आंदोलनं अर्धवट सोडतो. मला एक आंदोलन दाखवायचं. तिथे तुम्ही अशा लोकांना सक्षमपणे उत्तर दिलं पाहिजे. मनसेने अर्धवट सोडलेलं एक आंदोलन दाखवायचं. उद्या जर लोक टीका करत असतील तर तुम्ही त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की तुमच्या पक्षाने काय केलं? असंही राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.

मोबाईल फोनवर इंग्रजी आणि हिंदी भाषा ऐकू येत होती. त्यावेळी मी ठाण्यात भाषण करत होतो. ठाण्यातच मला पहिला आवाज खळ्ळ खटॅकचा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला त्या मोबाईल कंपन्यांचे फोन आले आम्ही लवकरच मराठी भाषा मोबाईलवर आणतो. मी त्यांना सात दिवसांची मुदत दिली. ज्यानंतर मोबाईलवर मराठी भाषा ऐकू येऊ लागली असंही राज ठाकरेंनी सांगितलं. तसंच एक आंदोलन दाखवा जे अपुरं सोडलं असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

शिवसेनेवर राज ठाकरेंची कडाडून टीका

मागचे दोन अडीच वर्षे जे महाराष्ट्रात झालं ना ती महाराष्ट्रासाठी चांगली नाही. अडीच वर्षात जे काही चित्र महाराष्ट्रात दिसलं तसं कधीही होत नव्हतं. २०१९ ला ज्यांनी मतदान केलं त्यांना आता आठवतही नसेल की आपण कुणाला मतदान केलं. आत्ता जे काही महाराष्ट्रात चाललं आहे ते राजकारण नाही ती फक्त आर्थिक अॅडजेस्टमेंट आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

शस्त्रक्रियेवरून राज ठाकरे यांचं मिश्किल भाष्य

आज २३ तारीख आहे, या २० ऑगस्टला माझ्या शस्त्रक्रियेला दोन महिने पूर्ण झाले. आल्या आल्या पहिल्यांदा मी महाराजांच्या मूर्तीजवळ गेलो दर्शन घेतलं आणि मी व्यवस्थित चालतोय हे पण दाखवलं. मी हिप रिप्लेसमेंट करतोय म्हटल्यावर एकाने मला विचारलं की का करताय हे ऑपरेशन? तर मी म्हटलं इतकी वर्ष जवळच्यांनी जी काही माझी वाट लावली आहे ना त्यामुळे करावी लागते आहे. असं राज ठाकरे म्हणाले आणि एकच हशा पिकला. लोक काय काय प्रश्न विचारतात कळत नाही. असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in