Shivsena : शिंदे गटात गेलेल्या जयदेव ठाकरेंचे चिरंजीव 'मातोश्री अन् उद्धव काकांसोबत'

"कठीण काळात उद्धव काकांना साथ देणं माझं कर्तव्य"
jaydeep thackeray
jaydeep thackeray Mumbai Tak

मुंबई : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दोन नंबरचे सुपुत्र जयदेव ठाकरे यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. दसरा मेळाव्याच्या दिवशी त्यांनी शिंदे यांच्या व्यासपीठावर येऊन भाषणही केले. मात्र आता जयदेव ठाकरे यांचे चिरंजीव जयदीप ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. कठीण काळात कुटुंबाला साथ देणं गरजेचं आहे, असं म्हणतं त्यांनी ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

काय म्हणाले जयदीप ठाकरे?

साम टीव्हीशी बोलताना काय जयदीप ठाकरे म्हणाले, बाकी कुटुंब कोणाला पाठिंबा देतंय याबाबत मला बोलायचं नाही. तो त्यांचा अधिकार आहे. पण मी ठाकरे घराण्यातील मोठा नातू आहे. माझ्यात बाळासाहेबांचं रक्त आहे आणि या परिस्थितीत मी माझ्या कुटुंबाला साथ देणं माझं कर्तव्य आहे. मोठा नातू म्हणून मी जबाबदारी पार पाडतोय.

तसेच मला उद्धव काका आणि बाळासाहेबांविषयी प्रचंड आदर आहे त्यामुळे मी शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला गेलो. जयदीप ठाकरे यांना खरी शिवसेना कोणती विचारलं असता ते म्हणाले की, लोकांना माहित आहे खरी शिवसेना कोणती आहे. तसेच काकांनी मला संधी दिली तर किंवा तशी संधी मिळाली तर मी ती जबाबदारी नक्की पार पाडेल.

शिंदेंना पाठिंबा देताना जयदेव ठाकरे काय म्हणाले होते?

एकनाथ शिंदे माझा आवडीचा आहे. आता ते मुख्यमंत्री आहेत त्यामुळे एकनाथराव असं म्हणावं लागेल. पाच सहा दिवस झाले मला एक-एक फोन येत आहेत की तुम्ही शिंदे गटात गेलात का? अरे हा ठाकरे कुणाच्या गोठ्यात बांधला जात नाही. एकनाथरावांनी जी भूमिका घेतली आहे ती मला आवडली. असा धडाडीचा माणूस आपल्या महाराष्ट्राला हवा आहे. मी त्यांच्या प्रेमाखातर इथे आलो होतो, असे ते म्हणाले होते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in