MCA Election: “मला पवारांच्या विरोधात उभं करून मनोहर जोशी गायब” भुजबळांनी सांगितला भन्नाट किस्सा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या पंचाहत्तरीचा कार्यक्रम मुंबईत पार पडला. या कार्यक्रमासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती होती. छगन भुजबळ यांनी यावेळी खुमासदार भाषण केलं. MCA म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लागली होती तेव्हा ती निवडणूक शरद पवारांच्या विरोधातही लढलो असं सांगत असताना छगन भुजबळ यांनी मनोहर जोशी यांचा भन्नाट किस्सा सांगितला.

काय म्हणाले छगन भुजबळ त्यावेळच्या निवडणुकीबाबत?

MCA ची म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लागली होती. त्यावेळी मला मनोहर जोशींचा फोन आला. ते म्हणाले MCA च्या अध्यक्षपदासाठी मी तुमचं नाव देतो आहे. तुम्ही ही निवडणूक लढवा. मी त्यांना म्हटलं मला त्यातलं काहीही माहित नाही. तर मला म्ङणाले की मी आहे ना तुमच्यासोबत. असं म्हणत मनोहर जोशींनी माझा फॉर्म भरला. त्यांच्या मुलाने अनुमोदक म्हणून फॉर्मवर सही केली.

माझ्या विरूद्ध कोण उभं होतं? शरद पवार

मला काहीच माहित नव्हतं. मी चौकशी केली माझ्या विरूद्ध कोण उभं होतं? शरद पवार साहेब. मग मी मनोहर जोशी आणि त्यांच्या मुलाला शोधायला सुरूवात केली. हे दोघं गायब. मी गेलो बाळासाहेब ठाकरेंकडे. मी त्यांना सांगितलं की MCA च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा माझा अर्ज मनोहर जोशींनी भरला आणि आता ते दिसतच नाहीत कुठे. बिचारे बाळासाहेब त्यांना फोन करू लागले. यांना, त्यांना फोन करून माहिती घेऊ लागले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

..आणि मनोहर जोशी शरद पवारांसोबत आले

निवडणुकीच्या दिवशी वानखेडे स्टेडियमला गेलो. मी अध्यक्षपदाचा उमेदवार होतो. तिकडून शरद पवार आले, माझ्या विरूद्ध तेच उभे होते आणि पवारांसोबत कोण आलं? मनोहर जोशी. अहो यांचं काही सांगता येत नाही हो.. असं भुजबळ म्हणाले आणि एकच हशा पिकला. MCA ची निवडणूक कशी झाली होती आणि मनोहर जोशींनी कसं आपल्याला उभं राहायला सांगितलं आणि गायब झाले हा किस्सा आज छगन भुजबळ यांनी भाषणात सांगितला.

या निवडणुकीनंतर दोन महिन्यांनी महानगरपालिकांची निवडणूक आली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी मला पुढे केलं. त्याआधी प्रजा समाजवादी पक्षासोबत शिवसेनेचा समझौता असायचा. पण जेव्हा मला उभं केलं तेव्हा बाळासाहेब म्हणाले की यंदा आपण स्वबळावर लढू. त्यावेळी बऱ्याच लोकांनी मशाल ही निशाणी घेतली. मी त्यावेळी आमदार होतो निवडून आलो आणि मला बाळासाहेबांनी मुंबईचा महापौर केलं. ही आठवणही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT