श्रीकांत शिंदे-राज ठाकरे भेट : मन जुळली, तारा जुळवण्याचं काम CM शिंदेंच्या सुपुत्राकडे?

दोन दिवसांपूर्वी मनसेच्या शाखेला भेट देणारे श्रीकांत शिंदे आज थेट पक्षप्रमुखांच्याच घरी
mp shrikant shinde raj thackeray met at shivtirth bunglow
mp shrikant shinde raj thackeray met at shivtirth bunglowMumbai Tak

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी ही भेट झाली. दोन दिवसांपूर्वी मनसेच्या शाखेला भेट देणारे श्रीकांत शिंदे आज थेट पक्षप्रमुखांच्याच घरी पोहचल्याने भाजप-बाळासाहेबांची शिवसेना-मनसे महायुतीच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. मात्र ही भेट केवळ दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी असल्याची प्राथमिक माहिती आहे. भेटीवेळी अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरेही उपस्थित होते.

दोन दिवसांपूर्वीच दिली होती शाखेला भेट :

खासदार श्रीकांत शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच डोंबिवलीतील मनसेच्या दीपोत्सवला उपस्थिती लावली होती. तसंच डोंबिवलीतील कार्यालयालाही भेट दिली होती. त्यावेळी बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले होते, आता तुम्ही नवे नवे अर्थ लावू नका. मनसेच्या माध्यमातून दरवर्षी दीपोत्सव साजरा केला जातो. चांगलं चित्र पाहायला मिळतं आहे. विरोधक एकत्र आले तर चांगलं आहे. दिवाळी सणानिमित्त सगळे एकत्र आहेत, किती विरोधक असलो तरीही सजेशन आणि ऑब्जेक्शन घेऊन पुढे जायचं त्यातून चांगला मार्ग निघतो.

मनसे आमदार राजू पाटील यांची प्रतिक्रिया चर्चेत :

मनसे आमदार राजू पाटील यांची या भेटीवरील प्रतिक्रिया खूपच चर्चेत राहिली आहे. ते म्हणाले होते, शिवतीर्थावर राज ठाकरे गेल्या दहा वर्षांपासून रोषणाईचा कार्यक्रम घेत आहेत. यंदा त्यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रित केलं होतं. शिवतीर्थावरील रोषणाईप्रमाणेच आम्ही फडके रोडवरही रोषणाई केली होती.

असे कार्यक्रम होत असताना एकमेकांच्या गाठीभेटी होत असतात. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ज्या भागात कार्यक्रम ठेवला होता, त्याच भागात आमचं मध्यवर्ती कार्यालय आहे. त्यावेळी मनसेच्या शहराध्यक्षांनी भेट देण्याची विनंती केली. ते आले तेव्हा बरं वाटतं की राजकारणात विरोधक असलो तरी आम्ही दुश्मन नाही, वैयक्तिक असं काही नसतं. एकमेकांना चांगल्या शुभेच्छा नेहमी देत असतो. दिसताना चित्र वेगळं दिसतं परंतु सगळ्या गोष्टी तशा नसतात. राजकारण तसं नसतं.

आमची मन जुळलेली, आता फक्त वरुन तारा जुळले की सर्व जुळून येईल :

युती करायची की नाही हे राज साहेब ठरवतील. पण त्यांनी आदेश दिले आहेत की निवडणुका स्वबळावर लढावायच्या आहेत. त्यामुळे आम्ही पूर्णपणे तयारी केली आहे. पण साहेबांनी सांगितलं युती करायची. तर ती देखील आमची तयारी आहे. मात्र एक नक्की की, आमची सर्वांची मन जुळलेली आहेत, फक्त वरुन तारा जुळले की सर्व जुळून येईल, असंही आमदार पाटील म्हणाले होते.

शिंदे-ठाकरेंची वाढती जवळीक :

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची जवळीक वाढताना दिसत आहे. गणेशोत्सव या दोघांची भेट झाली होती, त्यानंतर राज ठाकरे यांनी शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती. त्यापाठोपाठ मनसेच्या दीपोत्सवर कार्यक्रमालाही एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचं उद्घाटनच शिंदेंच्या हस्ते झालं होतं. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी एकत्र बसून बराच वेळ गप्पा मारल्या होत्या.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in