शिंदे-फडणवीसांनी मुंबईतच घेरलं, पण उद्धव ठाकरेंनी टाकला भलताच डाव!
मुंबई महापालिकेत मागील वर्षभरात 9 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत उद्धव ठाकरेंनी 1 जुलै रोजी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार असल्याची घोषणा केलीए.
ADVERTISEMENT

Maharashtra Politics Latest News: मुंबई: मुंबई महापालिकेच्या (BMC) कथित घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल (19 जून) जाहीर सभेत बोलताना थेट शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) नाव घेतलं. या घोटाळ्याला (Scam) ठाकरेच जबाबदार असल्याचे आरोप त्यांनी केलं. तसंच याच प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT देखील स्थापन करण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. आता शिंदे-फडणवीसांच्या या खेळीनंतर उद्धव ठाकरेंनीही लागलीच दुसरा डाव टाकला आहे. (mumbai municipal corporation scam sit shinde fadnavis govt uddhav thackeray march 1 july maharashtra politics latest news)
मागील वर्षभरात महापालिका निवडणूक झालेली नाही. त्यामुळे सध्याचं सरकार हे महापालिकेचा वारेमाप पैसा वापरत असून आतापर्यंत 9 हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. हाच भ्रष्टाचार उघड करण्यासाठी शिवसेना (UBT) आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात 1 जुलै रोजी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली.
उद्धव ठाकरेंनी टाकला नवा डाव
‘एक वर्ष होऊन गेलं.. पण महापालिकेची निवडणूक झालेली नाही. पावसाप्रमाणे निवडणुका लांबत चालल्या आहे. निवडणुका घेण्याची हिंमत सरकारमध्ये नाही. लोकांची कामं, सेवा कशी करायची?, पैसा उधळला जातोय, खर्च केला जातोय. त्याला जाब विचारणारं कोणीच नाही. मुंबई महापालिकेत वारेमाप उधळपट्टी सुरू आहे. मुंबईला मायबापच कोणी राहिलेला नाही. जे काही आहे ते लुटालूटच सुरू आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी येत्या 1 जुलैला शिवसेना महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे.’ अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केली.
‘या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना नेते आणि आदित्य करेल. एक काळ असा होता की, मुंबई महापालिका 650 कोटी तुटीत होती. त्यानंतर शिवसेनेने कारभार जेव्हा सांभाळला तेव्हापासून आतापर्यंत 92 हजार कोटींच्या ठेवीपर्यंत कारभार गेला आहे.’