
Municipal Corporations FD remained safe Due to BJP Ashish Shelar Claim: मुंबई: 'काल उद्धव ठाकरेजींच्या (Uddhav Thackeray) पक्षाच्या मेळाव्यामध्ये त्यांनी केलेलं भाषण म्हणजे आदळाआपट थयथयाट आणि नृत्य आहे. मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) ठेवी (FD) सुरक्षित राहिल्या याचे कारण भारतीय जनता पक्षाने (BJP) पारदर्शी पद्धतीने चौकीदारी केली हे आहे. त्यामुळे त्यांना त्याच्यावर दरोडा टाकता आला नाही.' अशी जहरी टीका भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलारांनी (Ashish Shelar) उद्धव ठाकरेंवर केली आहे.
आशिष शेलार एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी उद्धव ठाकरेंवर वैयक्तिक टीका देखील केली. 'त्यांनी आमचे बापजादे काढले त्यामुळे आज मला बोलावे लागत आहे. एक अपयशी नेता म्हणजे उद्धव ठाकरे.. ते स्वतःच्या कुटुंबातील बंधू, चुलत बंधू यांनाही ते एकत्र ठेवू शकले नाहीत..' असं म्हणत शेलारांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती हल्ला चढवला आहे. (municipal corporations fd remained safe as bjp did a chowkdari ashish shelar criticized to uddhav thackeray)
'गेल्या 25 वर्षातील उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे मूल्यमापन करायचे झाल्यास मुंबई महानगरपालिकेवर दरोडा टाकणारे डाकू म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. या डाकूंपासून मुंबईला मुक्तता देणं हे भारतीय जनता पक्षाचे मिशन आहे.' अशी टीका करत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवरही शरसंधान साधले.
'आम्ही पारदर्शी पद्धतीने चौकीदारी केली म्हणून या ठेवी राहिल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका शेठजीसारखी चालवली. मी, शेठजी यासाठी म्हणतो की त्यांनी कामे केली ती धनदांडग्या शेठजीसाठी.. मग कधी ताजला सूट द्या.. बिल्डरांना प्रीमियममध्ये सूट द्या.. कधी डिस्कोसारख्या बार मालकांना सूट द्या.. ठेकेदारांना सूट द्या.. काल स्वतः तेच म्हणाले की, ते ठेकेदारांचे पैसे आहेत. ठेकेदारांचे पैसे परत देण्यासाठी शेठजी उद्धव ठाकरे त्या ठिकाणी लक्ष देत आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाने टाकलेला दरोडा आणि डाकूंपासून मुक्त करणे यासाठी मुंबईकरांबरोबर भारतीय जनता पक्ष आहे.'
'स्वतः उद्धव ठाकरेजींच्या पक्षाने केलेला वैचारिक स्वैराचार हा इतिहासात नोंदला जाईल असा आहे. वैचारिक स्वैराचाराचे कृत्य म्हणजे उद्धव ठाकरे यांचे राजकीय जीवन आहे. मला व्यक्तिगत जायचे नव्हते पण त्यांनी आमचे बापजादे काढले त्यामुळे आज मला बोलावे लागत आहे. एक अपयशी नेता म्हणजे उद्धव ठाकरे.. ते स्वतःच्या कुटुंबातील बंधू, चुलत बंधू यांनाही ते एकत्र ठेवू शकले नाहीत.. कौटुंबिक स्तरावर ते अपयशी झाले.. स्वतःच्या पक्ष ते एकत्रित ठेवू शकले नाहीत. गणेश नाईक ते नारायण राणे सगळे त्यांच्यावर आरोप करून बाहेर पडले. स्वतःचा पक्ष, स्वतःचे कुटुंब त्यानंतर सरकार तेही ते एकत्र ठेवू शकले नाहीत.' अशी टीकाही शेलारांनी यावेळी केली.
'संजय राऊत यांना इंग्रजी तरी येते का? त्यांनी इंग्लिशमध्ये एखादे वाक्य बोलून दाखवावे. एखादे भाषण करून दाखवावे. त्यामुळे स्वतःला जमत नाही त्याबाबत दुसऱ्याला दिशादर्शन करणे हे काही बरोबर नाही. मी, आज त्यांना विचारणार नाही की, उद्धवजी इंग्लिशमध्ये बोलू शकतात का? पण मुद्दा असा आहे की, जे स्वप्नामध्ये बायडन आणि कृशोवला भेटतात त्यांना सगळेच स्वप्नामध्ये भेटतात असे वाटत असेल. दावोसमधील करारामध्ये झालेले आकडे बघून त्यांचे डोळेही दिपले आणि बोबडी वळली म्हणून असे हास्यास्पद संजय राऊत बोलतात.' असं म्हणत शेलारांनी राऊतांवर टीकेची झोड उठवली.
'कुणीतरी खरंच म्हटलं आहे किंचित आणि वंचित एकत्र आले आहेत हे सुध्दा त्यांचे लिव्ह इन रिलेशन आहे. आमच्या भीतीपोटी त्यांची पळापळ होते आहे हे स्पष्ट दिसत आहे म्हणून उद्धव ठाकरे मराठी मुस्लिम करत मुस्लिमांच्या मागे लागतात. मग कधी वंचितच्या मागे लागतात. आमच्या भीतीने होणारी पळापळ म्हणजे किंचित आणि वंचित यांची आघाडी आहे.'
राज्यपालांवर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, 'त्यांनी मोर्चा काढला होता त्याचे काय झाले? त्यांनी आंदोलन केले होते. जनतेने त्यांना पाठिंबा दिला नाही. त्यामुळे एका संवेदनशील मनाचं प्रतिनिधित्व स्वतः राज्यपाल यांनी केले आहे. ते आज स्वतःच जाऊ इच्छितात म्हटल्यावर त्याच्यावर क्रेडिट घेण्याचा धंदा म्हणजे उद्धव ठाकरे यांचे हे वाक्य आहे.' असंही शेलार यावेळी म्हणाले.
'मला वाटते हा कार्यक्रम अराजकीय होता. त्यांच्याही पक्षाचे लोक होते. उद्धवजी स्वतः आले नाहीत. ते स्वतः मात्र अन्य पक्षांच्या राजकीय नेत्यांबरोबर गुलूगुलू करत होते. याचा अर्थ ते केवळ मतांचे राजकारण पाहत आहेत. एका विशिष्ट वर्गाची मतं बाळासाहेबांच्या भगवाधारी तैलचित्राचे अनावरण केल्यानंतर मिळतील की, नाही यासाठी एका विशिष्ट गटाच्या मताचं लांगुलचालन करण्यासाठी उद्धवजी कार्यक्रमाला आले नाहीत असा आमचा कयास आहे.' अशी बोचरी टीकाही आशिष शेलारांनी यावेळी केली.