Advertisement

'अरे तुझी औकात आहे का?'; शिंदे, जाधवांचा उल्लेख, नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर चढवला हल्ला

नारायण राणे पत्रकार परिषद : 'अमित शाहांचा दौरा इतका का झोंबला?', उद्धव ठाकरेंवर राणेंनी केली प्रश्नांची सरबत्ती
Narayan Rane, uddhav thackeray
Narayan Rane, uddhav thackeray

उद्धव ठाकरेंनी शिवसेना गटप्रमुखांच्या बैठकीत अमित शाह, नरेंद्र मोदींपासून शिंदे-फडणवीसांपर्यंत सगळ्यांवरच निशाणा साधला. ठाकरेंच्या या भाषणानंतर प्रतिक्रिया उमटल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी टीका केल्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पलटवार करताना औकात काढत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. केंद्रीय मंत्री राणे म्हणाले, "उद्धव ठाकरेंनी काल गोरेगाव येथील नेस्को संकुलात गटनेत्यांचा मेळावा घेतला. उद्धव ठाकरे गटनेत्यांपर्यंत येऊन पोहोचले. आधी मंत्र्यांची बैठक घ्यायचे. नंतर खासदार आमदारांची बैठक घ्यायचे. गटनेत्यांच्या बैठकीत केंद्र सरकारकडे वळले. गटनेता विभागाचा असतो, त्यांच्यासमोर केंद्र सरकार आणि अमित शाह यांच्याबद्दल बोललेत. ते निराशेतून केलेलं हे भाषणं. मुख्यमंत्री पद गेलं म्हणून हे भाषण आहे", अशी टीका राणेंनी ठाकरेंवर केली.

"व्यासपीठावर एक खुर्चीवर रिकामी होती, त्यावर संजय राऊतांचं नाव होतं. उद्धव ठाकरेंना अमित शाहांचा मुंबई दौरा इतका का झोंबला. ते गृहमंत्री आहेत, देशात कुठेही जाऊ शकतात. उद्या महापालिकेची निवडणूक लागली, तर तिथेही येऊ शकतात. उद्धव ठाकरे म्हणालेत अमित शाह म्हणतात जमीन दाखवा. त्यांना याचा अर्थ कळला नाही. जमीन दाखवा म्हणजे जमिनीवर या. उद्धव ठाकरे म्हणाले आस्मान दाखवू. उद्धव ठाकरे कुणाच्या जीवावर म्हणताहेत?", असा सवाल नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना केला.

शिवसेनेचा जन्म झाला, तेव्हा तुम्ही ६ वर्षाचे होते; नारायण राणे ठाकरेंना काय म्हणाले?

"शिवसेनेचा जन्म झाला १९ जून १९६६. तेव्हा फक्त तुम्ही ६ वर्षांचे होता. तेव्हापासून शिवसेना मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी संघर्ष करत होती. त्यात तुम्ही कुठेही नव्हता. तुम्ही १९९९ साली आलात. मी मुख्यमंत्री झालो आणि त्यांना कुणीतरी घरून सांगितलं की राणे मुख्यमंत्री झालेत, तू पण कार्यरत रहा. तू मुख्यमंत्री होशील. तोपर्यंत शिवसेनेत सक्रिय नव्हते. एव्हढी आंदोलनं झाली. शिवसैनिक मार खात होते. जेलमध्ये जात होते. हे कुठे होते.

उद्धव ठाकरे आयत्या बिळावर नागोबा -नारायण राणे

"६२वे वर्ष सुरूये कुठल्या विरोधकाला कानशिलात तरी मारलंय का? पक्ष वाढीसाठी संघर्ष कधी केला? याला मराठीत म्हण आहे, काहीही न करता आणि सरळ मुख्यमंत्री झाले, तेव्हा मी म्हणालो होतो की हे आयत्या बिळावर नागोबा आहेत. आता नुसतं आम्ही त्यांना दुध पाजलं आणि त्यांनी आमच्याशी गद्दारी केली. सत्तेचं दूध तुम्ही पाजलं? फुकट नाही पाजलं, शिवसैनिकांचा त्याग आहे", असंही राणे म्हणाले.

"शिवसेना घडायला, वाढायला शिवसैनिकांचा त्याग आहे. मेहनत, परिश्रम आहे. त्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंचा एक अंश सुद्धा संबंध नाही. हे आयत्या बिळावरचे नागोबा आहेत. सत्तेचं दूध पाजलं म्हणता मग तूप कुणी खाल्लं? खोके, पेट्यारुपी तूप कुणी खाल्लं?", असा प्रश्न उपस्थित करत राणेंनी ठाकरेंवर टीकेची तोफ डागली.

Narayan Rane, uddhav thackeray
Narayan Rane : "...तर उद्या उद्धव ठाकरे संजय राऊतांचे सोबती म्हणून आत जातील"

मेवा आणि तूप मातोश्रीने खाल्लं; राणेंची ठाकरेंवर फटकेबाजी

"यशवंत जाधवने सांगितलं. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले की, खोके पेट्या कसे पोहोचवत होतो. अरे सत्तेचं दूध ते पित होते, कारण त्यांनी त्याग केला, मेहनत केली. तुम्ही मेवा आणि तूप खाल्लं. मातोश्रीने खाल्लं. यशवंत जाधव, एकनाथ शिंदेंसारखे अनेकजण सांगू शकतात", असा सूचक इशारा राणेंनी ठाकरेंना दिला.

"आता गटप्रमुख त्यांना आठवले. अडीच वर्षात सत्तेत असताना किती गटनेत्यांना भेटले. किती गटनेत्यांची निवेदनं घेतली. कुणाला काय दिलं? उद्धव ठाकरेंनी कुणाला काही दिलंय? तुम्ही बोललेलं करणारे शिवसैनिक आहेत का? गटप्रमुख आहेत का? काहीही बोलतो अरे औकात आहे का तुझी?", असं म्हणत राणे थेट राणेंवर पलटवार केला.

"संजय राऊत पिंजऱ्यात असताना त्याची खुर्ची ठेवतो. तू अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना फक्त तीन तास मंत्रालयात बसला. काय लोकांचं काम केलं. काय मराठी माणसाला दिलं. काय महाराष्ट्राला दिलं. हिंदुत्वासाठी कोणता त्याग केला. उलट हिंदुत्वाच्या नावावर याने मिळवलं. घर चालवलं. खोके/पेट्या हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या मुद्द्यावर", असा आरोप राणेंनी मातोश्रीवर केला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in