
मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. पवारांनी पुन्हा एकदा आपली पॉवर दाखवून दिली आहे. बंडखोरांमुळे महाविकास आघाडीला कसलाच धोका नाही असे वक्तव्य शरद पवारांनी केले आहे. अडीच वर्षे महाविकास आघाडीने उत्तम कारभार केला. अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. कोरोनाचं संकट असताना जे काही काम केलं आहे ते पाहता महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग फसला हे म्हणणं गैर आहे.
आत्ता जे महाराष्ट्रात घडलं आहे त्यात आमदारांना राज्याबाहेर घेऊन जाण्यात आलं आहे. ते आमदार जेव्हा महाराष्ट्रात येतील तेव्हा चित्र स्पष्ट होईल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात यावच लागेल असे शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांच्या या वक्तव्याला केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उत्तर दिले आहे.
नारायण राणे आपले ट्वीटमध्ये काय म्हणाले?
''आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. काहीजणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही.
संजय राऊत तुमचे (शिवसेना) किती आमदार राहिलेत? मतदानाची अपेक्षा करू नका, पराभवाची करा.
माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, 'सभागृहात येऊन दाखवा', ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल.
सन्माननीय नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे हे माझे जुने सहकारी व मित्रही आहेत, ते व त्यांचे सहकारी सरकारमधून बाहेर पडून राज्याबाहेर आहेत. त्यांची संख्या पाहता आताच्या मुख्यमंत्र्यांनी शोभायात्रा काढली, हा पळपुटेपणा व स्वार्थीपणा आहे.
अशा आशयाचे ट्विट नारायण राणेंनी केले आहे. राणेंनी शरद पवारांना धमकीवजा इशारा दिला आहे. बंडखोरी करुन गेलेले आमदार महाराष्ट्रात आल्यावर त्यांच्या केसालाही धक्का लावला तर घर गाठणे कठिण होईल असा इशारा नारायण राणेंनी दिला आहे.