
उस्मानाबाद (गणेश जाधव) : येथील निंबाळकर-पाटील घराण्यातील जुना वाद जिल्हाधिकारी कार्यालयात आज (शनिवारी) पुन्हा एकदा उफाळून आला. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयातच एकमेकांना भिडले. दोघांमध्येही टोकाचा शाब्दिक वाद पाहायला मिळाला.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत खरीप 2022 मधील पीक नुकसानच्या अनुषंगाने कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर 254 कोटी वर्ग करण्यात आले आहेत. मात्र नुकसान भरपाई रक्कमेतील तफावतीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसंच काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगातून निष्पन्न झालेल्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या भरपाईचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.
जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक सुरु असतानाच तिथं खासदार ओमराजे निंबाळकर यांची एन्ट्री झाली. राणा जगजितसिंह पाटील तिथं आधीपासून उपस्थित होते. यावेळी लोकप्रतिनिधींना बोलवण्याच्या कारणावरून ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांसमोर शाब्दिक चकमक झाली.
सदरील बैठकीस लोकप्रतिनिधींना का बोलवण्यात आले नाही असा सवाल ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी सचिन ओमबासे यांना केला. तेव्हा राणाजगजितसिंह पाटील ओमराजे यांना उद्देशून "बाळा लोकप्रतिनिधी नसतो रे" असं म्हणाले. यावरुनच ओमराजे यांचा संताप अनावर झाला. "तु नीट बोल, बाळ म्हणू नकोस, तुझ्या औकातीत राहा, तु नीट बोलं", असं सुनावायला सुरुवात केली. यावर पुन्हा राणा जगजितसिंह पाटील यांनी "बाळचं आहेस तु" असा टोमणा ओमराजे यांना मारला.
यावर ओमराजे म्हणाले, तुमचे संस्कार, तुमची औकात सगळं माहित आहे. तुला बोललेलो नाही, मला बोलायचं कारण नाही, अशा एकेरी भाषेत ओमराजे यांनी राणा जगजितसिंह पाटील यांना सुनावलं. यावेळी जिल्हाधिकारी यांनीही दोन्ही लोकप्रतिनिधींना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र या वादामुळे जिल्ह्याच्या राजकारणात अद्यापही निंबाळकर विरुद्ध पाटील या जुन्या वादाची धग कायम असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे.