राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’मुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ५ बदल झालेत!
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 14 दिवस महाराष्ट्रात होती. भारत जोडण्यासाठी आपण यात्रेवर निघालोय, असं राहुल गांधी सांगत असले, तरी यात्रेचा एक मूळ उद्देश काँग्रेससाठी वातावरणनिर्मिती करणं हाही असल्याचं वेळोवेळी समोर आलंय. महाराष्ट्रात तर आपल्याला आतापर्यंत ज्या राज्यांत गेलीय, तिथल्यापेक्षा अधिक प्रतिसाद मिळाल्याचा दावा राहुल गांधींना पत्रकार परिषदेत केला. महाराष्ट्राच्या राजकीय चर्चाविश्वात या यात्रेबद्दल सध्या […]
ADVERTISEMENT

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 14 दिवस महाराष्ट्रात होती. भारत जोडण्यासाठी आपण यात्रेवर निघालोय, असं राहुल गांधी सांगत असले, तरी यात्रेचा एक मूळ उद्देश काँग्रेससाठी वातावरणनिर्मिती करणं हाही असल्याचं वेळोवेळी समोर आलंय. महाराष्ट्रात तर आपल्याला आतापर्यंत ज्या राज्यांत गेलीय, तिथल्यापेक्षा अधिक प्रतिसाद मिळाल्याचा दावा राहुल गांधींना पत्रकार परिषदेत केला. महाराष्ट्राच्या राजकीय चर्चाविश्वात या यात्रेबद्दल सध्या मोठ्या प्रमाणात बोललं जातंय. पण या यात्रेनं काय साधलं? याचा खरंच काँग्रेसला फायदा होणार का? आणि भाजपसाठी काळजी करण्यासारखी काही गोष्ट आहे का? हेच आपण ५ मुद्द्यांतून समजून घेणार आहोत.
राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतची भारत जोडो यात्रा सुरू केलीये. महाराष्ट्रात 384 किलोमीटरचा प्रवास करून ही यात्रा मध्य प्रदेशकडे रवाना झाली. नांदेड, हिंगोली, अकोला, वाशिम आणि बुलडाणा या पाच जिल्ह्यांतून ही यात्रा गेली. या यात्रेनं महाराष्ट्राच्या राजकारणात काय साधलं, हे आपण पाच गोष्टींतून बघणार आहोत.
पहिली गोष्ट आहे. भाजपविरोधक तसंच काँग्रेसचे कार्यकर्ते, समर्थक व्होकल झालेत. भारत जोडोनं सगळ्यात मोठी कुठली गोष्ट झाली, तर ती काँग्रेस कार्यकर्ते, समर्थक यांना चार्ज करण्याचं काम केलंय. आपण वेगवेगळ्या मुद्यांवर भाजपचे कार्यकर्ते, समर्थक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म आक्रमकपणे भूमिका मांडताना बघतो.
नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कुणी बोललं, की कार्यकर्तेच नाही, तर समर्थकही धावून जातात. त्याचवेळी भाजपविरोधी पक्ष, कार्यकर्ते, समर्थक यांची प्रतिक्रिया खूपच मवाळपणे असते. बऱ्याचदा ती प्रतिक्रियाच समोर येत नाही. आपण बोलायचं कसं, भूमिका मांडायची कशी अशा संभ्रमात भाजपविरोधक असतात. पण या यात्रेनिमित्तानं भाजपविरोधी कार्यकर्ते, समर्थक मोठ्या प्रमाणात व्यक्त होताना बघायला मिळाले. एकप्रकारे भारत जोडो यात्रा भाजपविरोधकांना व्होकल बनवणारी ठरताना दिसतेय. तसंच गटातटात विभागलेले गेलेले महाराष्ट्र काँग्रेसचे नेते राहुल गांधींचा हातात हात घेत सोबत चालताना दिसले.
भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्राला निरोप : सीमेवरील शेवटच्या कॉर्नर सभेत राहुल गांधी भावूक
दुसरी गोष्ट म्हणजे, कार्यक्रम दिला
नरेंद्र मोदी हे वेगवेगळे राजकीय कार्यक्रम देऊन आपल्या समर्थकांना नेहमी एक्टिव ठेवतात. स्वच्छ भारत, गॅस सबसिडी सोडणं, सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी जोडणं असे कार्यक्रम देतात. मोदी नावाचा जो ब्रँड तयार झालाय, त्यामध्ये या गोष्टींचा मोठा वाटा आहे. याउलट विरोधी पक्ष हे आपल्या समर्थकांना कार्यक्रम देण्यात यशस्वी ठरत नाहीत किंवा कार्यक्रम देण्यात मागं राहतात. त्यामुळे भाजपविरोधक हे आपल्याला काय करायचंय याचा कोणताही ठोस कार्यक्रम नसल्याने चाचपडताना दिसतात. कावरेबावरे झालेले दिसतात.
राहुल गांधींच्या भारत जोडोनं कार्यक्रम देण्याचं काम केलंय. या यात्रा काँग्रेसची असली तरी त्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते जोडले जाण्यामागं हा कार्यक्रमही एक महत्त्वाचं कारण असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.
Blog : मला कळलेली भारत जोडो यात्रा…
तिसरी गोष्ट आहे, काँग्रेसची जुनी प्रतिमा उजळवणं
भारतात सतराशेसाठ जातीधर्म आहेत. जातीधर्मात विभागलेला हा देश एकत्र राहू शकत नाही, असं इंग्रजही म्हणायचे. पण वेगवेगळ्या जातीधर्मांना एकत्रित आणतं, राजकीय प्रतिनिधित्व देत काँग्रेसनं इंग्रजांच्या समजुतीला धक्का दिला. पण गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या जातीधर्मांना सोबत घेणंच काँग्रेसच्या अपयशाचा मूलभूत कारण असल्याचं म्हटलं गेलं.
भारत जोडोनं काँग्रेसची स्वातंत्र्यलढ्यातली वेगवेगळ्या जातीधर्मांना सोबत घेण्याची प्रतिमा उजळ करण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधींनी ठिकठिकाणच्या स्थानिक जाती, धर्मातल्या लोकांशी संवाद साधला. त्यातून आपलं जुनं समीकरण साधण्याचा प्रयत्न झाला.
राहुल गांधींची पप्पू प्रतिमा धुवून काढण्याचा प्रयत्न
गेल्या दहाऐक वर्षांत राहुल गांधींची सातत्य नसलेला, व्यवहारज्ञान नसलेला राजकारणी ‘पप्पू’ अशी प्रतिमा तयार झाली. हीच प्रतिमा तोडण्याचा प्रयत्न यात्रेतून केला जातोय. दीडशे दिवसात साडेतीन हजार किलोमीटरच अंतर राहुल गांधी पायी चालून पूर्ण करणार आहेत. वाढलेली दाढी आणि दीडशे दिवसांचा प्रवास यातून एखाद्या त्यागी, तपस्वीसारखी प्रतिमा उभी केली जातेय. आणि पप्पू ही फेक प्रतिमा असल्याचंही काँग्रेस नेते सातत्याने सांगत आहेत. लहान मुलांशी खेळणं असू देत की तरुणांसोबत चालणं यातून नव्या पिढीशी कनेक्ट तयार होण्याचा झाला.
शेवटचा आणि पाचवा मुद्दा आहे, राजकीय प्रभावाचा
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेने महाराष्ट्रात 384 किलोमीटरचा पायी प्रवास केला. नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या विदर्भ, मराठवाड्यातल्या जिल्ह्यांतून ही यात्रा गेली. हे दोन्ही प्रदेश काँग्रेसचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात. पण इथेच गेल्या काही वर्षांत भाजपकडून तगडं आव्हान मिळतंय. पण पाच जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचा एकही खासदार नाही. नांदेडचा अपवाद वगळता विधानसभेतही काँग्रेसला फारसं यश आलं नाही. नांदेडमध्ये नऊ, हिंगोलीत तीन, वाशिममध्ये तीन, अकोल्यात पाच आणि बुलडाण्यात सात असे विधानसभेचे एकूण २७ मतदारसंघ येतात. त्यामुळेच यात्रेचा रूट ठरवताना या भागावर विशेष लक्ष देण्यात आलं.
शेगावमधल्या सभेत तर काँग्रेसनं विदर्भातली आपली ताकद दाखवण्याचाही प्रयत्न केला. याच प्रयत्नांचा भाग म्हणून भारत जोडोच्या मार्गासोबतच आजूबाजूच्या मतदारसंघांवरही राजकीय प्रभाव पडेल, असं जाणकारांचं म्हणणं आहे. काँग्रेसनं भारत जोडोचा फॉलोअप घेतल्यास येत्या काळात यात्रेचा जवळपास पन्नासेक मतदारसंघावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो, असं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे.