‘…तर टोलनाके जाळून टाकू’; राज ठाकरेंचा इशारा, फडणवीसांचा दाखवला व्हिडीओ
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा टोलविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांकडून टोल घेऊ देणार नाही, कुणी विरोध केला तर टोल जाळू असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
ADVERTISEMENT

-दीपेश त्रिपाठी, मुंबई
Raj Thackeary On Toll : महाराष्ट्रात पुन्हा एकदा टोलचा मुद्दा तापू लागला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्तेत असलेल्या आणि राहिलेल्या नेत्यांच्या टोलमुक्त महाराष्ट्राबद्दलचे व्हिडीओ दाखवत कोंडीत पकडलं आहे. राज ठाकरेंनी फडणवीसांच्याच एका व्हिडीओवरून संताप करत थेट टोल नाके जाळण्याचा इशारा दिला आहे.
राज ठाकरे यांची टोल वाढीसंदर्भात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत नेमकं काय झालं, ते समजून घ्या.
राज ठाकरे सुरुवातीलाच म्हणाले की, “अविनाश जाधव आणि इतर सहकारी ठाण्यातील पाच टोल ठिकाणी टोलमध्ये वाढ करण्यात आल्याच्या विरोधात उपोषणाला बसले होते. टोलच्या माध्यमातून जाणारा पैसा कुठे जातो? आपल्याला घाणेरडे रस्तेच वापरावे लागतात. टोलच्या आंदोलनावेळी भाजप-शिवसेना युती होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी आघाडी होती. आता काय आहे, कुणालाच माहिती नाहीये. त्याचं काय झालं मातेरं ते. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काय म्हणाली, शिवसेना-भाजप काय म्हणाली होती, हे मी तुम्हाला दाखवतो.”