बंडखोर नेते अब्दुल सत्तार हे सिल्लोडच्या रॅलीला न आल्याने समर्थकांचा हिरमोड

अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांनीच या रॅलीला संबोधित केलं आहे
Rebel MLA Abdul Sattar did not turn up for the public rally in his constituency at Sillod
Rebel MLA Abdul Sattar did not turn up for the public rally in his constituency at Sillod

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीही एकनाथ शिंदेंसोबत बंडखोरी करत शिवसेनेला आव्हान दिलं आहे. अशात ते रविवारी सिल्लोडमध्ये येऊन रॅलीत सहभागी होणार होते आणि ते सभाही घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. मात्र ते गुवाहाटी याच ठिकाणी आहेत. अब्दुल सत्तार हे सिल्लोड या ठिकाणी आलेच नाहीत. शिवसेनेला राज्यात खऱ्या अर्थाने सुरूंग लागला तो मराठवाड्यात. मराठवाड्यातले बहुतांश आमदार, नेते हे एकनाथ शिंदेंच्या बंडात सहभागी झाले.

एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारलं आहे त्यामुळे राज्यात अभूतपूर्व उलथापालथ सुरू झाली आहे. आता एकनाथ शिंदे काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अशात अब्दुल सत्तार हे रविवारी सभा घेणार, सिल्लोडमध्ये उपस्थित राहणार या चर्चा रंगल्या होत्या. मात्र अब्दुल सत्तार आलेच नाहीत गुवाहाटीत हवामान खराब असल्याने आणि पाऊस असल्याने अब्दुल सत्तार आले नाहीत असं सांगत त्यांचा मुलगा समीर याने वेळ मारून नेली.

समीर सत्तार यांनी सिल्लोडमधल्या उपस्थितांना संबोधित केलं आणि आपण आता एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार आणि त्यांच्या गटासोबत जाऊ असं सांगितलं आहे. ग्रामविकास आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार सिल्लोडला येणार होते. एकनाथ शिंदे आणि अब्दुल सत्तार यांच्या समर्थनार्थ सिल्लोडमध्ये रॅली काढण्यात आली. या रॅलीसाठी अब्दुल सत्तार येणार होते तसं जाहीरही करण्यात आलं होतं. मात्र अब्दुल सत्तार हे या रॅलीला आलेच नाहीत.

अब्दुल सत्तार रॅलीत आले तर ते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्यामुळे सकाळपासूनच सिल्लोड या शहरातील प्रयिदर्शनी चौक आणि अब्दुल सत्तार यांचं कार्यालय या ठिकाणी समर्थांनी मोठी गर्दी केली होती. ठरलेल्या वेळेपेक्षा रॅली उशिरा सुरू झाली. तसंच या रॅलीला अब्दुल सत्तार आलेच नाहीत त्यामुळे त्यांचा मुलगा समीर सत्तार यांनीच रॅलीला संबोधित केलं.

राज्यात एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारलं आहे त्यानंतर हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. सत्तेच्या या महाभारतात पुढे काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेत बंडखोरी केली आहे. त्यांच्यासोबत काही मंत्री, राज्यमंत्रीही आहेत. हे सगळेजण आसाममधल्या रॅडीसन हॉटेलमध्ये थांबले आहेत. २० जूनला विधान परिषदेची निवडणूक पार पडली. त्यात भाजपचे पाचही आमदार निवडून आले. त्यानंतर २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांनी हिंदुत्वापासून शिवसेना दूर केली आहे हे सांगत बंड पुकारलं. आधी एकनाथ शिंदे आणि इतर आमदार हे सुरतमध्ये गेले होते त्यानंतर ते आसाममधल्या गुवाहाटीमध्ये असलेल्या रॅडीसन ब्लू हॉटेलमध्ये वास्तव्य करून आहेत.

महाराष्ट्रात शिवसेनेत घडलेल्या या अभूतपूर्व बंडामुळे राजकीय भूकंप निर्माण झाला आहे. सत्तेच्या महाभारताचा हा सहावा दिवस आहे. या सहा दिवसात अनेक घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपली शिवसेना हीच मूळ शिवसेना असल्याचं आणि आपण सगळे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणारे असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी भाजपने आपल्याला कसा दगा दिला आणि जे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आपले शत्रू होते ते आपल्यासोबत कसे हे सांगत शिवसैनिकांना भावनिक साद घातली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in