संजय राठोडांना मंत्रिमंडळात घेणं भाजपची 'केविलवाणी' अवस्था दाखवणारं?

भाजपने गदारोळ करत २०२१ मध्ये संजय राठोड यांचा राजीनामा घेतला होता, तेच संजय राठोड आता नव्या मंत्रिमंडळात
Sanjay Rathod In Cabinet Minister now why BJP Is Silent? Now This Question is in Discussion
Sanjay Rathod In Cabinet Minister now why BJP Is Silent? Now This Question is in Discussion

२०२१ मध्ये पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी भाजपने आकाश-पाताळ एक केलं होतं. पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाणार नाही तोपर्यंत आम्ही अधिवेशन होऊ देणार नाही अशी भूमिकाही त्यावेळी म्हणजेच २०२१ मध्ये विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. तसंच चित्रा वाघही संजय राठोड यांच्या विरोधात आक्रमक झाल्या होत्या. अशात आता शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आल्यानंतर संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

Sanjay Rathod In Cabinet Minister now why BJP Is Silent? Now This Question is in Discussion
Pooja Chavan : पूजा चव्हाण, संजय राठोड प्रकरण दुसरीकडेच वळवण्याचा प्रयत्न होतो आहे?

ज्या संजय राठोडांना महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातून काढून टाकण्यासाठी भाजपने आकांडतांडव केला होता त्या संजय राठोड यांना नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात घेणं ही भाजपची केविलवाणी अवस्था दाखवणारं आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. संजय राठोड यांनी मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर हा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे त्यांनी याबाबत भूमिका मांडली आहे असं कोरडं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

१ मार्च २०२१ ला देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

पत्रकार परिषदेत जी केविलवाणी स्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत मंत्र्यांची मी पाहिली अशी केविलवाणी स्थिती मुख्यमंत्र्यांची येऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. जेव्हा धडधडीत खोटं बोलावं लागतं, सगळे पुरावे असताना काही घडलंच नाही असं जेव्हा सांगावं लागतं त्यावेळी काही नैतिक धैर्य साथ देत नाही. चेहऱ्यावर मास्क असतानाही ते दिसत होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याचं उत्तर दिलं पाहिजे की ज्या क्लिप्स समोर आल्या आहेत त्या खऱ्या की खोट्या? जे काही यवतमाळमध्ये घडलं ते खरं की खोटं? जे माध्यमांनी बाहेर काढलं ते खरं की खोटं? एवढं झाल्यावर कुणालाही साधूसंत ठरवायचं तर त्यांनी ठरवावं पण तुमची नैतिकता यामुळे समोर येते. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते

२ मार्च २०२१ ला अधिवेशनात काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

परिस्थिती या ठिकाणी काय आहे? जर तुमचे पोलीस काम करत नसतील तर माझी मागणी आहे की वानवाडी पोलीस ठाण्याचे पीआय कोण आहे त्यांना निलंबित केलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या पोलिसांचा आम्हाला अभिमान आहे पण पोलिसांनी इतकी लाचारी कधी स्वीकारली नव्हती. सरकारचा इतका दबाव का? 12 क्लिप तुमच्याकडे आहेत. फोन तुमच्याकडे आहे. यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये काय घडलं त्याची माहिती तुमच्याकडे आहे. टॉवर लोकेशन तुमच्याकडे आहे. कोण कुठे कुणाला भेटलं ही माहिती तुमच्याकडे आहे. या सगळ्या गोष्टी असूनही साधी FIR नोंदवत नाही. पूजा राठोड जिचा गर्भपात झाला ती कोण आहे? तिचा नांदेडचा पत्ता का सापडत नाही? ड्युटी नसणाऱ्याने तिला अॅडमिट का केलं? हे प्रश्न उपस्थित होतातच. आजही मुख्यमंत्री म्हणाले की राजीनामा फ्रेम करायला ठेवलेला नाही. पण मला माहित नाही, अजून काही ऐकिवात नाही की त्यांनी तो पुढे पाठवला आहे. इतकी भयानक घटना घडलेली असताना पोलिसांवर दबाव आणून तुम्ही त्यांना वाचवाल पण तुम्ही रात्री झोपू शकणार नाही.

९ ऑगस्ट २०२२ ला मंत्रिमंडळात संजय राठोड यांनी शपथ घेतल्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

संजय राठोड यांच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भूमिका स्पष्ट केली आहे. स्पष्टपणे जे काही सांगायचं ते सांगितलं आहे त्यापेक्षा जास्त काहीही सांगायची आवश्यकता नाही.

संजय राठोड यांच्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी दोनदा केलेली ही वक्तव्यं आणि त्यानंतर जेव्हा त्यांना मंत्रिमंडळात घेण्यात आलं तेव्हा केलेलं वक्तव्य परस्परविरोधी आहेत. पूजा चव्हाणला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप संजय राठोड यांच्यावर आहे. तरीही त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं. मात्र तेव्हा आक्रमक झालेले देवेंद्र फडणवीस आता संजय राठोड यांना मंत्रिमंडळात घेतल्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ढकलत आहेत.

काय आहे पूजा चव्हाणचं प्रकरण?

पूजा चव्हाण ही टिकटॉक आणि सोशल मीडियावर फेमस असलेली मुलगी होती. 22 वर्षांची पूजा चव्हाण ही मूळची परळीची होती. पुण्यात ती शिकण्यासाठी आणि इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स करण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात वास्तव्य करत होती. 2021 च्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तिने सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. पुण्यातल्या हेवन पार्क या इमारतीत ती वास्तव्य करत होती याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून तिने उडी मारली. जखमी अवस्थेतल्या पूजाला रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणातल्या १२ ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. ज्यामधला आवाज हा संजय राठोड यांचा आहे असा आरोप विरोधी पक्षाने (भाजप) केला होता. यानंतर अधिवेशन सुरू होण्याच्या आधी संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता.

कोण आहेत संजय राठोड?

संजय राठोड हे बंजारा समाजून येतात, त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातच काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या यवतमाळमध्ये केली. तरुण वयातच त्यांना यवतमाळचं शिवसेनेचं जिल्हाध्यक्ष पद मिळालं. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळमध्ये शिवसेनेचा प्रचार आणि प्रसार करण्यात संजय राठोड यांचा मोलाचा वाटा मानला जातो. २००४ साली झालेल्या निवडणुकीत संजय राठोड यांनी काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंचा पराभव करत पहिल्यांदा यवतमाळमध्ये भगवा फडकवला.

२००९ च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या संजय देशमुखांना पराभवाचं पाणी पाजलं. यावेळी राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून येणाऱ्या उमेदवारांमध्ये संजय राठोड मोजक्या ५ आमदारांमध्ये होते. यानंतर आतापर्यंत संजय राठोड यवतमाळमध्ये शिवसेचेचं वर्चस्व राखून आहेत. या जोरावरच त्यांना राज्याच्या मंत्रीमंडळात स्थानही देण्यात आलं. संजय राठोड यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री पद होतं.

संजय राठोड राजीनामा झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधली पहिली विकेट काढली अशी प्रतिक्रिया भाजपने दिली होती. आता हेच संजय राठोड शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात घेणं हे भाजपची केविलवाणी अवस्था दाखवणारं चित्र आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in