संजय राऊतांच्या जामिनावरील स्थगितीच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी

वाचा सविस्तर बातमी, जाणून घ्या बुधवारपासूनचे अपडेट्स
Sanjay Raut Bail Oppose ED Plea In High Court Today is the Hearing
Sanjay Raut Bail Oppose ED Plea In High Court Today is the Hearing

१०० दिवसांनंतर संजय राऊत यांना PMLA कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे संजय राऊत हे तुरुंगाबाहेर आले आहेत. रात्री ११.३० च्या सुमारास ते भांडूप येथील त्यांच्या निवासस्थानीही पोहचले. मात्र संजय राऊत यांच्या जामिनाला ईडीचा विरोध कायम आहे. संजय राऊत यांच्या जामिनाच्या निर्णयाविरोधात ईडीने हायकोर्टात अपील केलं आहे. दुसरीकडे PMLA कोर्टाने ईडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले असून संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. तर हायकोर्टात ईडीने जी याचिका दाखल केली आहे त्यावर आज सुनावणी होणार आहे.

शिवसेनेचे फायरब्रांड नेते अशी संजय राऊत यांची ओळख

शिवसेनेचे फायरब्रांड नेते अशी संजय राऊत यांची ओळख आहे. संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र बुधवारी म्हणजेच ९ नोव्हेंबरला त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर न्यायालय परिसरात शिवसैनिकांचा जल्लोष पाहण्यास मिळाला. तसंच संध्याकाळी सातच्या सुमारास संजय राऊत यांची ऑर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी हजारो शिवसैनिक जमले होते. शिवसैनिकांसोबत जात संजय राऊत यांनी प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. तसंच बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीचंही दर्शन त्यांनी घेतलं.

संजय राऊत हे जेव्हा त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानी पोहचले त्यावेळीही त्यांच्यासोबत अनेक शिवसैनिक होते. त्यांनी त्या ठिकाणी एक छोटेखानी भाषणही केलं. मला अटक करून खूप मोठी चूक केली गेली आहे असंही वक्तव्य संजय राऊत यांनी बुधवारी केलं.

काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी?

आज घरी आल्यानंतर मला वाटलं की शिवतीर्थावरच आलो. दसरा मेळावा चुकला होता. मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. १०० दिवसांनंतरही तुम्ही माझं स्मरण ठेवलंत मी तुमचा आभारी आहे. १०० दिवसांनी मी घरी आलो आहे. माझ्या सुटकेनंतर मी पाहिलं की फक्त भांडुप किंवा मुंबईत नाही तर महाराष्ट्रातल्या शिवसैनकांमध्ये आनंद झाला आहे. बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक कसा असतो हे महाराष्ट्राने आणि देशानं पाहिलं. याच रस्त्यावरून मला अटक करून घेऊन गेले होते. तेव्हाही तुम्ही जमला होतात. तेव्हाही मी जाताना सांगितलं होतं की मरण पत्करेन पण शरण जाणार नाही.

मला कितीही वेळा अटक करा मी भगवा सोडणार नाही

मला कितीही वेळा अटक करा मी शिवसेनेला त्यागणार नाही. हा भगवा सोडणार नाही. हा भगवा घेऊन मी जन्माला आलो, त्या भगव्यासोबतच मी जाईन. या महाराष्ट्रात आता आपल्या शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. माझ्या अटकेच्या आधी दिल्लीतून आदेश आले की इसको जेलमें डालो फिर सरकार आयेगी. आता खोक्यांची गोष्ट चालली आहे. महाराष्ट्रातले बोके खोक्यांवर बसली आहे. मात्र शिवसेना त्यांना काय ते दाखवून देईल. शिवसेना फक्त बाळासाहेब ठाकरेंचीच. गद्दारांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचा अधिकार नाही. मुंबई महापालिका आपल्या हातातून काढून घेण्यासाठी शिवसेना फोडली आहे लक्षात घ्या. असंही संजय राऊत म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in