पंकजा मुंडे बहुजनांच्या नेत्या, उमेदवारी नाकारल्याने राज्यात पडसाद- संजय राऊत
Sanjay Raut | Pankaja Munde Mumbai Tak

पंकजा मुंडे बहुजनांच्या नेत्या, उमेदवारी नाकारल्याने राज्यात पडसाद- संजय राऊत

भाजपने विधान परिषदेसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. परंतु त्यात कुठेच पंकजा मुंडे यांचे नाव नव्हते.

मुंबई: भाजपने विधान परिषदेसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. परंतु त्यात कुठेच पंकजा मुंडे यांचे नाव नव्हते. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. मराठवाड्यात जागोजागी निषेध दर्शवला. पंकजा मुंडे यांच्या ऐवजी उमा खापरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, पकंजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्यानंतर सर्वच राजकीय पक्षाचे नेते प्रतिक्रिया देत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडेना उमेदवारी नाकारल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की पंकजा मुंडे या त्यांच्या वडीलांप्रमाणे बहुजन समाजाच्या, ओबीसींच्या नेत्या आहेत. त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर राज्यात ज्या प्रकारचे पडसाद उमटले ते पाहिल्यावर मला असे वाटले की, कोणीतरी पडद्यामागून मुंडे, महाजन यांचे नाव राज्यातून तसेच देशाच्या राजकारणातून संपावे यासाठी प्रयत्न करत आहे. भाजपने कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. मुंडे-महाजनांचा शिवसेना-भाजप युतीमध्ये फार जवळचा संबंध होता. या दोन नेत्यांमुळे युतीला कायम बळ मिळाले. मुंडे कुटुंबाविषयी अशी बातमी वाचल्यानंतर आम्ही व्यथित होतो असे संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा पार पडली. सभा झाल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षातील नेते मुख्यमंत्री आणि शिवसेनेवरती टीका करत आहेत. यांना उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की मुख्यमंत्र्यांची सभा ऐतिहासीक झाली. राज्यात सध्या विरोध करायचा म्हणून विरोध सुरु आहे, त्यामुळे आगामी काळात विरोधी पक्षाचा सत्यानाश होईल असेही संजय राऊत म्हणाले.

भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशाला धमक्या येत आहेत याला सर्वस्वी भाजप जबाबदार आहे. भाजपचे प्रवक्ते देशातील वातावरण खराब करत आहेत, दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करत आहेत असे संजय राऊत म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in