शरद पवारांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी, औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे बरसले

शरद पवारांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी, औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे बरसले

राज्यातील 18 पगड जातींमध्ये तुम्ही विष कालवलंत - राज ठाकरेंची टीका

मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसेचा मुद्दा राज्याच्या राजकारणात ऐरणीवर आणणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत बोलत असताना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांवर घणाघाती टीका केली आहे. शरद पवारांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी असून तुमच्यामुळेच समाजात दुही माजत असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत.

पवार नास्तिक म्हटल्यावर त्यांना झोंबलं - राज ठाकरे

"शरद पवार यांनी शिवाजी महाराजांचं कधीही नाव घेतलं नव्हतं. मी सभेत म्हटल्यावर ते नाव घेऊ लागले. शरद पवार नास्तिक आहेत म्हटल्यावरही त्यांना लागलं, झोंबलं. आपली कन्या लोकसभेत माझे वडील नास्तिक आहेत असं बोललीय. यापेक्षा मी काय पुरावा देऊ. मी माझ्या आजोबांची पुस्तकं वाचली आहेत. ती पुस्तकं शरद पवार यांनी नीट वाचावीत. माझे आजोबा धर्मातल्या चुकीच्या गोष्टींवर बोट दाखवणारे होते, भटभिक्षुकीला विरोध करणारे होते."

'बाबासाहेब पुरंदरेंना वृद्धापकाळात पवारसाहेबांनी त्रास दिला'

बाबासाहेब पुरंदरेंना त्यांच्या वृद्धापकाळात पवारसाहेबांनी त्रास द्यायला सुरुवात केली. केवळ ते ब्राह्मण होते म्हणून त्यांना त्रास दिला गेला. मी कधीही जात पाहून व्यक्तीकडे जात नाही. जात पाहून वाचत नाही. रायगडावरील समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली. त्यांच्याकडे काय ब्राह्मण म्हणून पाहाणार काय? लोकमान्यांनी आपल्या वर्तमानपत्राचं नाव मराठा ठेवलं. हे पवारसाहेब कधी सांगणार नाहीत. हे सत्तेत असताना त्यांनी जेम्स लेनला का भारतात आणलं नाही", असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.

शरद पवारांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी - राज यांचा आरोप

शरद पवारांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी आहे. ते नेहमी फक्त शाहु-फुले आणि आंबेडकरांचा उल्लेख करतात. नक्कीच महाराष्ट्र हा त्यांचा आहेच, परंतू पहिल्यांदा येतात ते आपले छत्रपती महाराज. परंतू शरद पवार शिवाजी महाराजांचं नाव कधीच घेत नाही. त्यांच्या सभांमध्ये शिवाजी महाराजांचे फोटो कधीच दिसत नाहीत. मी इथे कोणत्याही ब्राम्हणांची बाजू घ्यायला आलेलो नाही. परंतू महाराष्ट्रातल्या 18 पगड जातींमध्ये तुम्ही विष कालवलं आहेत.

या भाषणाच्या शेवटी राज ठाकरेंनी भोंग्याबद्दल पुन्हा एकदा 3 मे च्या डेडलाईनचा उल्लेख करत भोंगे हे उतरलेच गेले पाहिजेत असा पुनरुच्चार केला.

Related Stories

No stories found.