अमरावती : शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीला गालबोट; मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांमध्ये राडा

पोलिसांनी लाठीचार्ज करत काहींना ताब्यात घेतले. परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढल्याने गाडगे नगर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला.
Shivaji education trust election, Amravati
Shivaji education trust election, Amravati

स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक आज होत आहे. मात्र अमरावती येथील शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात सुरू असलेल्या मतदान केंद्रावर दोन गटात मतदान केंद्रात लॉबिंग होत असल्याच्या कारणावरून विकास पॅनलचे सदस्य पदाचे उमेदवार डॉ.दिनकरराव गायगोले यांचे बंधू रवींद्र गायगोले व प्रगती पॅनलचे सदस्य पदाचे उमेदवार हेमंत काळमेघ यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. हा वाद विकोपाला गेल्याने दोघेही एक दुसऱ्याच्या अंगावर धावून गेले.

वाद विकोपाला गेल्याने पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज

या वादात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी उडी घेतल्याने मतदान केंद्र परिसरात गोंधळ उडाला. वरुड मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार व अकोटचे शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांनीही या वादात उडी घेतली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत काहींना ताब्यात घेतले. परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढल्याने गाडगे नगर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी येत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

पोलिसांसोबत बाचाबाची

दरम्यान डॉक्टर दिनकर गायगोले व पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्यात वाद झाला. आमदार पंकज भोयर सुद्धा घटनास्थळी दिसून आले. आमदार देवेंद्र भुयार हे मतदान केंद्राच्या आत असल्याने काहींनी आक्षेप नोंदवला. मी मतदान प्रतिनिधी आहे. आतमध्ये थांबण्याचा माझा अधिकार आहे. संख्येने जास्त लोक आतमध्ये होते. त्यामुळे जे प्रतिनिधी नाहीत त्यांना अधिकाऱ्यांनी बाहेर काढलं. मी प्रतिनिधी असल्याने आतमध्ये होतो तर मला धक्काबुक्की झाली नाही, असं देवेंद्र भोयर यांनी सांगितले. फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा जपणारी संस्था असल्याने गैरप्रकार या संस्थेत घडणार नाही, असा विश्वास भुयार यांनी बोलून दाखवला.

वादामुळे निवडणूकप्रक्रियेला गालबोट

आमदार भुयार असं जरी म्हणत असले तरी काहीकाळ बूथमध्ये जाण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. आणि त्याच रूपांतर वादात झालं. त्यामुळे पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत देखील बाचाबाची झाली. त्यामुळे काहींवर बळाचा देखील उपयोग करावा लागला. म्हणून शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागल्याचं पहायला मिळालं.

एकूण 21 उमेदवार रिंगणात

शिवाजी शिक्षण संस्था विदर्भातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांची ही शिक्षण संस्था आहे. शिवाजी शिक्षण संस्थेची आज निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत नऊ पदांसाठी 21 उमेदवार रिंगणात उभे आहेत. सकाळी 8 वाजेपासून या मतदानाला सुरुवात झाली आहे. हे मतदान संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. या निवडणुकीत 774 सभासद मतदान करणार आहेत. विकास पॅनल आणि प्रगती पॅनलमध्ये काटे की टक्कर होणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in