संजय राऊत यांचा राज ठाकरेंना सल्ला, "शत्रूवरही अशी टीका करताना थोडं...."

जाणून घ्या काय म्हटलं आहे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी?
Shivsena MP Sanjay Raut Gave Suggestion to Raj Thackeray About His Words
Shivsena MP Sanjay Raut Gave Suggestion to Raj Thackeray About His Words

शिवसेना खासदार संजय राऊत हे १०२ दिवसांनी तुरुंगातून बाहेर आले आहेत. PMLA कोर्टाने त्यांना जामीन मंजूर करत त्यांची सुटका केली. २ लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. बुधवारी रात्री उशिरा संजय राऊत हे आपल्या भांडूप या निवासस्थांनी पोहचले. त्यानंतर आज १०३ दिवसांनी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे.

काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी राज ठाकरेंबाबत?

आमचे मित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझ्यावर टीका करताना संजय राऊत यांना ईडीकडून अटक होईल त्यांनी एकांतात स्वत:शी बोलण्याची प्रॅक्टिस करावी असं म्हटलं होतं. मला त्यांना सांगायचं आहे, मला बेकायदेशीर अटक झाली, असं कोर्टाचं म्हणणं आहे. राजकारणामध्ये शत्रूच्याबाबतही आपण असं चिंतू नये की तो जेलमध्ये जावा. मी एकांतात होतो, जसे सावरकर होते, वाजपेयी होते. मी माझा एकांततला वेळ सत्कारणी लावला, असं संजय राऊत यांनी सांगितलं आणि राज ठाकरेंना टोला लगावला.

राज ठाकरे १२ मार्च २०२२ च्या भाषणात नेमकं काय म्हणाले होते?

१२ मार्चला राज ठाकरेंना संजय राऊत यांच्याविषयी प्रतिक्रिया विचारली होती, त्यावर राज ठाकरे म्हणाले होते की "संजय राऊत यांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे" असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.

१२ एप्रिल २०२२ च्या सभेत काय म्हणाले होते राज ठाकरे?

१२ एप्रिल २०२२ ला झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्याविषयी एक वक्तव्य केलं होतं. " मी त्यांच्या वाढदिवसाच्या भाषणाच्या वेळी बोललो होतो, शरद पवार खुश झाले की भीती वाटायला लागते. शरद पवार हल्ली संजय राऊत यांच्यावर खुश आहेत. कधी टांगलेला दिसेल कळणार पण नाही."

या दोन वक्तव्यांवरून आज संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. तसंच आपण राजकारणात असताना शत्रूबाबतही असा विचार करायचा नसतो असा सल्लाही त्यांनी दिला.

कोर्टाच्या निर्णयामुळे चांगला संदेश देशात गेला

कोर्टाने जी ऑर्डर माझ्या जामिनाबाबत दिली त्यामुळे देशात एक चांगला मेसेज गेला आहे. ज्यांनी हा कट रचला होता त्यांना आनंद झाला असेल तर ठीक आहे. माझ्या मनात कुणाविषयीही तक्रार नाही. माझ्या कुटुंबाने अनेक गोष्टी सहन केल्या. मात्र राजकारणात अशा गोष्टी घडतात. मात्र अशा प्रकारचं राजकारण कधीही देशानं पाहिलं नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राजकीय शत्रू असतील तरीही चांगलं वागण्याची आपल्याकडे परंपरा आहे. ठीक आहे जे झालं ते झालं असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in